छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार

डॉ. शंतनु अभ्यंकर - 9822010349

खरं सांगायचं तर पर्यायी असं काही वैद्यक नसतंच. पर्यायी वैद्यक म्हणजे ज्या औषधोपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता पुरेशी नाही किंवा तपासलीच गेलेली नाही, असे सगळे औषधोपचार. यातल्या एखाद्या औषधाची परिणामकारकता लक्षात आली आणि सुरक्षिततेचीही खात्री पटली, तर ते औषध ‘पर्यायी’ वगैरे काही राहत नाही. मग ते वैद्यकीच्या मुख्य प्रवाहात सामील केले जाते.

अहो, जगभर सगळ्यांनाच आज्या होत्या आणि त्यांच्याकडे बटवेही होते. त्या बटव्यातील काही औषधे उपयोगी, काही निरुपयोगी; तर काही चक्क तापदायक निघणार, हे तर उघड आहे. शेवटी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हेच खरे. त्यामुळे पर्यायी, पूरक, पारंपरिक, नैसर्गिक, हर्बल, एनर्जी, इंटिग्रेटेड, होलिस्टिक वगैरे संज्ञा वैज्ञानिक वगैरे नसून ‘मार्केटिंग’ला सोयीची म्हणून शोधलेली लेबले आहेत.

छद्मवैद्यक म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर प्रथम नाव येतं ते होमिओपॅथीचं. त्यामुळे इथे उदाहरणे होमिओपॅथीची घेतली आहेत. शिवाय मी होमिओपॅथीचा (ही) पदवीधर असल्याने या क्षेत्रातला माझा अभ्यास थेट होमिओपॅथीशीच निगडित आहे. छद्मवैद्यकीचे हे ढळढळीत उदाहरण; बाकी काही प्रमाणात शास्त्रीय, काही प्रमाणात अशास्त्रीय अशी बरीच आहेत.

या सगळ्याला मिळून पर्यायी, पारंपरिक आणि पूरक (पपापू) उपचार पद्धती म्हटलं जातं. यांची लांबच्या लांब यादी आहे. जगभरच्या अनेक पारंपरिक उपचार पद्धती यात येतात, तसंच जगभरातल्या चित्रविचित्र कल्पना असणार्‍या लोकांनी निर्माण केलेल्या; अगदी अलिकडच्या काही ताज्या उपचारपद्धतीही या सदराखाली येतात.

आपलीच पॅथी आधुनिक वैद्यकीला पर्याय आहे, असा अनेक पॅथीपंथियांचा दावा असतो; याउलट या उपचारपद्धती म्हणजे शुद्ध भोंदूगिरी आहे, त्या अत्यंत अशास्त्रीय आहेत आणि उपचार होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा आधुनिक वैद्यकवाले तावातावाने करत असतात. पॅथी-पॅथीच्या या भांडणात, ‘तुमचंही बरोबर, यांचंही बरोबर. दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत, असा समन्वयवादी सूर लावणारे बोके नेहमीच समाजमान्यतेचे ‘लोणी’ पळवून नेतात.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळे पेशंटना या वादावादीत काडीचा रस नसतो; त्यांना फक्त बरं वाटण्याशी मतलब. कोणाच्या का कोंबड्याने असेना, सूर्य उगवला की झालं, अशी त्यांची भूमिका असते. हे ठीक आहे; पण इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे इथेही आंधळा विश्वास घातक ठरू शकतो.

‘वैज्ञानिक पुराव्याची मला गरज नाही. कारण विज्ञानाला न समजलेल्या अशा बर्‍याच गोष्टी आहेतच की!’ हे वाक्य चमकदार आहे खास. चमकदार आहे आणि विज्ञानाला सगळं समजलेलं नाही, हे खरंही आहे. ‘तुम्हालाच काही माहीत नाही, तर आम्हाला शहाणपणा शिकवणारे तुम्ही कोण?’ असा उरफाटा सवालही केला जातो. विज्ञानाला बर्‍याच गोष्टी माहीत नाहीत; पण आपल्याला काय-काय माहीत नाही, हे विज्ञानाला माहीत आहे. विज्ञानाला बर्‍याच गोष्टी माहीत नाहीत, म्हणून हे काजळकोपरे कल्पनाशक्तीने भरून काढण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आपोआप प्राप्त होत नाही. अज्ञाताच्या शोधातच विज्ञानाची प्रगती दडलेली आहे, म्हणूनच पुरेशा पुराव्याअभावी केलेला कोणताही दावा विज्ञान नाकारतं.

