कल्पतेश मीनाक्षी भिकनराव - 8982966802
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील तत्त्वज्ञान विभागातील फ्रेंच तत्त्वज्ञान शिकवणारे प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘भुरा’ हे आत्मकथन सध्या मराठी साहित्यात लक्षवेधी ठरत आहे. अवघ्या सहा महिन्यांत चौथी आवृत्ती येऊ घातली आहे. सोशल मीडियावर देखील ‘भुरा’च्या वाचकांनी अनेक पोस्ट ‘शेअर’ केल्या आहेत. ‘भुरा’ या आपल्या आत्मकथनात डॉ. शरद बावीसकर आपला शैक्षणिक प्रवास, संघर्ष, यश-अपयश यांचे वास्तववादी चित्रण मांडतात. या प्रवासात भुरा आणि भुराच्या वाटेला आलेला संघर्ष आपल्याला वाचायला मिळतो. परंतु भुरा हा फक्त स्वतःचा संघर्ष मांडत नाही, तर त्याचबरोबर ज्या व्यवस्थेमुळे अनेकांच्या वाट्याला हा संघर्ष आला आहे, त्या व्यवस्थेविरुद्ध बंड करतो आणि वाचकाला देखील बंड करायला शिकवतो, म्हणून प्रत्येक वाचकाला भुरा म्हणजे आपलाच प्रतिनिधी वाटतो.
भुराच्या आयुष्यातील दहावीच्या परीक्षा आणि निकाल यासंदर्भातील विवेचन वाचल्यास भारतीय शिक्षण व्यवस्था आणि समाज यांचे गंडलेले वास्तव आपल्यासमोर उभे राहते. शिक्षणाचा संबंध फक्त आपल्या उपजीविकेसाठी आहे किंवा उद्देश पूर्ण आयुष्यासाठी आहे, हा विचार भुराला येथील नरक वाटणारी व्यवस्था सोडून अपेक्षित असणारे ते जग यातून प्रतीत होतो.दहावीत नापास झाल्यानंतर खाणीत कामाला जाणारा, क्रेन मशीनवर काम करणारा भुरा आपल्या आयुष्यातील संघर्ष मांडत असताना सभोवतालची परिस्थिती कशा पद्धतीने काम करते, आपली समाजव्यवस्था आणि तिचे विषमतावादी स्वरूप किती कुरूप आहे, याचा प्रत्यय या पुस्तकातून आपल्याला मिळतो. अज्ञान, अंधश्रद्धा यांच्यामुळे सतत आपण एका अदृश्य अशा गुलामीत अडकलोय. आपल्या आजूबाजूला धार्मिक अजेंडे घेऊन काम करणारी स्वाध्याय, बैठका यांचा आपल्या जीवनातील अनावश्यक हस्तक्षेप आपल्या प्रगतीस कशा पद्धतीने बाधक ठरतोय, याचे अतिशय मार्मिक चित्रण आपल्याला ‘भुरा’मध्ये वाचायला मिळते. उदाहरणार्थ – ‘जठे पैदा व्हयेल शे तठेच जग तठेच मर आणि सुखी राय.’ या एका वाक्यातून आपलं काम, आपला दर्जा, स्थान जणू काही या व्यवस्थेने आधीच ठरवले आहे व ते आपण बहुसंख्येने निमूटपणे आचरत असतो आणि त्याचं उदात्तीकरण करत असतो. भुरा मात्र आपल्या चिकित्सक स्वभावामुळे या व्यवस्थेच्या मुळापर्यंत जाऊन त्याची योग्य पद्धतीने चिरफाड करतो. ‘भुरा’ वाचताना आपण या व्यवस्थेला कधीच का प्रश्न विचारू शकलो नाही, हा प्रश्न वाचकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. ‘भुरा’ वाचत असताना एक बाब लक्षात येते, ती म्हणजे डॉ. शरद बाविस्कर यांनी आपल्या आयुष्यातील घटना, प्रसंग मांडत असताना; त्याचबरोबर लेखकाची वैचारिक मनोभूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. या आत्मकथेत मराठी बरोबर ‘आहिराणी’चा देखील वापर केला आहे. ‘आहिराणी’च्या संदर्भात लेखकाची भूमिका ही प्रस्थापित आणि विस्थापित यांच्यातील सहसंबंध आपल्या लक्षात आणून देते.
