बालाजी मदन इंगळे - 9881823833
“घरात इन-मीन तीन माणसं; तेबी तीन तर्हेचे तीन. तात्याला दूध फायजे. ल्योकाला च्या फायजे आन् आर्धा जलम कडला आला, पर नवर्याला दूध पेवं का च्या पेवं आजू कळालनी! घ्या ढोसा एकदा. एकटीनं कितीमन करावं. घरातबी शेतातबी…”
घराच्या मेन दरवाज्याजवळ घोंगडं टाकून बसलेल्या तात्यापुढं दुधाचा कप, टीव्हीसमोरच्या खुर्चीत बसलेल्या ल्योकापुढं चहाचा कप आणि पोतं टाकून अध्ये ना मध्येच बसलेल्या आपल्या नवर्यापुढे चहाचा कप आदळत सरूबई बोलत होती.
आत्ता-आत्ता दिवाळी संपलीय. थंडीचे दिवस आहेत. सकाळची वेळ आहे. सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात. आंघोळ झाल्या-झाल्या तात्याला गरमागरम दूध लागते. सत्तर वर्षांच्या पुढे तात्यांचं वय झालंय. त्यामुळं तात्याला सगळं टाईम टू टाईम लागतंय. जराबी उशीर झाला की तात्याची चिडचिड होते. मग ते काहीपण बडबडत राहतात. ही बडबड सरुबईला सहन होत नाही. कारण घरी सगळं कामधाम करणारी ती एकटीच आहे. दोन मुली दिल्या घरी गेल्या. नवरा आहे. पांडुरंग त्याचं नाव. पण सारा गाव पांडबा म्हणतो. एक मुलगा अनिल आहे. त्याला पुढच्या वर्षी तिसावं वर्ष लागेल. पण अजून त्याचं लग्न झालं नाही. त्याचं लग्न का झालं नाही तर तो अजून काहीच काम करत नाही. काम का करत नाही तर त्याला जे काम करायचं आहे, त्याच्यासाठी भांडवल नाही. भांडवल का नाही, कारण घरची परिस्थिती गरिबीची आहे. गरिबीचं कारण म्हणजे फक्त पाच एकर शेत आहे; तेही दोन जागी. दोन एकरचा गावकरी मळा आहे. मळा फक्त नावालाच. विहिरीला पाणी नाही आणि बोअर घ्यायची हैसियत नाही. म्हणजे कोरडवाहू. तीन एकर तिकडं लेंडी शिवारात आहे. ती पण कोरडवाहूच. घरात पिढ्यान्पिढ्याची गरिबी. बैल ना बारदाना. एक म्हैस तेवढी घरात. त्या म्हशीच्या दुधावर आणि शेतातून आलेल्या पायली पाच शेरावर पोटपाणी भागतंय तेवढंच.
पांडबानं धाडसानं काढ-घाल करून दोन मुलींची लग्न कशीतरी उरकून टाकली आहेत. त्या लग्नाचं देणं अजून आहेच डोक्यावर. अनिल एम. ए. पर्यंत शिकला. पण नोकरीचं काय कुठं जमलं नाही. एक तर असं-तसंच शिक्षण झालेला आणि त्याच्यात कॉलेजपेक्षा मित्राकडेच जाणं जास्त. त्याच्या मित्राचं किराणा दुकान आहे तालुक्याला. तिथे बसण्यातच त्याचा वेळ गेला. कॉलेज संपल्यावर इकडं-तिकडं नोकरी मिळते का बघितलं. पण कुठं काही जमलं नाही. मग बसला शेतातच बापाला मदत करत.