मुळात आधुनिक वैद्यक आणि ‘पपापू’ यांच्या पुराव्याच्या संकल्पनाच भिन्न-भिन्न आहेत. आधुनिक वैद्यक ज्याला पुरावा मानतं आणि ‘पपापू’ ज्याला पुरावा समजतात, त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. पुराव्याच्याही परी असतात. साराच पुरावा एका लायकीचा नसतो. अर्थात, काही नवीन शोधणारा प्रत्येकजण, ‘माझाच पुरावा पुरेसा,’ असा दावा करतोच. त्यामुळे कोणता आणि किती पुरावा म्हणजे पुरेसा, हे ठरवणारं शास्त्र दरवेळी लक्षात घ्यावं लागतं. यानुसार आचरण करण्याचा, पुरावाधिष्ठित वैद्यकी (Evidence Based Medicine) आचरणात आणण्याचा, आधुनिक वैद्यकीचा प्रयत्न आहे.

पुराव्याच्या शास्त्रानुसार वैयक्तिक अनुभव, वैयक्तिक निरीक्षणे, गोष्टीरूप पुरावा, पेशंटची खुशीपत्रे हा सर्वांत दुय्यम पुरावा. प्रयोगशाळेतील प्रयोग, प्राण्यांवरील प्रयोग हे त्याच्यावर. मग पुढे एखाद्या पेशंटला आलेला गुण, अनेक पेशंटना आलेला गुण, रुग्णांचा नियोजनबद्ध तुलनात्मक अभ्यास (केस कंट्रोल स्टडीज स्टडी), एपिदडेमिओलॉजिकल स्टडी, यादृच्छिक बृहदांध चाचणी (रँडमआइज्ड डबल ब्लाइंड ट्रायल) आणि अशा अनेक चाचण्यांच्या निष्कर्षांचे महाविश्लेषण (मेटा अ‍ॅनालिसिस) असे चढते थर आहेत.

तळाशी आहे, गोष्टीरूप पुरावा. ‘आऊच्या काऊला बरं वाटलं, देशोदेशीचे वैद्य, हकीम झाले; पण गुण येईना, शेवटी..,’ अशा पद्धतीचा गोष्टीरूप पुरावा. ‘पपापू’ मंडळींना असला पुरावा अतिप्रिय असतो; पण एक गोष्ट म्हणजे पुरावा आणि अनेक गोष्टी म्हणजे सज्जड पुरावा, हे समीकरण बरोबर नाही. कारण कथाकथन, पूर्वग्रहदूषित, सोयीचं तेवढंच सांगायचं, असं असू शकते. फार तर संशोधन कोणत्या दिशेने व्हायला हवं, हे सुचवण्यास अशा स्टोर्‍यांचा उपयोग होऊ शकतो.

पुरावा म्हणून बर्‍याचदा प्राण्यांतील प्रयोगांचा दाखला दिला जातो; पण जे उंदरीत घडते ते सुंदरीत घडेल असे नाही आणि जे वानरांत घडते ते नरांत घडेलच, असं नाही. मानवी अनुभव सर्वांत महत्त्वाचा.

पण शिस्तबद्ध संशोधनाची एकूणच वानवा आहे. ‘पपापू’वाल्यांनी प्रत्यक्ष रुग्णांवर केलेले अभ्यास हे देखील अत्यंत तोकडे, दर्जाहीन आणि कोणताही पूर्वाभ्यास नसलेले असतात. या अभ्यासाच्या आधारे अचाट दावे केले जातात; मात्र तोडीस तोड असा अफाट पुरावा सादर केला जात नाही.

