सुभाष थोरात -
महाराष्ट्रात वैचारिक पातळीवर बाबासाहेबांच्या विचारांची मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली दिसून येईल. दलितेतर समाजातून आलेल्या अनेक विचारवंतांनी राजकीय नेत्यांनी ही दखल घेतली दिसून येते. पण इतर बाबतीत मात्र पूर्ण उदासीनता दिसून येते. आपल्या जाती संस्काराच्या मर्यादा जातींचे पूर्वग्रह बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला दाद देता आलेली नाही. इतकेच नव्हे, तर जाती प्रश्नाबद्दल ठोस, ठाम अशी भूमिका आपल्याला तथाकथित महान साहित्यिकांमध्ये कलावंतांमध्ये दिसून येत नाही. इतर राज्यांतील परिस्थिती आपल्याला माहीत नाही, पण तिथे याहीपेक्षा वाईटच परिस्थिती असणार.
सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत स्वतःला घडवणार्या शून्यातून विश्व निर्माण करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची दखल आज जगभर घेतली जात आहे. भारतीय राज्यघटना निर्मितीचे शिल्पकार म्हणून ते आज ओळखले जातात. ही त्यांची ओळख अजरामर अशाच स्वरूपाची आहे. भारतात लोप पावलेल्या बौद्ध धम्माचे पुनर्जीवन करण्याचे त्यांचे कार्य महान अशा स्वरूपाच्या आहे. हे करताना त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाला आजच्या आधुनिक मूल्यांशी तर्कशुद्धपणे जोडले आहे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याचा आग्रह धरला आहे. एका बाजूला राज्यसंस्था चालवण्यासाठी समतेच्या न्यायाच्या पायावर नवा समाज उभारण्यासाठी राज्यघटनेच्या मार्फत दिली गेलेली आधुनिक मूल्य, तर दुसर्या बाजूला माणसाने माणसाशी कसे वागावे यासाठी बौद्ध तत्त्वज्ञानातून आलेली चिरंतन मूल्ये यांचा एक सुरेख संगम त्यांच्या या कार्यकर्तृत्वात दिसून येतो. असे असतानाही अजूनही जातीय संस्काराने ग्रस्त असलेल्या भारतीय समाजाने त्यांच्या या कार्याची योग्य ती दखल घेतली आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला “नाही” या शब्दात देता येईल. जरी आज थोडीफार दखल घेतली जात असली तरी पुन्हा हे दखल कोण घेते, त्यासाठी कोणाचा पुढाकार आहे, तर तो परत त्यांच्या अनुयायांचा, जातिग्रस्त समाजातील दुःख भोगलेल्या लोकांचा. त्यामुळे संपूर्ण समाजाने स्वीकारणे हे त्याचे स्वरूप नाही. जरी त्यांचे कार्य केवळ एका जातीपुरते मर्यादित नाही तर संपूर्ण भारतीय जनतेला एका आधुनिक न्यायपूर्ण समाजात कसे रूपांतरित करता येईल हेच चिंतन त्यांच्या एकंदर विचार गाभ्यात दिसून येते. दलित जनतेवर झालेल्या इतक्या अपरिमित अन्यायानंतरही त्यांच्या मनात कुठल्याही जातीबद्दल द्वेष नाही. तर हे नेहमीच एकंदर व्यवस्थेबद्दल बोलताना तिचे विश्लेषण करताना दिसतात. असे असतानाही त्यांना जातीच्या मर्यादेत अडकवण्याचे प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या याच अंकात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील सहायक प्राध्यापक असलेल्या हरीश वानखेडे यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत डॉ. बाबासाहेबांच्या योगदानाची कितपत दखल घेतली आहे याचा एक समर्पक आढावा घेतलाय. यातून आपल्याला दिसून येते की अलीकडच्या काळात थोडीबहुत दखल घेतली जात आहे. परंतु अर्थातच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करता ती पुरेशी नाही, त्यांना न्याय देणारी नाही. आणि दखल घेणारे दलित समाजातून उदयाला आलेले कलाकार आणि दिग्दर्शक आहेत. मात्र, याच अनुषंगाने आपण कलेचे इतर क्षेत्राबाबत म्हणजे साहित्य, संगीत, कादंबर्या, कविता, नाटक, वैचारिक साहित्य यांचा विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निराशाच पदरी पडते. महाराष्ट्रात वैचारिक पातळीवर बाबासाहेबांच्या विचारांची मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली दिसून येईल. दलितेतर समाजातून आलेल्या अनेक विचारवंतांनी राजकीय नेत्यांनी ही दखल घेतली दिसून येते. पण इतर बाबतीत मात्र पूर्ण उदासीनता दिसून येते. आपल्या जाती संस्काराच्या मर्यादा जातींचे पूर्वग्रह बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला दाद देता आलेली नाही. इतकेच नव्हे, तर जाती प्रश्नाबद्दल ठोस, ठाम अशी भूमिका आपल्याला तथाकथित महान साहित्यिकांमध्ये कलावंतांमध्ये दिसून येत नाही. इतर राज्यांतील परिस्थिती आपल्याला माहीत नाही, पण तिथे याहीपेक्षा वाईटच परिस्थिती असणार.