अनिलला गावात एक मोठं किराणा दुकान टाकायचंय. यासाठी त्याचा तालुक्याचा किराणा दुकानदार मित्र मार्गदर्शन करतो आहे. मुळात ही आयडीयाच त्या मित्राची आहे. गावात बारकी-बारकी दुकानं आहेत. त्यापेक्षा एक होलसेल दुकान काढलं तर खूप चालंल, असं त्या मित्राचं आणि अनिलचं पण म्हणणं आहे. आणि ते बरोबर पण आहे. पण मेन गावात भाड्याचे दुकान घेणे, किराणा माल भरणे या सगळ्यासाठी कमीत कमी एक लाख रुपये तरी सुरुवातीला लागतात. मग हे एक लाखाचं भांडवल आणायचं कुठून?
नुसतं एक लाखाचं भांडवलच नाही, तर दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले पैसे, दोन खोल्यांचं बारकं घर वाढवून त्येला मोठं करणं, अनिलचं लग्न, शेतात कायमस्वरुपी पाण्याची सोय करणं अशी बरीच कामं आहेत. या सगळ्यांसाठी लागतो पैसा. हा पैसा आणायचा कोठून? अनिलला एक मार्ग सापडला आहे. गावकरी दोन एकर जो मळा आहे, त्याला गिर्हाईक आहे. एकरी दीड लाख रुपये द्यायला गिर्हाईक तयार आहे. तेवढं विकलं की सगळं सुरळीत होतंय, म्हणजे दुकान टाकता येतंय. शेतात पाण्याची सोय होत्याय. आपलं लग्न होतंय. असा अनिलने विचार केलेला.
एके दिवशी रात्री सगळे मिळून जेवण करताना संधी बघून अनिलने हळूच विषय काढला-
“मी काय म्हणतो तात्या, आपली काय शिस्त लागंना. शेतावर तर काय भागंना. उगू बंडाळंच बंडाळ चालू हाय. गावात मी एक किराणा दुकान टाकावं का मनून विच्यार करलालाव. माझा एक मित्र हाय की तालुक्याला किराणा दुकानदार. त्येनं मदत करतो म्हणलाय. मालबी उधारीवर देतो म्हणलाय आन् आपल्या गावातबी मोठ्ठं दुकान नाही. टाकलं तर चांगलं चलतंयबी.”
तोंडातला घास गिळून तांब्यातलं पाणी पेत तात्या म्हणले –
“टाक की मग. चांगलंच हाय की.”
हे ऐकून सरूबई आणि पांडबालाबी बरं वाटलं. आपला ल्योक कायतर करायचा विचार करतोय म्हणून.पांडबा म्हणाला-
“आरं चांगलं हाय की मग.”
तात्याच्या चेहर्यावरचे भाव टिपत अनिल पुढे म्हणाला –
“किराणा दुकान भाड्यानं बघावं लागंल. पयल्यासुरू सगळाच माल काय उधारीवर मिळंतनी. कई माल दुसरीकून नगदी पैसे दिवून घेवं लागतंय. एकदा नगदी घेटलं की मग पुडं आपल्याला उधारीवर मिळतंय. या सगळ्या गोष्टीचा मी विच्यार केलाव. या सगळ्यासाठी कमीत कमी एक लाख रूपय तर लागत्यात.”
तात्याच्या चेहर्यावरचे भाव काहीच बदलले नाहीत. हात धुऊन तात्याने ताट बाजूला सारले. मागे सरकून ते भिंतीला टेकून बसले. पांडबा मात्र आश्चर्याने म्हणाला –
“आं एवडे पैसे?”
सरूबईचा घास मात्र तोंडातच घोळत राहिला.
कमरेची चंची काढून हातावर तंबाखू घेऊन ती चोळत तात्या म्हणाले-
“आरं मग एवडे पैसे कुठून आणणारायंस?”