अन्न व औषध विभाग आधुनिक वैद्यकीच्या औषधांसाठी अतिशय कडक तपासण्या, शास्त्रीय आणि काटेकोर निकष योजतो. हे योग्यच आहे; पण तोच विभाग या तथाकथित पर्यायी पद्धतींसाठी अतिशय गचाळ, तोकडे आणि निरर्थक निकष मान्य करतो. ही औषधे बाजारात येण्यापूर्वी आधुनिक औषधशास्त्रानुसारच्या, परिणामकारकता आणि सुरक्षितता जोखणार्‍या कोणत्याही तपासण्या त्यांच्यावर बंधनकारक नसतात. तपासण्या न करता बाजारात उतरता येत असेल, नफा कमावता येत असेल, तर संशोधनासाठी लागणारा प्रचंड पैसा कोण कशाला गुंतवेल? या कारणे संशोधन मागे पडत जाते. थोडक्यात, परीक्षाच न घेता पदव्या वाटल्या तर ज्या प्रतीचे पदवीधर निर्माण होतील, तीच गत या औषधांची होते आहे. अशा धोरणामुळे ‘पपापू’ वैद्यकीचा आर्थिक फायदा होत असला तरी तात्त्विक बैठक डळमळीत होत असते.

शिवाय संशोधनातून विपरीत निष्कर्ष आले तर काय करायचं, ही एक मोठीच भीती आहे. बर्‍याच ‘पपापू’ मंडळींची नकारात्मक निष्कर्ष स्वीकारायची तयारी नसते. त्यांच्या मते, त्यांचे ज्ञान हे दैवी, पारंपरिक, प्राचीन, ग्रंथोद्भव, साक्षात्कारी, स्वयंप्रज्ञा, गुरु-जात, आजीबाईंच्या बटव्यातील… वगैरे-वगैरे असल्यामुळे ते आपोआपच चिकित्सेच्या उपर असते. त्यामुळे संशोधन करून सत्याचे लचांड मागे लावून घेण्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची हे धोरण सर्वांनाच सोयीचं असतं. त्यामुळं लुटुपुटीचं संशोधन हे पुरावा म्हणून दाखवून ‘मार्केट’ मारलं जातं.

अशा भातुकलीतल्या संशोधनावर अनेक संशोधनं निबंध उपलब्ध आहेत. पैकी डॉ. एडझार्ड अर्नेस्ट यांनी प्रसिद्ध केलेला 12 एप्रिल 2021 चा ताजा निबंध येथे आधाराला घेतला आहे.

‘भारत, होमिओपॅथी, अभ्यास’ असा शोध त्यांनी ‘मेडलाईन’वर घेतला. ‘मेडलाईन’ ही वैद्यकीय संशोधनाला वाहिलेली वेबसेवा असून निरनिराळ्या संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले शोधनिबंध इथे संगतवार लावलेले आढळतात. त्यामुळे ठराविक काळातील, ठराविक विषयातील, ठराविक लेखकांचे असे निबंध एक गटवार शोधण्यासाठी या साइटचा चांगला उपयोग होतो.

त्यांना 101 शोधनिबंध आढळले. पैकी 31 निबंधांमध्ये भारतीय संशोधकांनी आपले निष्कर्ष मांडले होते. बाकी शास्त्राच्या इतर पैलूंबद्दल होते. या 31 पैकी 31 ही निबंध हे केलेल्या उपचारांचा फायदा झाला, हे सांगणारे होते! थोडक्यात शंभर टक्के निबंध सकारात्मक निष्कर्ष दर्शवणारे होते. असं कसं असू शकेल? नकारात्मक परिणाम दिसलेच नाहीत, ते तपासलेच नाहीत का, नोंदलेच नाहीत? या सर्व प्रश्नांची भुतावळ आपल्या मानगुटीवर बसते. गंमत म्हणजे आधुनिक वैद्यकीच्या संशोधनात असा टोकाचा ‘आनंदीआनंद’ आढळत नाही; म्हणजे आता दोनच निष्कर्ष उरतात. एक, होमिओपॅथी अतिशय परिणामकारक असून हर परिस्थितीमध्ये आपलं काम चोख बजावत आहे किंवा हा सगळा संशोधनाचा खेळ, पोरखेळ असून त्यात गांभीर्यपूर्वक घ्यावं असं काही नाही. ही निव्वळ धूळफेक आहे. कुठला निष्कर्ष जास्त बरोबर ते तुम्हीच ठरवा.