हा खरे तर एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. याचे चार भाग करता येतील.
१) जाती प्रश्नाबद्दल कथा, कादंबर्या, नाटक.
२) बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करणार्या कथा, कादंबर्या, नाटक.
३) माहितीपट हे खर्या घटनांवर, विषयांवर आधारित असतील, वस्तुनिष्ठ असतील. आणि त्याबाबतीत बाबासाहेबांचे योगदान आधारित करतील.
४) तत्त्वज्ञानी विचार लिखाणात बाबासाहेबांचे योगदान. त्याची दखल किती प्रमाणात घेतली गेली आहे याची नोंद. याची एक समर्पक मांडणी करणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तो मोठा अभ्यासाचा विषय आहे. या संदर्भात अजून काही लिखाण झाले आहे काय याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारण हे विषय बाबासाहेबांच्या कार्याशी, भारतीय राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान या क्षेत्रात जरी निगडित असले, तरी तो एकंदर जातीग्रस्त भारतीय समाजाच्या सामाजिक, मानसिक परिवर्तनाशी निगडित विषय आहे.
याबाबतीत स्वातंत्र्यानंतर आपण किती प्रयत्न केला याचाही एक आलेख आपल्यासमोर सादर होऊ शकतो. अर्थात, कुठल्याही कलावंताला तो कादंबरीकार, नाटककार, कवी असो, जेव्हा त्याला या संदर्भात व्यक्त होण्याची गरज निर्माण होते तेव्हा तो त्या कलावंतांच्या मानसिक परिवर्तनाचा भाग असतो. तसा समाजातील नव्या जाणिवांच्या बदलांचा परिणाम असतो. आपण सत्य लिहितोय ते समाजाला पचेल काय? समाजाची प्रतिक्रिया काय असेल, याचा विचार त्याला करावा लागतो. त्याचा दबाव त्याच्यावर असतो. तो झुगारून जे लेखक, कवी, नाटककार पुढे येतात ते क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. जातीव्यवस्था म्हणजे तरी नेमके काय? तर तो अनेक गुंतागुंत आणि पेच असलेला हितसंबंधांचा झगडा असतो. त्यामुळे तुम्ही जे काही लिहिता ते कुठल्या ना कुठल्या जाती हितसंबंधांना व्यक्त करणारे असते. एकंदरच आपण जेव्हा आधुनिक मूल्यांच्या दृष्टीतून हिंदू धर्माची चिकित्सा करतो त्यातील अन्यायग्रस्त रूढी, अंधश्रद्धेतून होणारे शोषण त्याला धर्माचा असणारा कधी उघड कधी छुपा पाठिंबा तेव्हा आपण अजूनही समाजात सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेच्या केंद्रस्थानी असणार्या उच्च समजल्या जाणार्या जातींचे हितसंबंध धोक्यात आणत असतो. यातून चार्वाक, तुकाराम तसेच शहीद दाभोलकरांपर्यंत आपल्याला हितसंबंधी लोकांनी हिंसेचा आधार घेऊन त्यांना नष्ट करण्याचे षड्यंत्र आखलेले दिसून येते. त्याचे मर्म या हितसंबंधातच दडलेले असते.