तिघांच्याही चेहर्याकडे बघून अंदाज घेत सावधपणे अनिल म्हणाला-
“तात्या, आपलं गावकरी दोन एकर मळा हाय की. काय पिकलालंय त्येच्यात? उगू पडूनच हाय की. त्येला गिर्हाईक हाय. दीड लाखाला एकर घेतो मनलालंय. ती ईकू. त्या पैशात दुकानबी होतंय. लोकाचं देणंबी फिटतंय. आजू दोन खोल्याबी काडनं होतंय. लेंडीच्या माळावरल्या शेतात याच पैशातून कायतर पाण्याचं करता येतंय. कुठंवर उगू वडवड करावं. हाय त्येच्यात कितीही केलं तर कायबी शिल्लक र्हायना. जरा उलाढाल करू. आपलंबी घर जरा पुढं आणू.”
पांडबाला आणि सरूबईला ल्योकाचा विचार पटत होता. पण तात्या हे ऐकून एकदम भडकले आणि म्हणाले-
“मळा इकायचं नाव काढायचं नाही. बापजाद्याची प्रॉपर्टी हाय. ती लक्षुमी हाय आपली. तुमी बाहीर कायबी करा. पर मळा इकायचा इच्यारच करायचं नाही. मी जिवंत आसीपरेंत मळ्याला हात लावू देणार नाही.”
पांडबाकडे बघून अनिल म्हणाला –
“अण्णा, तुमी तर सांगा तात्याला. दुकान चांगलं चाल्लं तर आपुन आसले किती मळे घिऊनी.”
पांडबालाबी पटलं. पांडबा तात्याला म्हणाला –
“तात्या, आनिल मनतोय ते खरं हाय. आपलं घर सावरंल बघा ह्येच्यामुळं. आपले भावभावकीच बघा की कुटल्या कुटं गेल्यात. आपुनंच उगू हुडव्याभवती गवर्या हुडकत बसलाव.”
पांडबाकडं बघत तात्या म्हणाले –
“पांडबा, तूबी नाव काडायचं नाही मळ्याचं. आरं आपले बापजादे जगले कशावर? आपुन जगलालाव कशावर? आज त्या शेतामुळं तर जिवंत हाव. ती मळा नसलासता तर काय झालासतं? कुटं राहिलासतो आपुन? आरं ती मळा मंजी देव हाय आपला. आन् घरातले देव कोण ईकतंय का?”
पांडबाला तात्याचं म्हणणं पटत होतं. बापाच्या आणि ल्योकाच्या मध्ये कुणाची बाजू घेवं ते पांडबाला कळंना. अनिलचं ऐकलं की अनिलचं बरोबर आहे, असं वाटत होतं. तात्याचं ऐकलं की तात्याचं बरोबर आहे, असं वाटत होतं. म्हणून पांडबा गप्पच बसला. सरूबईनं सगळ्यांची मुसरी ताटं गोळा केली. बाहेर भांडी घासायच्या जागी नेऊन ठेवली आणि तात्या पुढे बसून तात्याला समजावणीच्या सुरात म्हणाली –
“तात्या, अनिलचं पटतंय हो. आता तुमचे आमचे राहिलेच किती दिवस. राहिल्याले चार दिवस तर जरा सुखात राहू. लेकराचं लग्नाचं वय गुजरून चाललंय. त्येचं लगीन हू द्या. मार्गाला लागू द्या. आन् सगळं शेत कुटं इकलालाव. लेंडी माळावरलं वावर हायच की. तीच लक्ष्मी हाय म्हणून तिची पूजा करू. गावकरी तेवडं ईकू द्या..”
सगळं ऐकून तात्या गपचिप. काहीच बोलले नाहीत. चेहर्यावर काळजी मात्र दिसत होती. तात्या गुडघ्यावर हात ठेवत उठले. आपली काठी घेतली. काठी टेकवत-टेकवत दारापर्यंत आले “आणि मळ्यात आधी माझी माती करा आन् मग मळा इका,” असं म्हणत दारातून हळूहळू तात्या बाहेर गेले.
हे ऐकून अनिल जागेवर स्तब्ध होऊन बसून राहिला. पांडबा इकडून-तिकडं येरझर्या घालू लागला. सरूबई अंगणात जोरानं भांडी आपटत घासू लागली.