अमुक एक पॅथी आधुनिक वैद्यकीला ‘पर्याय’ आहे, हा तसा धाडसाचा दावा आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजे हवेतून विभूती काढावी, तशी कोणतीही जादूई चीज नाही. शरीररचनेचा सखोल अभ्यास, शरीरकार्याच्या गुंतागुंतीची जाण, आजारांबद्दल आणि आजाराला मिळणार्‍या शारीरप्रतिसादाचे ज्ञान, जंतुशास्त्र, परोपजीवीशास्त्र वगैरेंच्या पायावर आधुनिक वैद्यकशास्त्राचे उपचार उभे आहेत. इतकंच काय, हे सारं रसायन-भौतिकी-जीव या मूलभूत शास्त्रांच्या संकल्पनांशी सुसंगत आहेत. ‘पपापू’च्या कित्येक कल्पना अशास्त्रीय आणि बर्‍याचशा छद्मशास्त्रीय आहेत. उदाहरणार्थ होमिओपॅथीच्या औषधात एकही औषधी रेणू नसताना ती प्रभावी आहेत, असा दावा केला जातो.

तेव्हा ‘पर्यायी’ वैद्यक याचा अर्थ औषधोपचारांना पर्यायी औषधोपचार, इतका मर्यादित घेऊन चालणार नाही. ‘पर्यायी’वाले तसा तो घेतही नाहीत. त्यांचे पर्यायी शरीररचनाशास्त्र आहे, पर्यायी शरीरक्रियाशास्त्र आहे. उदाहरणार्थ मानवी शरीर हे ब्लड, म्युकस, येलो बाईल आणि ब्लॅक बाईल यांच्या संतुलनातून चालतं, असा एक प्राचीन सिद्धांत आहे. (बाईल म्हणजे मराठीतली बाईल नव्हे हं; ही इंग्रजी बाईल – मराठीत ढोबळ अर्थ ‘पित्त’) किंवा आजार हे ‘व्हायटल फोर्स’च्या असंतुलनाने होतात, अशीही शिकवण आहे किंवा सोरा, सिफिलिस, सायकोसिस आणि ट्यूबरक्युलोसिस या ‘मायाझम’मुळे (रोगकारक शक्ती) दीर्घ आजार होतात म्हणे. ‘यींग’ आणि ‘यांग’ यांचा तोल सारे काही सांभाळतो, असेही पर्यायी ‘शास्त्र’ आहे. कानावर विविक्षित बिंदूवर टोचताच, थेट शेंडीपासून … निरनिराळे अवयव नियंत्रित होतात म्हणे! विज्ञानाला यातलं काही म्हणजे काहीही आजवर घावलेलं नाही. आधुनिक विज्ञानाने यातल्या बहुतेक संकल्पनांचा भोंगळपणा, भंपकपणा, पोकळपणा आणि मर्यादा केव्हाच दाखवून दिल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक ‘पपापू’पॅथीचे स्वतंत्र आणि स्वयंभू शास्त्र आहे. सारे माणसाच्याच आरोग्याबद्दल आणि अनारोग्याबद्दल सांगत आहेत; पण एकाचा मेळ दुसर्‍याशी नाही. हे अजबच आहे!

