-
– तुषार गांधी यांच्या हस्ते रुपये 1 लाख व स्मृतिचिन्ह
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) च्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार हरियाणा राज्यातील सिरसा येथील लढाऊ कार्यकर्तेअंशुल छत्रपती यांना प्रदान करण्यात आला. बाबा रामरहीमला तुरुंगात पाठविण्यासाठी अंशुल छत्रपती यांनी मोठा संघर्ष केला होता.
शुक्रवारी (29 एप्रिल) सायंकाळी 6 वाजता पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व 1 लाख रुपयांचा चेक देऊन पुरस्काराचे वितरण झाले.
यावेळी तुषार गांधी म्हणाले, “हरियाणातील रामचंद्र छत्रपती यांच्या मारेकर्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झाली; मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्यांना शोधण्यात दिरंगाई झाली आहे. ज्या विचारधारेतून खून करण्यात आला, ती विचारधारा आणि त्यासंबंधित संस्थांचा तपासामध्ये विचार का केला गेला नाही?” हरियाणात जे झाले, ते महाराष्ट्रात का होऊ शकले नाही, असा प्रश्न उपस्थित करून तुषार गांधी यांनी पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब असल्याची खंत व्यक्त केली. “नव्या भारतात दिवसेंदिवस हत्यांची परंपरा वाढीस लागत आहे. समाजामध्ये विचारपूर्वक द्वेष पसरविला जात असून त्यासाठी इतिहासाचा वापरही होत आहे. हा द्वेष केवळ हिजाब आणि भोंग्यापर्यंत थांबणार नाही, तर तो उद्या तुमच्या घरापर्यंत पोेचणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण सतर्क राहिले पाहिजे.”
पुरस्काराला उत्तर देताना अंशुल छत्रपती म्हणाले, “माझे वडील रामचंद्र छत्रपती यांनी ‘सच्चा डेरा सौदा’चे गुरमित रामरहीम याच्या विरोधात आवाज उठविला. हा आवाज दाबण्यासाठी त्यांचा खून करण्यात आला; मात्र आम्ही घाबरलो नाही. 17 वर्षे आम्ही आमचा लढा सुरूच ठेवला. शेवटी न्याय मिळाला. गुरमित रामरहीमला शिक्षा झाली. डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्यांना शिक्षा झाली पाहिजे. सूत्रधार पकडले गेले पाहिजेत. मला मिळालेला सन्मान रामचंद्र छत्रपतींच्या बलिदानाचा आणि अन्यायाविरोधात लढणार्या चळवळीचा आहे.
या कार्यक्रमात अमेरिकेतून सुनील देशमुख यांनी ऑनलाईन संवाद साधला, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागवल्या; तसेच या पुरस्कारामागची महाराष्ट्र फाउंडेशनची भूमिका सांगितली.
‘मासूम’च्या मनीषा गुप्ते यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद देशमुख यांनी केले. पाहुण्यांची ओळख राहुल थोरात यांनी करून दिली. आभार नंदिनी जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमास सिरसाचे सरपंच ठाकूर शिवराम सिंह, अॅड. लेखराज ढोट, दीपक गिरमे, मुक्ता दाभोलकर, सुभाष थोरात, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले, राहुल माने, सौरभ बागडे, कृतार्थ शेगांवकर, प्रा. शमशुद्दीन तांबोळी, विश्वास पेंडसे, अनिल वेल्हाळ, प्रशांत पोतदार उपस्थित होते.