सौरभ बागडे -

15 ऑगस्ट, 2021
प्रागतिक विचारांचा पुरस्कार, प्रचार करून सामाजाचे मागासलेपण दूर करण्यार्या मंडळींना सनातनी मंडळींकडून नेहमीच विरोध केला जातो. सनातनी मंडळींकडे आर्थिक, राजकीय, धार्मिक ताकद प्रचंड असते, तर समाजातील काही विचारी जन आणि नैतिक ताकद वगळता प्रागतिक मंडळींकडे फार ताकद नसते, म्हणून प्रागतिक मंडळींचा अंधश्रद्धा, शोषण यांच्या विरोधातील लढा नेहमीच असमान, यातनामय असतो. समाजसुधारणेचे काम किती कष्टप्रद असते, हे सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “समाजाकडून होणार्या छळाचे स्वरूप, तुरुंगातल्या हालांपेक्षा अधिक व्यापक असते. राज्यकर्त्यांविरुद्ध चळवळ करणार्या देशभक्तांच्या वाट्याला कीर्ती येते. समाजसुधारकाला मात्र निंदा, अपमान, धिक्कार अशा छळाचे धनी व्हावे लागते आणि त्यासाठी लागणारे धैर्य तुरुंगात जाणार्यांच्या धैर्यापेक्षा जास्त कणखर असावे लागते.” एकतर समाजात प्रागतिक विचारांची माणसे अल्प असतात आणि या कारणांमुळे उघडपणे भूमिका घेणारी, लढणारी माणसे त्याहून अल्प असतात. या धैर्यवान अत्यल्प माणसांमध्ये ‘दै. पुरा सच’चे संपादक स्मृतिशेष रामचंद्र छत्रपती आणि त्यांचे चिरंजीव अन्शुल छत्रपती यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. रामचंद्र छत्रपती यांनी रामरहीम बाबा, ‘डेरा सच्चा सौदा’चे काळे कारनामे आपल्या ‘पुरा सच’ या पत्रातून प्रसिद्ध केले म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या हत्येचे सूत्रधार गजाआड जावेत, म्हणून अन्शुल छत्रपती यांनी सुमारे सतरा वर्षे संवैधानिक मार्गाने लढा दिला. अशा पिता-पुत्राचा अन्यायाविरोधातील लढा जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्तच्या दाभोलकर विचार जागर सप्ताहात अन्शुल छत्रपती यांच्या ऑनलाइन मुलाखतीचे आयोजन केले.
मुलाखतीची सुरुवात सुनील स्वामी यांनी तुकाराम महाराजांच्या ‘ऐसे कैसे झाले भोंदू?’ या अभंगाने आणि कुलदीपसिंग व जगसिरजी यांनी ‘पाखंडी बाबा के खिलाफ’ या पंजाबी बोलीत सादर करून केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अन्शुल छत्रपती यांचे स्वागत हमीद दाभोलकर यांनी केले. ते प्रास्ताविकात म्हणाले, “आपण ज्या मूल्यांचा उच्चार करतो, ती मूल्ये जगणार्या अन्शुल छत्रपतींसोबत बोलण्याची संधी ‘महा. अंनिस’ला मिळाली, यांचा आम्हाला आनंद वाटतो. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दुःख आम्ही समजू शकतो. जेव्हा व्यवस्था, पोलीस यंत्रणा सहकार्य करण्याऐवजी त्रास देतात, तेव्हा लढाई लढणे किती अवघड असते, हे ‘अंनिस’चा प्रत्येक कार्यकर्ता जाणतो. आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन आठ वर्षे झालीत, त्यांचे केवळ संशयित मारेकरी पकडले गेलेत; मात्र मुख्य सूत्रधार अजून मोकाट आहेत. आपण रामरहीमसारख्या बड्या बाबाच्या विरोधात सतरा वर्षे विनासंघटन उभे राहिलात, लढलात. तुमचा हा लढा आम्हाला प्रेरणा देतो. जेव्हा रामरहीमविरोधात कोणी लिहायला तयार नव्हतं, तेव्हा रामचंद्र छत्रपती यांनी लिहिलं, त्यांच्याविषयी आम्हाला अत्यंत आदर वाटतो. रामचंद्रजींनी घालून दिलेल्या विज्ञान, नीती, निर्भयतेच्या मार्गावर पुढील अनेक पिढ्या चालतील, अशी आम्हास आशा आहे.”
स्वागत आणि प्रास्ताविकानंतर ‘अंनिवा’चे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी अन्शुल छत्रपतींची मुलाखत घेतली. त्यांनी “रामचंद्र छत्रपतींची जडणघडण कशी झाली, कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती?” या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना अन्शुल छत्रपती म्हणाले, “वडील रामचंद्र छत्रपती यांचा जन्म शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. ते राहत असलेला भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. मग सर्व कुटुंब भारतात स्थलांतरित झालं. ते लहानपणापासूनच धाडसी वृत्तीचे होते, ते पाहून त्यांचे वडील एकदा त्यांना म्हणाले, ‘तुझ्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखी निर्भयता दिसते.’ त्यानंतर मग ते नावासोबत ‘छत्रपती’ लावू लागले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी आर्यसमाज, स्वामी अग्निवेश यांच्यासोबत काम केलं. पुढे कायद्याचे शिक्षण घेतले. मात्र त्यांचा कल पत्रकारितेकडेच होता. पत्रकारितेत काम करताना संपादकाला आवडेल, रुचेल ते लिहावे लागते, अनेकदा आपण लिहिलेल्या मजकुराला संपादकाची कात्री लागते, असा त्यांना अनुभव आला. मग स्वतःचे ‘पुरा सच’ हे वर्तमानपत्र चालू केलं. त्यात त्यांनी चौटाला सरकार आणि ‘डेरा सच्चा सौदा’च्या दहशतीविरोधात बातम्या छापल्या.”