माणसाला पर्यायी पचन संस्था असते का? मग पर्यायी पचनशास्त्र कसं असेल? जसं ब्रिटिश भौतिकशास्त्र वेगळं, कोरियाचं रसायनशास्त्र वेगळं, काळ्यांचं बीजगणित वेगळं, असं संभवत नाही; भारताचा ‘पर्यायी नकाशा’ संभवत नाही, तद्वतच धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा आधारित स्वतंत्र शरीरविज्ञानही संभवत नाही. कल्पना करा उद्या पाकिस्तानने E=Mc2 ऐवजी, E=Mc3 या नव्या पर्यायी ‘इस्लामी अणुशास्त्रा’नुसार आम्ही अणुबॉम्ब बनवू, असं काही जाहीर केलं, तर त्या बॉम्बला कोणी फुंकून विचारेल का?

खरं सांगायचं तर पर्यायी असं काही वैद्यक नसतंच. पर्यायी वैद्यक म्हणजे ज्या औषधोपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता पुरेशी नाही किंवा तपासलीच गेलेली नाही, असे सगळे औषधोपचार. यातल्या एखाद्या औषधाची परिणामकारकता लक्षात आली आणि सुरक्षिततेचीही खात्री पटली, तर ते औषध ‘पर्यायी’ वगैरे काही राहत नाही. मग ते वैद्यकीच्या मुख्य प्रवाहात सामील केले जाते. ‘आर्टेमेसुर’ हे चिनी जडीबुटीचे औषध मलेरियाविरुद्ध उपयुक्त ठरल्याने नुकतेच दाखल झाले आहे. अशी शेकडो उदाहरणे आहेत. असणारच. अहो, जगभर सगळ्यांनाच आज्या होत्या आणि त्यांच्याकडे बटवेही होते. त्या बटव्यातील काही औषधे उपयोगी, काही निरुपयोगी; तर काही चक्क तापदायक निघणार, हे तर उघड आहे. शेवटी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हेच खरे. त्यामुळे पर्यायी, पूरक, पारंपरिक, नैसर्गिक, हर्बल, एनर्जी, इंटिग्रेटेड, होलिस्टिक वगैरे संज्ञा वैज्ञानिक वगैरे नसून ‘मार्केटिंग’ला सोयीची म्हणून शोधलेली लेबले आहेत.

पण मुळात इतक्या अविश्वसनीय गोष्टींवर लोकं विश्वास ठेवतातच का? याची अनेक कारणे आहेत. माणसाचा मेंदू हा तर्कशुद्ध विचार करण्यासाठी मुळी रचलेलाच नाही. आफ्रिकेच्या सवाना प्रदेशात भटक्या अवस्थेत निर्माण झालेला मेंदू आधुनिक युगात वेळोवेळी आपली पुराणकालीनता दाखवून देत असतो. प्राचीन काळी स्वतःचा आणि आसपासच्या व्यक्तींचा अनुभव हेच ज्ञान आणि हाच पुरावा होता. ‘अमुक फळ खाऊ नकोस, त्याने तमुक होतं,’ म्हटल्यावर विश्वास ठेवणे किंवा फळ खाऊन विषाची परीक्षा पाहणे, असे दोनच पर्याय होते. तेव्हा अनुभवी मंडळींचा सल्ला शिरसावंद्य मानणे, हा जगणं सुलभ करणारा संस्कार होता. झाडीत कुठे सावली हलली, तर अंधुक ठिपके जोडून, झटकन तिथे वाघ आहे वा नाही, हा निर्णय करायला आपला मेंदू उत्क्रांत झाला आहे. जवळ जाऊन खात्री करू पाहणं म्हणजे जिवाची जोखीम. सावधपणे लांबून निघून जाणं म्हणजे ‘जान बची लाखों पाए.’ असे झटपट निर्णय घेण्याने, गडबडीने माहितीचे ठिपके जोडल्याने गफलती होऊ शकतात. वाघ नसताना तो आहे असं वाटू शकतं. पण कोणे एके काळी या गफलतींची किंमत फारच थोडी होती. तेव्हा ही विचारधारा उत्क्रांत होऊन त्यातल्या गफलतींसकट आपल्या मेंदूत कोरली गेलेली आहे.