अनिलनं जिद्द सोडली नाही. गावकरी दोन एकर विकायचं आणि दुकान टाकून घर सावरायचं, असं त्यानं ठरवलं होतं. मोक्याच्या जागी असल्यानं शेताला गिर्हाईक मागेच लागलेलं होतं.
तात्या आज ना उद्या तयार होतील म्हणून पांडबाला सोबत घेऊन अनिलनं सगळा व्यवहार ठरवला. पण शेत तात्याच्या नावाने असल्याने तात्याचा अंगठा त्या कागदावर आवश्यक होता. तो सह्यांचा कागद एके दिवशी अनिल घरी घेऊन आला. तात्याच्या समोर त्यानं पांडबाची, सरूबईची सही घेतली. स्वतःची सही केली आणि तो कागद आणि शाईचा पॅड अंगठा करण्यासाठी तात्यापुढं ठेवला. त्या कागदाकडे न बघता तात्या दुसरीकडे बघू लागले. अनिल म्हणाला –
“तात्या, जास्त ईच्यार करू नका. माझ्या जिंदगीचा प्रश्न हाय. पुन्हा मला कोण पोरगी द्याचं नाही. एकदा एवडं हू द्या. मग बघा आपलं घर गावात एक नंबर करतो का नाही. चार दिवस आपुनबी सुखात र्हावं आसं वाटतनी का तुमाला?”
गप्प ऐकून घेत तात्या म्हणाले –
“ते कायबी आसू. माझी लक्षुमी मी ईकणार नाही.”
अनिल म्हणाला –
“आंगटा करताना तुमाला तरास हुलालाय ही माहिताय मला. पर आपल्या गरिबीचा, तुमच्या नातवाचा एकदा इच्यार करा. एकदा जम बसला की असले ढिगारा शेतं घेतो. हे बघा हे कागद आन् हे प्याड इथं टीव्हीपुडं टेबलावर ठिवलालाव. निवांत आजू एक दोन दिवस इच्यार करा आन् मग आंगटा करा.”
—
अनिल एवढं बोलून निघून गेला. तात्याने त्या कागदाकडं बघितलं सुद्धा नाही.
बघता-बघता आठ दिवस झाले तो कागद टीव्हीसमोर टेबलावर आहे तसाच आहे. तात्यानं त्याकडं एकदाही बघितलं नाही. अनिल मात्र दररोज सकाळ-संध्याकाळ त्या कागदाकडे बघतो. अधून-मधून सरूबाई आणि पांडबाही त्या कागदावर तात्याचा अंगठा दिसतो का बघत आहेत. पण अंगठा काही दिसला नाही. आठ दिवस मात्र खूपच तणावात गेले. घरातला संवादच कमी झाला. तात्या सकाळी दूध घेतात आणि आपल्या घोंगडीवर बसून राहण्यापेक्षा काठी टेकवत-टेकवत हळूहळू मारुतीच्या पारावर येऊन बसतात. आधी असं घर सोडून तात्या बाहेर येत नसत. कारण दुपारी घरी कोणी नसायचं. सरूबई-पांडबा शेताकडे गेले की संध्याकाळीच यायचे. अनिल घरात नसायचाच. म्हणून तात्या घर धरून राहायचे. पण गेल्या आठ दिवसांपासून तात्या घरात थांबतच नाहीत. घरातून त्यांचं मनच उचाट खाल्लंय. सकाळी पारावर येऊन बसले की भूक लागल्यावरच घराकडे येतात. दार उघडतात. चुलीसमोरचं वाढून ठेवलेलं ताट घेतात. जेवढं जाईल तेवढं जेवतात आणि आपल्या घोंगड्यावर येऊन बसतात. अलिकडं तर तात्याचं ताट तसंच भरलेलं चुलीपुढे राहू लागलं आहे. जेवणच कमी केलंय तात्यांनी. दिवसभर ते पारावरच बसून राहतात. कधी-कधी रानातून आल्यावर पांडबा पारावर जाऊन तात्याला घरी घेऊन येतो.
