सत्यशोधक प्रा. एन. डी. पाटील

डॉ. टी. एस. पाटील - 9890687182

महाराष्ट्रातील सर्व सामाजिक आणि पुरोगामी चळवळींचे प्रमुख आधारस्तंभ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारवंत आणि आम शेतकरी, कष्टकरी जनतेचे नेते प्रा. एन. डी. पाटील हे 17 जानेवारी, 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी कालवश झाले. 1945 मध्ये ते विद्यार्थी असताना दारूबंदीसाठी वडगाव येथील दारूच्या दुकानासमोर निदर्शने करताना त्यांना व सर्व निदर्शकांना सरकारने अटक केली. यावेळी एन. डी. पाटील यांना 15 दिवसांची शिक्षा झाली. हा त्यांच्या जीवनातील पहिला कारावास. ‘त्या’ दिवसापासून त्यांनी अविश्रांतपणे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनात शोषणमुक्त व समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी गेली 75 वर्षेअव्याहतपणे कार्य केले. प्रा. एन. डी. पाटील हे डाव्या आघाडीचे नेते तर होतेच; शिवाय ते महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सामाजिक व प्रबोधनाच्या चळवळीत काम करणार्‍या अनेक संस्था व संघटनांचे ते आधारस्तंभ होते. रयत शिक्षण संस्था, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था बेळगाव, महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर, डॉ. आंबेडकर अकॅडमी सातारा, महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समिती, जागतिकीकरणविरोधी कृती समिती, वीज दरवाढविरोधी कृती समिती, नर्मदा बचाव आंदोलन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी या सर्व सामाजिक व परिवर्तनवादी संस्था, संघटना आणि चळवळींमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांनी दिलेल्या योगदानामुळे महाराष्ट्रात पुरोगामी आणि परिवर्तनाचा विचार पुढे नेण्याचे मौलिक कार्य घडून आले आहे.

प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर सत्यशोधक विचारांचा प्रभाव पडला. ढवळीच्या शाळेत शिकविणारे परीट गुरुजी, बागणीच्या शाळेतील माळी गुरुजी व हायस्कूलमध्ये शिकविणारे वेताळराव खैरमोडे सर यांच्यामुळे ते महात्मा फुलेंच्या विचारांचे बनले. त्याच वेळी कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, पी. ए. डी. आत्तार या मान्यवरांचा सततचा सहवास आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे एन. डी. पाटील पूर्णपणे ‘सत्यशोधक’ बनले. संपूर्ण जीवनभर त्यांनी महात्मा जोतिबा फुलेंच्या शिकवणीनुसार आपल्या जीवनाची वाटचाल केली. ते प्रखर विज्ञाननिष्ठ होते. जातिअंताच्या लढाईमध्ये ते अग्रभागी राहिले. ते नेहमी म्हणत की, या देशाचे सर्वांत जास्त नुकसान कशामुळे झाले, तर या देशात असलेली जातिप्रथा. जन्मजात असलेल्या जातिव्यवस्थेमुळे या देशातील सहा टक्के मानवसमूह अस्पृश्य गणला गेला. जगामध्ये काळा-गोरा भेद आहे; परंतु माणसाला माणूस स्पर्श करून घेत नाही, अशी प्रथा गेली हजारो वर्षेभारतात दलितव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली होती. अनेक संत-महात्म्यांनी या प्रथेविरुद्ध बंड केले; परंतु धर्माच्या पोलादी चौकटीसमोर कुणाचेच काही चालले नाही; परंतु 19 व्या शतकात जन्माला आलेल्या महात्मा जोतिबा फुलेंनी हिंदू धर्माच्या चिरेबंदी आणि पुरोहित वर्गाच्या गुलामगिरीत गुदमरणार्‍या; तसेच साध्या माणुसकीलाही पारख्या झालेल्या शूद्रातिशूद्रांचा; आणि एकूण स्त्रीसमाजाच्या मूळ व्यथांना बाहेर आणण्यासाठी आपली प्रतिभा व लेखणी एखाद्या शास्त्राप्रमाणे परजली. ज्या काळात जोतिबांनी हे कार्य केले, तो इतका प्रतिकूल होता की, त्यासाठी जोतिबांना क्षणोक्षणी आत्मसमर्पणाची तयारी करावी लागली आणि जोतिबांनी ती कर्तव्यबुद्धीने केली. भारताच्या इतिहासात असे समाजक्रांतिकारी काम बुद्धानंतर फक्त आणि फक्त महात्मा जोतिबांनीच केले. जोतिबा खरे बुद्धिप्रामाण्यवादी होते. कोणताही माणूस जन्माने अथवा जातीने श्रेष्ठ वा कनिष्ठ नसून, त्याचे उच्च-नीचत्व हे त्याच्या कर्तृत्वावर व चारित्र्यावर अवलंबून असते. जगाच्या पाठीवर जे-जे धर्म आहेत, त्यापैकी कोणताही धर्म ईश्वरप्रतित नाही, कोणताही धर्मग्रंथ परमेश्वराने लिहिलेला नाही. चातुर्वर्ण्य आणि जातिभेद या अन्याय्य संस्था देवाने निर्माण केल्या नसून, विशिष्ट जातीच्या धूर्त लोकांनी देवा-धर्माच्या नावावर अज्ञ जनतेचे शोषण करण्यासाठी मतलबी हेतूने निर्माण केल्या आहेत. स्वर्ग-नरक, पाताळ-ब्रह्मांड, पूर्वजन्मीचे पाप-पुण्य, देव अवतार घेतो अशा सर्व थोतांडांवर जोतिबांनी निकराचा हल्ला चढविला. धर्मग्रंथांमध्ये असलेल्या परशुरामाला त्याने सहा महिन्यांच्या आत आपल्यासमोर हजर व्हावे व आपल्या चिरंजीवीत्वाची प्रचिती द्यावी, अशी जाहीर नोटीस जोतिबांनी काढली. जप, अनुष्ठान करण्याने पाऊस पडत नाही, नवस अगर मंत्राच्या सामर्थ्यामुळे मुले होत नसतात, देवाला कोंबडा किंवा बकर्‍याचा नैवेद्य नको असतो, हे अज्ञ जनतेला समजून सांगण्यासाठी जोतिबांनी संपूर्ण हयात खर्च केली. ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून समाजाला पर्यायी जीवनपद्धती निर्माण करून दिली. जोतिबांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ आमच्यासाठी दिला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध असे भिन्न-भिन्न धर्म मानणारी; परंतु सत्याने वर्तन करणारी माणसे एकाच कुटुंबात गुण्या-गोविंदाने राहू शकतात, हा क्रांतिदर्शी विचार मांडणारा एकच समाजक्रांतिकारक इतिहासाला ठाऊक आहे, तो म्हणजे महात्मा फुले. याच फुलेंचे तत्त्वज्ञान प्रा. एन. डी. पाटील यांनी स्वीकारले आणि आपले संपूर्ण आयुष्यच जोतिबांना हवा असलेला समताधिष्ठित, एकजीनसी भारतीय समाज निर्माण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.