आधुनिक जगात विचार करण्याची ही पद्धत लोढणं बनून राहिली आहे. आजही विश्लेषणाऐवजी, गोष्टीरूप पुरावा आपल्याला अधिक भावतो. अर्धवट पुराव्यांचे ठिपके जोडून आजही आपण नकळतपणे चित्र पूर्ण करत असतो. आजही माणसाच्या मेंदूवर बुद्धीपेक्षा भावनांचा अंमल सहज चढतो.

जेनी मॅककार्थी या प्रसिद्ध अमेरिकन नटीच्या मुलाला – इव्हानला – ‘ऑटीझम’ आहे. गोवराची लस दिल्यामुळेच ‘ऑटीझम’ झाला, असा तिचा दावा आहे. गोवराच्या आणि एकूणच लसीकरणाविरुद्ध मोठी मोहीम तिने चालवली आहे. तिला यश येऊन अमेरिकेत आता गोवराने होणारे अर्भकमृत्यू वाढत चालले आहेत. पण ‘लसीमुळे ‘ऑटीझम’ होतो, याला वैज्ञानिक पुरावा नाही. लस दिल्यानंतर काही घडलं म्हणून ते लस दिल्यामुळे घडलं, असं म्हणता येत नाही,’ असं म्हणताच जेनी डाफरली, ‘माझा इव्हान हेच माझं विज्ञान आणि इव्हान हाच माझा पुरावा!’ हे वाक्य काळजाला हात घालणारं असलं तरी अशास्त्रीय आहे. या भावनावेगातून, तर्कदुष्टतेतून, झटपट निष्कर्षातून, त्यातले चकवे चुकवत बाहेर येण्याचे ज्ञान म्हणजे विज्ञान. तर्कदुष्टता आपल्या मेंदूत कोरली गेली आहे, तर्कसिद्धता शिकावी लागते. म्हणून तर इतके सगळे लोक ‘पपापू’च्या भजनी लागलेले दिसतात.

आणि म्हणूनच तर, ‘इतके सगळे लोक वापरतात, इतक्या पिढ्या वापरतात, ते काही मूर्ख आहेत का,’ असा भ्रामक युक्तिवाद लोकांना पटतो. ‘लोकप्रियता आणि प्राचीनत्व, हीच सिद्धता’ हा एक लोकप्रिय तर्कदोष आहे. काळाच्या विशाल पटलावर अनेक कल्पना, अनेक युक्तिवाद, अनेक तथाकथित सत्य, ही लोकप्रिय (नाळेला शेण लावणे), लोकमान्य (मंत्राने सापाचे विष उतरवणे) इतकंच काय; जगन्मान्यसुद्धा (रजस्वला अपवित्र असते) होती; मात्र वैज्ञानिक निकषांवर घासून पाहता अशा कित्येक संकल्पना त्याज्य ठरल्या. थोडक्यात, जुनी पद्धत, लोकमान्यता हा कोणत्याही पॅथीच्या शास्त्रीयत्वाचा पुरावा होत नाही.

तरीदेखील काही रुग्णांना ‘पपापू’पॅथीने बरे कसे वाटते, याची अनेक संभाव्य उत्तरे आहेत.

‘पपापू’ ही ‘जुनाट आणि असाध्य’ आजारांवर उपकारक आहे, अशी समाजभावना आहे. आपला आजार ‘जुनाट आणि असाध्य’ असल्याचं मनोमन मान्य असल्यामुळे मुळात फार फरक पडेल, अशी अपेक्षा नसते. त्यामुळे पडेल त्या फरकाला रामबाण उपायांचा साज चढविला जातो.