इंग्रजी सत्ता नसती तर फुले, आंबेडकर जन्माला येणे शक्यच नसते. आणि तरी आलेच असते तर त्यांचा नकी शंबूक झाला असता. या सर्व पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला दलित समाज, दलित साहित्याचा अपवाद वगळता इतर समाज घटकांतून जवळजवळ अगदी नगण्य स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आहे. ज्या कलावंतांनी, विचारवंतांनी हे उच्च जात वर्गाचे हितसंबंध नाकारून त्यांना विरोध करून समाजातील अन्यायग्रस्ततेचे आकलन करून शोषणग्रस्त समाजाची बाजू घेतली आहे, असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके कलावंत, विचारवंत आपल्याला कलाकृती सादर करताना दिसून येतील. आपण हे सध्याच्या आधुनिक त्यातील स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीबद्दल बोलत आहोत. कारण, भारतीय तत्त्वज्ञानाच्या कलेच्या क्षेत्रात क्रांतिकारी एक उदात्त, समर्थ, अजरामर अशी परंपरा आपल्याला लाभली आहे. चार्वाक, बुद्ध, महावीर, चक्रधर, बसवेश्वर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारलेल्या अनेक क्रांतिकारी कलाकृती त्या त्या काळाच्या कलावंतांनी निर्माण केलेल्या आहेत. मग ते अश्वघोष, शूद्रक, रैदास, कबीर, तुकाराम हे केवळ काही ठळक उदाहरणे. पण चक्रधर आणि बसवेश्वरांच्या अनुयायांनी निर्माण केलेले साहित्य जाती व्यवस्थेला पूर्ण नकार देणारे आहे याची नोंद प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे आणि गेल ऑम्वेट यांनी त्यांच्या पुस्तकातून शोधनिबंधातून घेतली आहे. तसेच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात राहुल सांस्कृतायन आणि देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल.
अर्थात, हे जातीव्यवस्थेच्या जाती प्रश्नासंदर्भात आहे. हे साहित्य नेहमीच फुले, शाहू, आंबेडकरांचे प्रेरणास्रोत राहिले आहेत.
आपण आजच्या संदर्भात विचार करत आहोत खासकरून स्वातंत्र्य चळवळीनंतर चळवळीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ या काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्तृत्व आणि त्याचे कलाकृतीतून घेतलेली दखल हा आपला मुद्दा आहे आणि असा विचार करताना एक गोष्ट चटकन लक्षात येते ती म्हणजे या बाबतीत उल्लेखनीय लिहिण्यासारखं फार काही नाही. अगदी ज्या महाराष्ट्रात त्यांच्या कार्याची सुरुवात झाली ते बहरले त्या महाराष्ट्रातही फार चांगली म्हणावी अशी परिस्थिती नाही. चरित्र लेखन आणि वैचारिक लिखाणाबाबत आपल्याला अपवाद करायला या बाबतीत खूप लिहिले गेले आहे. धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचे अत्यंत सुंदर चरित्र लिहिले आहे. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतुलनीय कार्यकर्तृत्व सर्वार्थाने पुढे येते. वैचारिक लेखनाची फारशी कमतरता नाही. नलिनी पंडित, गं. बा. सरदार यांचा उल्लेख केला तरी पुरेसे होईल. पण कलाकृतींच्या संदर्भात मात्र असे म्हणता येणार नाही. दलित साहित्याचा, दलित लेखकांचा अपवाद वगळता बाकी बेरीज जेमतेमच आहे. चटकन एखादी कलाकृती आपल्यासमोर येत नाही. ना कादंबरी ना नाटक ना कविता. अर्थात, काही लिहिले गेलेच नाही असं नाही, परंतु चटकन आठवणारे आणि उल्लेखनीय असे आपल्याला काही सापडत नाही. जाती प्रश्नाबद्दल विचार केला तर ‘अस्पृश्याच्या मुलाचा पहिला प्रश्न’ या केशवसुतांच्या कवितेचा उल्लेख करता येईल. आणखी काही कविता असू शकतात. असू शकतात असेच म्हणता येईल.
आजच्या काळाचा विचार करता उदाहरणार्थ चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, बौद्ध धर्म स्वीकार हे खरे तर मोठ्या कादंबरीचे विषय आहेत. त्या त्या घटनांचा समाजावर जो व्यापक परिणाम झाला आहे तो साहित्यकृतीतून पुढे आला पाहिजे होता. पण तसे दिसून येत नाही, परंतु अगदीच लिहिले गेले नसेल असे नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे ते इतके उल्लेखनीय दिसून येत नाही. सुरेश भट सोडले तर कवितेतही हळूच स्वरूपाचा वावर आढळत नाही. सुरेश भटांनी तर बौद्ध धर्म स्वीकारला होता. आता ‘युगानुयुगे तूच’ ही अजय कांडर यांची डॉ. आंबेडकरांवरील दीर्घ कविता तसेच निरजा यांच्या काही कविता सोडल्या तर काही चटकन आढळून येत नाही. प्रथितयश लेखकांच्या संदर्भात चटकन काही सापडत नाही. कुसुमाग्रजांच्या कवितेत काही संदर्भ असू शकतात. विलास सारंग यांची ‘भीमा गावाला जातो’ नावाची कथा आहे. असे थोडेफार लिखाण दिसून येईल. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे यांच्या कादंबर्यांत जाती प्रश्नासंदर्भात काही उल्लेख जरूर दिसून येतात, पण ते फार महत्त्वपूर्ण केंद्रस्थानी असलेले नाहीत.
