राहूल विद्या माने -
National Council of Educational Research and Training (NCERT) ने अलीकडे Central Board of Secondary Education (CBSE) च्या पुढील वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातून डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर देशभरातील १८०० शास्त्रज्ञ आणि शिक्षकांनी एका खुल्या पत्रातून हा पायाभूत वैज्ञानिक सिद्धांत वगळण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. NCERT ने दहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकाचे पुनर्रचित आशय समोर आले आहेत. त्यावरून नवव्या पाठाचे नाव ‘आनुवंशिकता आणि उत्क्रांती’ बदलून ‘आनुवंशिकता’ ठेवल्याचे कळून येते. दहावीच्या अभ्यासक्रमातून हा महत्त्वाचा सिद्धांत वगळल्याने उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून कळीचे आहे आणि विद्यार्थ्यांना या ज्ञानापासून वंचित ठेवणे हे शिक्षणाची कुचेष्टा आणि विद्यार्थ्यांची फसवणूक आहे असे स्पष्ट मत देशभरातील वैज्ञानिक आणि शिक्षक त्यांच्या पत्रातून व्यक्त करतात.
ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी यांनी माध्यमिक शिक्षणात डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत त्वरित पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे. ही संस्था देशभरात विज्ञान, तर्कनिष्ठ संस्कृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या प्रसारासाठी सातत्याने काम करत असते. या संस्थेने ‘अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा सिद्धांत वगळण्याच्या विरोधात आवाहन’ या नावाचे पत्र जारी केले आहे. या पत्रावर देशभरातील १८०० शास्त्रज्ञ, विज्ञान शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींनी सही केली आहे. या पत्राचे अनुमोदन करणार्या व्यक्तींमध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) आणि देशभरातील अनेक नामवंत संशोधन संस्थांचा समावेश होतो. उत्क्रांतीसारख्या मूलभूत विज्ञानातील महत्त्वाच्या शोधाच्या प्रक्रियेची ओळख शालेय मुला-मुलींना जर झाली नाही तर प्रगत भारताचा एक नागरिक म्हणून त्यांची प्रगती खुंटेल अशी सुद्धा भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
उत्क्रांतीचे जीवशास्त्र ही फक्त जीवशास्त्राची उपशाखा एवढेच या संकल्पनेचे महत्त्व म्हणून मर्यादित नाही तर आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचे आहे. एक समाज व देश म्हणून आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक समस्यांचा कसा यशस्वीपणे मुकाबला करतो, हे उत्क्रांती विषयक आपल्या समजुतीवर अवलंबून आहे. औषधनिर्माण, वैद्यकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, परिस्थितीशास्त्र, रोगपरिस्थिती विज्ञान, मानसशास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयात अभ्यास व संशोधन केल्या जाणार्या समस्यांच्या उकलीसाठी उत्क्रांतीचे ज्ञान आवश्यक आहे.
महाराष्ट्र अंनिसने २०२२ मध्ये डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान सुरू केले होते. त्या अभियानाचे सदस्य असलेल्या सुजाता म्हेत्रे यांनी या विषयावर भूमिका मांडली. त्या म्हणतात, “विज्ञानामध्ये / विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये एखादी गोष्ट समाविष्ट करण्यासाठी काही निकष असतात. डार्विनचा उत्क्रांतीवाद सिद्धांत वगळण्याबाबत अशी तर्कनिष्ठ पद्धती अवलंबली गेली का? जर याचं उत्तर ‘हो’ असेल तर आत्ता विज्ञानाच्या ज्ञानामध्ये असे कोणते बदल झाले की आधीचा असणारा अभ्यासक्रम बदलला जात आहे? दुसरा प्रश्न असा की विज्ञानाची पुस्तके तयार करणार्या आणि अभ्यासक्रमावर काम करणार्यांनी कोणत्या शिक्षणतज्ज्ञांची मान्यता यासाठी घेतली आहे? डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताप्रमाणे मेंडेलीवच्या आवर्तसारणी बाबतीत सुद्धा काही लोकांचे धार्मिक व आध्यात्मिक आक्षेप आहेत, मग त्यानुसार प्रत्येक सापेक्ष आक्षेपांपुढे शरणागती घेऊन आपण विज्ञानातील मूलभूत तत्त्वांना मूठमाती देऊ शकत नाही. एखाद्या वैज्ञानिक सिद्धांतावर आक्षेप असतील तर ते आक्षेप त्याच्या मूळ सिद्धांताचा उल्लेख करून चर्चेला येऊ शकतात, पण जोपर्यंत ते आक्षेप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ते अभ्यासक्रमात येऊ शकत नाहीत. म्हणूनच डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला NCERT ने CBSE च्या अभ्यासक्रमातून वगळले याचा आम्ही विरोध करतो.”
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्य मंत्री सत्यपाल सिंह यांनी उत्क्रांती ही वैज्ञानिक दृष्ट्या चुकीची असल्याचा दावा केला होता आणि त्यामुळे अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी केली होती. यावरून या विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल आणि ती भीती NCERT च्या कृतीने खरी ठरली आहे. तर्कनिष्ठ विचारसरणी आणि वैज्ञानिक विचारपद्धती विकसित करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हा पायाभूत असतो. त्यासाठी मूलभूत विज्ञानातील महत्त्वाच्या शोधांचे आकलन कोणत्याही माहितीच्या अपप्रचाराला बळी न पडता व्हायला हवे. यासाठी मूलभूत विज्ञानाच्या प्रगतीतील महत्त्वाच्या टप्प्याबद्दल आपल्याकडून दुर्लक्ष किंवा बेफिकिरी झाल्यास त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या महत्त्वाबद्दल अनास्था वाढते. हे होऊ नये यासाठी या प्रकारच्या घटनांची सगळ्यांनी तातडीने दखल घेऊन डार्विनच्या सिद्धांताला परत अभ्यासक्रमात सामावून घेण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती आणि उत्क्रांतीचे महत्त्व समजलेल्या अभ्यासू व्यक्तींनी या विषयावर सजगपणे जागरूकता वाढवावी, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात येत आहे.
लेखक संपर्क : ८२०८१६०१३२