पांडबाला आणि सरूबईला आता तात्याची आणि अनिलची दोघांची काळजी लागली आहे. अनिल मात्र इकडे सगळ्या जुळवाजुळवीच्या कामाला लागलाय. गावच्या मध्यभागी एक चांगलं दुकान त्यानं बघून ठेवलंय. त्याचं भाडं ठरवून ठेवलंय. तालुक्याच्या किराणा दुकानदार मित्राकडे काय-काय माल घ्यायचा, याची यादी करून देऊन आलाय. कपाटं, रॅक, डब्बे याची जुळवाजुळव सुरू आहे. तात्या मात्र मौनात गेले आहेत. अंगठा करतील की नाही कुणालाच काही सांगता येईना.
आठ दिवसांनंतरची एक सकाळ. सगळेच घरात आहेत. टीव्हीसमोर टेबलावर तो कागद तसाच आहे. या आठ दिवसांत कोणीही त्या कागदाविषयी व तात्यांच्या अंगठ्याविषयी विषय काढलेला नाही. तात्या घोंगड्यावर बसले आहेत. सुनेने दिलेले दूध फुकून सावकाश पीत आहेत. चुलीवर चहा शिजत आहे. ओल्या काटक्यामुळे चुलीत धूर झालाय. धूर घरभर पसरला आहे. सरूबईच्या डोळ्यात धुरामुळे पाणी आले आहे. अनिलकडं बघितलं तर त्याला बाहेर जायची घाई होती. चहा लवकर शिजत नव्हता. खुर्चीत बसल्या-बसल्या अनिल म्हणाला –
“अई, झाला का नाही च्या. किती धूर झालाय घरात? तुझ्या डोळ्यातबी पाणी आलंय की. गॅस घ्या म्हणून किती दिवस झाले मनलालाव. कोन आयकंना माझं.”
सरूबई म्हणाली –
“सगळ्या गावात ग्यास झालाय. एक घर सापडायचं नाही ग्यास नसल्यालं. सगळ्या गावात आपल्या घरातूनच तेवडं धूर निघलालंय. किती डोस्कं बडवावं ग्यास घ्या ग्यास घ्या मनून…?”
हे ऐकून खाली पोत्यावर बसलेला पांडबा म्हणाला –
“ग्यास घ्याचं मनल्यावर काय लागतंय का नाही. ग्यासवाल्याला का चिचुके देवं?”
दूध पेत हे सगळं ऐकत बसलेले तात्या म्हणाले –
“सूनबई, आपला जलम गेला चुलीवर करून. तुझी सासू, आज्जी सासूबी चुलीवरच करत होत्या. चूल तर घरची लक्षुमी आसत्याय. तिला कसं बंद करावं? आन् आपल्याला ग्यास परवडणार हाय का?”
सरूबई काय बोलायच्या आधीच अनिल मध्येच म्हणाला-
“म्हणूनच मनलालाव तात्या, ह्या कागदावर आंगटा उटवा. सगळं परवडतंय का नाही बघा आपल्याला. जग कुटं चाल्लंय, आपुन कुटं चाल्लाव.जगाबरूबर र्हावं लागंल का नाही!”
तात्या म्हणाले –
“जग कुटं का जाईना बाबा. जगाबरूबर पळायला आपल्याला कसं जमतंय? आपुन आपली पायरी वळकून र्हावं. आवसानापरीस मोट्टा दगड उच्चल्लो की आपल्याच पायावर पडतंय. ऊनाळ्यात जरा झाडफाटे तोडून बरलं घालावं. जळण तोडून नीट रचून ठिवावं. गवर्याचे उडवे लिंपावं. हे सगळं सोडले आन् ग्यास घ्या मनलाले. एवडं सगळं केल्यावर ग्यास कशाला लागतंय. आरे, आपापले कामं नीट करा. सगळं नीट होतंय. कष्ट करायचं सोडले आन् आयतं द्या मन!”