नंतर ‘राम रहीमचे साम्राज्य कसे निर्माण झाले,’ या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “1990 च्या दशकात नववी पास असलेल्या राम रहीमने बंदुकीच्या जोरावर दहशत पसरवली, लोकांच्या जमिनी हडप केल्या. ‘डेरा सच्चा सौदा’ असं म्हणतं की, लोकांकडून आम्ही दान घेत नाही. मग इतकी प्रचंड संपत्ती, हजारो एकर जमिनी ‘डेरा सच्चा सौदा’ने कशा लाटल्या, याची चौकशी कोणत्याच सरकारने केली नाही. लोकांच्या विरोधामुळे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांनी तपास चालू केला. मात्र त्यांच सरकार लगेच पडलं आणि पुढे काहीच झालं नाही. तसेच हरियाणा, पंजाबातील अज्ञानी लोक डेरा सच्चा सौदाचे प्रस्थ तयार करण्यास कारणीभूत ठरले.”
पुढे मुलींचे लैंगिक शोषण आणि डेराची खरी ओळख ‘लिक’ करणारी अज्ञात मुलीची चिठ्ठी या संदर्भात प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना छत्रपती म्हणाले, “डेरा सच्चा सौदा’ने शाळा, कॉलेजेस काढली, त्यातही मुला- मुलींची शाळा-कॉलेजेस वेगळी होती. अनेक मुलींना पित्याने; म्हणजे रामरहीमने बोलवले आहे, असं सांगून त्यांच्या गुहेत नेले जात असे आणि तिथे त्यांचे लैंगिक शोषण केले जात असे. मुलींनी रामरहीमने काय केले, हे घरी सांगीतले तर पालक मुलींवरच अविश्वास दाखवत. तिथे अनेक साध्वींना मारझोड केली जात असे. त्यांना आश्रमातही धड जगता येणार नाही; बाहेरही जगता येणार नाही, अशी त्यांची असहाय्य अवस्था केली जात असे. 2002 साली ‘डेरा सच्चा सौदा’चा भांडाफोड करणारी एक निनावी चिठ्ठी मुलीने लिहिली. ती चिठ्ठी वडिलांनी ‘पुरा सच’मध्ये जशीच्या तशी छापली आणि काही प्रमाणात बाबाविरोधात वातावरण तयार झालं. वडिलांवर रामरहीम हरप्रकारे दबाव टाकू लागला. ‘अॅट्रॉसिटी’चे खोटे गुन्हे वडिलांवर दाखल केले, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या; पण वडील दबले नाहीत. याची परिणती त्यांच्या खुनात झाली. 24 ऑक्टोबर, 2002 च्या संध्याकाळी घराबाहेर त्यांना पाच गोळ्या घातल्या गेल्या. उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. आमच्या घरापासून जवळच पोलीस चौकी आहे. तिथे एका हल्लेखोराला पकडलं गेलं, दुसरा निसटला. त्यांच्याजवळील बंदूक, गाडी आणि इतर सर्व वस्तू या ‘डेरा सच्चा सौदा’च्या होत्या.”
पुढे थोरात यांनी खून खटल्याविषयी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना छत्रपती म्हणाले की, “सरकार मतांसाठी रामरहीमच्या बाजूने होते. काँग्रेस, बीजेपी सरकारचे रामरहीमला सहकार्य होते. पोलीस आम्हाला सहकार्य न करता उलट त्रासच देत असत. रामरहीमचा आमच्यावर दबाव होता. नैतिक आणि विचारी जनांची ताकद सोडली तर आमच्याकडे कोणतीच ताकद नव्हती. आम्हाला लोकशाही मार्गाने सगळं करायचं होतं. 10 जुलै, 2002 साली ‘डेरा सच्चा सौदा’चे मॅनेजर रणजितसिंह यांचा खून झाला. कोर्टाने मग जॉईंट ऑर्डर दिली. तपास यंत्रणेवर दबाव होता. ‘डेरा’चे भक्त तपासात अडथळा आणत असत. मात्र सीबीआयचे सत्यपालसिंगजी, सतीश डागरजी आणि त्यांच्या खाली काम करणार्या कर्मचार्यांनी उत्तम काम केलं. त्यांच्यामुळेच वडिलांची हत्या, रणजितसिंह यांची हत्या आणि साध्वी यौन शोषण प्रकरणात अंतिम निष्कर्षापर्यंत पोचता आलं. हे सगळं घडत असतात कोर्टात रामरहिमचा ड्रायव्हर खट्टरसिंग यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कारण त्याच्या समोरच खुनाचा कट रचला गेला होता.”
शेवटी छत्रपती म्हणाले की, या प्रकरणात मानसिक आधार देण्याचे, कायदेशीर लढाईत साथ देण्याचे काम ज्यांनी केलं, त्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या सहकार्याची परतफेड मला करता येऊ शकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचार जागर सप्ताहात माझी मुलाखत घेतलीत, त्याबद्दल मी ‘महा. अंनिस’चा आभारी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
उस्मानाबाद जिल्ह्याचे कार्यकर्ते चंद्रकांत उळेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात सूत्रसंचालक व मुलाखतकाराची जबाबदारी सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी पार पाडली.
– शब्दांकन ः सौरभ बागडे