कित्येक आजार मनोकायिक असतात. मानसिक समाधान लाभलं की, त्यांना उतार पडतो. होमिओ डॉक्टर औषध देण्यापूर्वी पेशंटची चांगली दोन तास हिस्टरी घेतात. बालपणापासून ते आवडी-निवडीपर्यंत आणि धंदा-पाण्यापासून ते बाई-बाटलीपर्यंत सगळ्याची आस्थेने आणि इत्थंभूत चौकशी केली जाते. दीड-दोन तास आपली कोणी आस्थेने विचारपूस केली, तर आपल्यालाही बरं वाटेलच की! आजार्‍याला तर वाटेलच वाटेल.

कित्येक ‘पपापू’पॅथीय नंबर घातलेल्या पुड्या देतात. त्या पुड्यांवर औषधाचं नाव नसतं. त्यामुळे पॅरेसिटमॉल किंवा स्टिरॉईडच्या पावडरीही दिल्या जात असण्याची शक्यता आहे.

कित्येक आजार औषध न घेताही काही दिवसांनी आपोआप बरे होतात. अनेकदा आजारांत निसर्गतः चढउतार होत असतात. त्वचेचे अनेक आजार, संधिवात आणि काही प्रकारचे कॅन्सरही असे हेलकावे खात असतात. त्या-त्या वेळी चालू असलेल्या उपचारांना आयतं श्रेय मिळतं.

बहुतेक वेळा ‘पपापू’ डॉक्टर मुळात चालू असलेली (आधुनिक वैद्यकीची) औषधे चालू ठेवून; शिवाय उपचार देतात. यामुळे यशाचे पितृत्व स्वत:कडे ठेवून अपयशाचे खापर अन्यांच्या माथी मारायची सोय होते.

आपण काही उपचार घेत आहोत, या कल्पनेनेच कित्येकांना बरं वाटतं. याला ‘प्लॅसिबो इफेक्ट’ असं म्हणतात. त्यामुळे औषधाची उपयुक्तता यापेक्षा सरस असल्याचे सिद्ध करावं लागतं. मात्र ‘पपापू’ औषधांबाबत अन्न व औषध प्रशासनही अशा सिद्धतेची मागणी करीत नाही, हे वर आलेलंच आहे. ‘अ’ हे औषध ‘ब’ या आजाराला उपयुक्त आहे, असा दावा करायचा झाला, तर त्यासाठी निव्वळ असा उल्लेख ‘पपापू’ ग्रंथात असल्याचे दाखवून द्यावे लागते. बस, एवढंच!

‘पपापू’ औषधाचा फायदा होतो का नाही, हे जरा बाजूला ठेवू; पण या उपचाराचा तोटा काय होतो ? होतो ना! वेळेत आणि योग्य उपचार मिळविण्याचा रुग्णाचा हक्क हिरावून घेतला जातो. छद्मोपचारांत वेळ दवडल्यामुळे मूळ आजार बळावतो, पसरतो, निदान होण्याला उशीर होतो. असे अनेक धोके संभवतात. चेहर्‍यावर पुरळ आले, असे समजून नागिणीकडे दुर्लक्ष केले तर बुबुळावर फूल पडते. संडासवाटे रक्तस्राव होत असेल तर सर्व तपासणी केलीच पाहिजे. निव्वळ ‘रात्री चादर पांघरली होती की दुलई?’ यावरून औषध ठरविले तर आतड्याच्या कॅन्सरचे निदान होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. थोडक्यात, वेळ जातो, पैसा जातो, उपचार चालू असल्याचे कृतक समाधान मिळते; आणि हे घातक ठरू शकते.

डॉक्टर आणि पेशंटचं नातं पारदर्शी असायला हवं. माहितीची, उपचारांतील भल्या-बुर्‍याची प्रामाणिक देवाणघेवाण असायला हवी, असं आधुनिक वैद्यकनीती मानते. ‘पपापू’ यात कुठेच बसत नाही. भारतासारख्या गरीब देशाला तर असल्या छद्म उपचारांवर आणि कृतक संशोधनावर वेळ आणि पैसा खर्च करणे मुळीच परवडणारे नाही. तेव्हा या सार्‍या पद्धतींबाबत साधक-बाधक विचार होणे नितांत आवश्यक आहे.

लेखक संपर्क ः 98220 10349


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]