एवढा वेळ हे सगळं बोलणं ऐकत बसलेला पांडबा म्हणाला –
“तात्या दोन्ही वावरात एवडं रात ना दिस राबलालाव. काय पदरात पडलालंय सांगा बरं?”
“आरे, का उपाशी मरलालाव का? पोटभर खायला तर मिळलालंय का नाही. शेतकर्याला शेत कदीच उपाशी मरू देतनी ध्यानात ठिवा आन् मनून ती शेत मला इकायचं नाही तात्या.”
मध्येच अनिल म्हणाला –
“निसतं पोट भरल्यावर झालं का तात्या? पोटाच्या पलिकडबी काय गरजा आसत्यात का नाही? आजकाल शेंबड्या पोरावाकडबी भारी-भारी मोबाईल हायत. गाड्या घिऊन फिरत्यात. माझ्याकडं काय हाय? कायबी नाही. तालुक्याला जायचं मनलं तर कुणाच्याबी हातापाया पडून गाडीवर बसून जावं लागतंय. माझ्या वयाच्या पोरावाचे लग्नं झाले. त्येन्ला लेकरं झाले. आमचं आजू कशात काय नाही. कोण पोरगी द्याला तयार नाही. बेकार, बिनकामाच्या पोराला कोण पोरगी दिल? जरा दुकान टाकावं, चारचौघासारकं राहावं मनलं तर तेबी नाही. काय त्या शेतात एवडं हाय की काय नाही की.”
तात्या म्हणाले –
“आरं, ती गावकरी मळा बघून तर माझं तुझ्या आज्जीसंगं लगीन झालतं. आत्ता एक पाऊसपाणी कमी हाय मनून पिकत नसंल. पर तवा काय मळा पिकतोता मनतूस! त्या दोन एकरातल्या राशीनं घर भरून जायचं. तितली मातीच येगळी हाय. सोनं पिकतंय त्या मातीत सोनं. गावातले सगळे मळ्यातलं पीक बघून हारखून जायचे. मधी तुझी आज्जी आजारी पडली. तिचा आजार लईच वाडलता. मोठ्या दवाखान्यात न्हेवं लागलं. तवा एवढा पैसा आडका जवळ नव्हता. मनून केशवराव सावकाराकडून पैसे काडलो. दवाखाना केलो. तुझी आज्जी मरता-मरता वाचली. पर इकडं त्या केशवराव सावकाराचा डोळा आपल्या त्या मळ्यावर. पैसे फेडायला उशीर हुलाला. आन् केशवराव सावकार, “मळा नावानं करून दी आजून पैसे देतो” म्हणून मागू लागला. पर मला मळा हातचा जाऊ द्याचा नव्हता. दोन सालं त्या केशवराव सावकाराच्यात गडी मनून नोकरी केलो. तुझी आज्जी मळ्यात एकटी राबली. तवा ती मळा सुटला. सावकाराचं देणं फिटलं. पुडं त्या मळ्याच्या जीवावरच लेंडी शिवारातलं शेत घेटलो. तुझी आज्जी आन् मी लई राबलाव या मळ्यात. रात मनाया नाही पाट मनाया नाही. उगं राबायचो. ह्येच्यातच तुझ्या आज्जीचा आजार पुन्हा वर आला. आन् त्येच्यातच गेली बिचारी…”
बोलता-बोलता तात्याचा आवाज कातर झाला. डोळे भरून आले.
“एवडं सगळं दिलंय मळ्यानं आन् तुम्ही मळा इका मनलालाव,” एवडं बोलून तात्या गप्प झाले. धोतराच्या सोग्याने आपले डोळे पुसले. आणखी बोलावं वाटत होतं. पण दम लागल्याने ते गप्प झाले. तेवढ्यात तात्याला खोकल्याची उबळ आली. ते खोकत बसले.