‘भुरा’ या आत्मकथनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘भुरा’ वाचत असताना कुठेही भुरा आपला प्रयत्नवाद सोडताना दिसत नाही. दहावी नापास झाल्यानंतर खाणीत, क्रेन मशीनवर काम करत असताना ‘हे आपलं जग नाही, हे काम करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही,’ या विचाराने अस्वस्थ असलेला भुरा संधीच्या शोधात बारावीसाठी जय हिंद कॉलेज गाठतो आणि अभ्यासात स्वतःला गुंतवून ठेवतो. त्यानंतर मात्र भुरा आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत उच्च शिक्षणासाठी लखनौ गाठतो. तदनंतर दिल्ली, फ्रान्स, इटली, इंग्लंड या देशांतून पदव्युत्तर शिक्षण घेतो. त्यानंतर पी. एच. डी. आणि सध्या ‘जेएनयू’मध्ये तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक हा सर्व प्रवास थक्क करणारा आहे. या सर्व प्रवासात अनेक बरे-वाईट प्रसंग आले तरी आपल्या मूल्यव्यवस्थेवर ठाम राहणारा भुरा कुठेही, कोणतीही तडजोड करत नाही, हे अधिक महत्त्वाचे वाटते. शिक्षण हे एकमेव साधन आहे, जे आपल्याला या नरकव्यवस्थेतून बाहेर काढते, ही मनाशी पक्की खूणगाठ बांधणारा भुरा आपले उच्च शिक्षणाविषयी मत व्यक्त करताना म्हणतो की, शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रंग देण्याचा प्रयत्न करणे आणि कॅनव्हासचा आकार जेवढा वाढवून देता येईल, तेवढा वाढवून देणे. शिक्षण म्हणजे मुला-मुलींच्या हातात रेडिमेड पेंटिंग देणे नव्हे. शिक्षणाविषयी जी स्पष्टता मला 2020 मध्ये आली, ती 1997 मध्ये सुध्दा होती, असं म्हणनं तथ्यसंगत नसेल, तेव्हा एवढंच माहिती होतं की ज्या परिस्थितीत फसलो होतो, त्या परिस्थितीतून सुटका करवून घ्यायची आणि अशा जगात शिरायचं होतं, जिथं माणूस म्हणून पूर्णत्वाची ओळख पटेल. पूर्णत्व म्हणजे काय, याविषयी देखील अस्पष्टता होती; पण ज्या परिस्थितीत होतो, ती पूर्णत्वास पूरक नाही, एवढं मात्र स्पष्ट होत शिक्षण हा सुटकेचा एकमेव मार्ग आहे, याची पूर्णपणे खात्री होती. सर्वार्थाने सुटका; केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे. 2002 नंतर जेव्हा माझ्या बरोबरीची पोरं पैसे कमवायच्या नादात मला सांगत असत की, ‘पैसा सब कुछ होता है मेरे यार वगैरे वगैरे…’ तेव्हासुद्धा मी शिक्षणाची वाट सोडली नाही. खरं तर माझी आर्थिक स्थिती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट होती; पण मी मात्र शिक्षणाची वाट सोडायला तयार नव्हतो.
भुराला इंग्रजी या भाषेविषयी स्वतःला येणारे अडथळे आणि इंग्रजी आत्मसात करण्यासाठी भुराने केलेले प्रयत्न, यामुळे इंग्रजी येत नाही, ती अवघड भाषा आहे, याविषयीचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होते. इंग्रजी शिकण्यासाठी आई भुराला सल्ला देते की, घेरी ‘लेवान’ या शब्दातच प्रयत्नांची पराकाष्टा आपल्याला दिसते. अनेक तरुण मुलं-मुली इंग्रजीअभावी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जातात, तर अनेकांना उच्च शिक्षण म्हणजे काय, याची स्पष्टता नसते. एकूणच काय, तर आपण ज्या शिक्षणप्रणालीतून शिक्षण घेतो, ती व्यवस्था आपल्यात आत्मविश्वासाऐवजी न्यूनगंड निर्माण करते. परंतु ‘भुरा’ वाचल्यानंतर आपल्यातील हा न्यूनगंड दूर होण्यास मोठी मदत होते. ‘भुरा’ या आत्मकथनात वाचकाला तत्त्वज्ञानाच्या अनेक बाबी वाचायला मिळतात. आपल्याला उच्चशिक्षणविषयक अनेक नवनवीन बाबींचा परिचय होतो. विशेषतः ‘जेएनयू’विषयीचा जो अपप्रचार आपल्यापर्यंत पोचवला गेला आहे आणि त्यातून ‘जेएनयू’विषयी जी मतं सर्वसामान्य लोकांची तयार झाली आहेत, त्यांचा बुरखा फाटल्याशिवाय राहत नाही. ‘जेएनयू’विषयी तिथल्या विद्यार्थ्यांविषयी आणि एकूणच तेथील शिक्षणव्यवस्थेविषयी वाचकांच्या मनात निश्चितच एक आदराचे स्थान निर्माण होते.
महात्मा जोतिबा फुले आपल्या अखंडात म्हणतात की ‘एवढा अनर्थ एका अविद्येने केला’ या अविद्येच्या नरकातून आपल्याला सुटकेची प्रेरणा ‘भुरा’च्या वाचनातून मिळते.
पुस्तकाचे नाव ः भुरा
लेखक ः शरद बावीस्कर
प्रकाशक ः लोकवाड.मय गृह, मुंबई
किंमत ः 500/-
– कल्पतेश मीनाक्षी भिकनराव
पुस्तकासाठी संपर्क ः सागर नागणे, चाळीसगांव
मो. 89829 66802