हा विषय मोठ्या अभ्यासाचा आहे. महाराष्ट्रात तसे प्रयत्न थोडेफार प्रमाणात झालेले आहेत का? ते पुढे आले पाहिजेत. इतर राज्यांतील परिस्थिती आपल्याला माहीत नाही. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे जाती प्रश्नाबद्दल ऊहापोह करणे वेगळे आणि त्या संदर्भातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची योगदानाची ठोस मांडणी करणे वेगळे. असे असले, तरी आज एक वस्तुस्थिती आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. ती म्हणजे, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतरची परिस्थिती आणि आधीची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचे अंतर दिसून येईल. बाबासाहेबांचे अनुयायी एन. शिवराज यांनी म्हटल्याप्रमाणे ‘जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर भारी ठरतील’ आणि ते सत्यात उतरले आहे. आज आंबेडकरांना जवळजवळ एका दैवताचे स्वरूप लागल्यासारखे आहे. भगवान बुद्धांच्या खालोखाल त्यांच्या उल्लेख केला जातो आहे. आणि एकदा व्यक्ती या पदावर जाते तेव्हा कुठलीही मांडणी करताना सारासार विचार करणे भाग पडते. कारण ते एका समुदायाच्या अस्मितेचा विषय झालेले असतात. आणि त्यामुळे वस्तुनिष्ठतेलाही वाव राहात नाही. त्यांच्याबद्दल चांगलेच लिहिले गेले पाहिजे किंवा काहीही लिहिता कामा नये अशी परिस्थिती निर्माण होते. आज थोड्याफार प्रमाणात तशी परिस्थिती आहे. अर्थात, अरुण शौरींसारख्या पूर्वग्रहदूषित जातीयवादी भूमिकेतून केलेल्या बकवास आणि फालतू लिखाण करणार्यांना विरोध होणे स्वाभाविक आहे. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला योग्य तो न्याय देत एक वस्तुनिष्ठ लिखाण शशी थरूर यांनी नुकतेच केलेले दिसून येईल. आंबेडकरांच्या कार्याबद्दल आदर बाळगूनही त्यांनी त्यांच्याशी असलेले मतभेद चांगल्या पद्धतीने व्यक्त केले आहेत. त्याच्यावर वादविवाद होऊ शकतो. पण कशा स्वरूपाचे लेखन केले जावे याचा एक वस्तुपाठ आपल्याला दिसून येईल.
असो, जातीचा प्रश्न निकाल निघालेला नाही. पुढील काही दशके तो निकालात निघेल असे नाही आणि आता तर जाती व्यवस्था समर्थक लोक सत्तेवर आले आहेत. मनूचे आणि नथुरामचे समर्थक आणखी काही वर्षं तरी जातीव्यवस्थेला पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न करतील. त्यांना भारतीय राज्यघटना बदलायचे आहे. याचे एकमेव कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अजरामर झालेले नाव पुसून टाकायचे आहे इतिहासातून नामशेष करायचे आहे. अशा परिस्थितीत फुले, शाहू, आंबेडकर प्रासंगिक राहतील. पुढील काळात त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कलाक्षेत्रांमध्ये दखल घेतली जाईल अशी आशा करू या.
लेखक संपर्क : ९८६९३९२१५७
वरील चित्र चित्रकार संजीव सोनपिंपरे यांचे आहे. त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मुंबई येथून १९९३ साली पेंटिगमध्ये पदवी घेतली. त्यांना २००० मध्ये युनेस्को – अश्चेब्रग पुरस्कार मिळाला आहे. लोकसत्तेचे कला समीक्षक अभिजीत ताम्हणे यांनी “लोकांपर्यंत पोहोचणारी दलित कला” या लेखात त्यांच्याबद्दल म्हटले आहे, “१९९०च्या दशकापासून मुंबईच्या गरिबांची स्थिती टिपण्याची खास आस त्यांना जाणवायची. श्रमिकांच्या छायाचित्रांवर आधारलेल्या कलाकृती ते २१ व्या शतकाच्या सुरुवातीला करू लागले आणि गेल्या दशकभरात तर त्यांच्या कलाकृती थेट राजकीय आशय मांडत आहेत. सर्वहाराना केंद्रस्थानी मांडणार्या समाजविचारांची परंपरा शोधण्याचे काम त्यांच्या कलाकृतींनी केले आहे.”
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन विशेषांका’निमित्त त्यांचे हे चित्र…