मध्ये थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग अनिल म्हणाला –
“हे खरं हाय तात्या. मलाबी माहीत हाय सगळं आन् सगळं मान्यबी हाय. पर आता पयलंसारकं पाऊसपाणी तर कुटं राहिलंय. राशीबी पयलंच्यावनी नाहीत. लोकं शेतापरीस धंद्याकडं चाल्ल्यात. आपुनबी बदलत्या काळाबरूबर राहावं लागतंय. मला तर कुटं हौस हाय का इकायची? पर येळच तशी आल्याय. मळा ईकलेल्या पैशातून लेंडी शिवाराच्या तुकड्यात आपुन एक बोर घिऊ. त्या शिवारात पाणीबी हाय आन् तिथं चांगला जम बसवू. इकडं माझाबी जम बसतंय. सगळं सवाशी होतंय. म्हणून माझी ही कोशिश चालू हाय.”
अनिलचं बोलणं ऐकून तात्या काहीच बोलले नाहीत. गुडघ्यावर हात ठेवून ते हळूच उठले. भिंतीला टेकवून ठेवलेली आपली काठी घेतली आणि हळूहळू ते घराबाहेर पडले. पाराकडे निघाले.
गेल्या एक महिन्यापासून तो कागद अजूनही टीव्ही समोर टेबलावर तसाच आहे. त्यावर सगळ्यांच्या सह्या झाल्यात. फक्त तात्यांचा अंगठा तेवढा व्हायचा बाकी आहे. अनिल, सरुबई, पांडबा तिघेही दररोज त्या कागदाकडे बघत आहेत, तात्यांनी अंगठा केला का म्हणून. पण तात्यांनी अजून त्या कागदाकडे एकदा पाहिलेले सुद्धा नाही. अनिलची तगमग दिवसेंदिवस वाढत आहे. तात्यांनी अंगठा नाही केला तर कसं, याचा विचारच त्यानं केलेला नाही. करतीलच असे त्याने गृहीत धरलेलं आहे. पण दिवस जातील तसा तो अस्वस्थ होतोय. काय करावं त्याला सुचत नाही. इकडं सगळी जांगजोड करून ठेवलेली आहे. आई-वडिलांच्या पुढं तो आपली तगमग व्यक्त करतोय. पण सरूबई आणि पांडबालाही काय करावं कळत नाही.
तो सहीचा कागद टीव्हीसमोर टेबलावर ठेवलेला आज एकतिसावा दिवस आहे. सकाळची वेळ आहे. सगळेजण घरात आहेत. आणि सरूबईने तात्यापुढे दुधाचा कप, अनिल आणि पांडबापुढे चहाचा कप आणून आदळलेला आहे आणि “एकटीनं किती मन मरावं. शेतातबी, घरातबी,” असं ती स्वतःशीच म्हणते आहे आणि पुढे सगळ्यानांच ऐकू जाईल, अशा मोठ्या आवाजात म्हणते-
“ग्यास घ्या मनलं पैसे नाहीत. काय घरात नवनजुनं घ्यावं मनलं पैसे नाहीत. एकुलत्या एका पोराचं वय गुजरून चाल्लं. लगीन करावं मनलं तर कोण पोरगी देना. कुणासाठी राबावं एवडं? लेकरानं दुकान टाकतो मनलं, शेताघरासाटी काय करतो मनलं तर त्येच्याकडं कोण ध्यान दिना.”
मध्येच आपल्या नवर्याकड बघत म्हणाली –
“व्हय ओ. काय करायचं ठरीवलो मग. का पोराला आसंच वार्यावर सोडायचं ठरीवलाव. आज काय ती निकाल लावाच. तात्याला तर कितीबी सांगून पटंना. आता तुमीच कायतर करा. कायबी करा पर माझ्या पोराला लाख रूपय कुटूनबी आणून द्या. एकदा त्येला दुकान टाकू द्या. त्येचं त्येला मार्गी लागू द्या. रोज आसं हातावर हात ठिवून बसनुका.”
एवढं ऐकून पांडबा म्हणाला –
“मी कुटून आणू लाख रुपय? लाख रुपय मंजी का खायची गोष्ट वाटली का तुला? जरा दम धर. तात्या आज ना उद्या करतील आंगटा.”
“आज ना उद्या मनत म्हयना उलटून गेला. आसंच वरीस जाईल. माझ्या पोराला बिना लगनाचं ठिवताव का काय?”
एवढा वेळ गप्प बसलेला अनिल काहीतरी ठरवल्यासारखं निश्चयानं म्हणाला-
“आई, तात्या, अण्णा बघा इतं सगळेच हाव. तात्याच्या आंगठ्यावर माझी आन् या घराची जिंदगी हाय. दोन दिसात तात्यानं आंगठा नाही केला तर मग मलाच घर सोडून कुठं तर जावं लागंल. तेबी कायमचं,” असं म्हणून अनिल खुर्चीवरून उठला आणि तरातरा घराबाहेर गेला. पांडबानं तात्याकडं पाहिलं. तात्या शांत होते.
“मी जातो गं म्हैस घिऊन पुडं. तू ये मागून,” असं म्हणत पांडबा पण उठला आणि घराबाहेर पडला.
“ माझंच पोरगं इतं राहणार नसंल तर ह्या शेताघराला घिऊन का चाटायचाय का? सगळं करायचाय तर त्या एकुलत्या एक लेकरासाठी तर करायचाय. त्येनंच नसंल तर कुणाला तर घिऊन काय करायचाय. तात्याचाबी काय जीव अडकलाय की त्या मळ्यात काय नाही की. आंगटा करून मोकळं व्हायचं सोडून उगू आडून बसल्यात माय. आता आर्ध्या गवर्या मसनात गेल्या. राहिल्यात आपले दोन दिवस. नीट राहायचं. सगळ्याच्या मनासारकं राहायचं. हे सोडले आन् बसल्यात आडून. ती मळा का संगं घिऊन जायचाय का काय! तुमचं संपलं की आता. ती मळ्याचं पुडं काय करायचं काय नाही आमचामी बघताव की.”
तात्याला ऐकू जावं असं काय-काय बोलत सरुबई उठली. स्वयंपाक करायला चूल पेटवायची म्हणून घराच्या मागं रचून ठेवलेल्या कोयल्या आणायला गेली. गेली तरी तिची बडबड चालूच होती. आता घरात फक्त तात्याच होते. गुडघ्यावर हात ठेवून तात्या हळूच उठले. आपली काठी घेतली. हळूहळू काठी टेकवत टीव्हीसमोर टेबलावर ठेवलेल्या त्या कागदाच्या जवळ आले. आपल्या थरथरत्या हाताने कागदाच्या शेजारी ठेवलेला पॅड त्यांनी उघडला. त्या शाईत आपला अंगठा बुडवला व थरथरत्या हातानं त्या कागदावर ज्या नावापुढे सही करण्याची जागा रिकामी होती तिथं आपला अंगठा उमटवला. अंगठा उमटवून हात बाजूला काढताना उमटलेल्या अंगठ्याशेजारी टपटप दोन अश्रू पडले. तात्यांनी पॅड व्यवस्थित बंद केला आणि मळा एकदा शेवटचा बघून घ्यावा म्हणून काठी टेकवत-टेकवत जड पावलांनी हळूहळू ते मळ्याकडे निघाले. सरूबई बनवणार असलेली भाकरी खायला आता तात्या परत येतील की नाही, हे तात्यांनाही माहिती नव्हतं…
– बालाजी मदन इंगळे, मु. एकोंडी (ज.), ता. उमरगा, जि. उस्मानाबाद (लेखक संपर्क : 9881823833)