सध्या देशाचे सार्वजनिक आणि राजकीय जीवन अनेक अंगांनी विकृत बनले आहे. आजच्या काळात शुद्ध चारित्र्य, समाजजीवनाच्या अंगाचा सर्व बाजूंनी सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, तत्त्वज्ञान आणि विचारसरणींशी अतूट अशी बांधिलकी, त्यागी आणि समर्पित जीवनवृत्ती, शेतकरी, कामगार व शोषित जनतेशी बांधिलकी स्वीकारून त्यांच्या कल्याणासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी आदी गोष्टी समाजामध्ये अभावानेच आढळतात. अशा स्थितीत विचार करता हे सर्व सद्गुण प्रा. एन. डी. पाटील यांच्याकडे होते, याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला वेळोवेळी आली आहे. प्रा. एन. डी. पाटील यांनी मार्क्स-लेनिनवादी विचारधारेचे अधिष्ठान स्वीकारून शोषणमुक्त व समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आपल्या कार्याला महात्मा फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोड देऊन आपले संपूर्ण आयुष्यच या एकमेव ध्येयपूर्तीसाठी ‘मिशनरी’ बाण्याने व्यतीत केले.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या या दोन दशकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनावर परिणाम करणार्‍या ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या, त्या प्रत्येक घटनेचे प्रा. एन. डी. पाटील हे साक्षीदार आहेत. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेऊन संघर्ष सुरू केला. गिरणी कामगारांचा लढा, शोषणमुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भूमिहीनांसाठी भूमी आंदोलन, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा, यासाठी केलेले लढे, कापूस एकाधिकार योजना, महागाई आणि उपासमारविरोधी आंदोलन, बहुजनांच्या शिक्षणासाठी श्वेतपत्रिकेविरुद्ध लढा, अंधश्रद्धा निर्मूलन, धरणग्रस्तांसाठी आंदोलन, वीज दरवाढविरोधी आंदोलने, ‘एन्रॉन’ हटाव आंदोलन, खासगीकरणविरोधी आंदोलन, सहकारी साखर कारखान्यांच्या खासगीकरण करण्याच्या विरोधातील संघर्ष, समान न्याय्य पाणी वाटप आंदोलन, ‘सेझ’विरोधी आंदोलन, कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलन… ही सर्व आंदोलने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली.

प्रा. एन. डी. पाटील यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हा स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. ते विधान परिषदेमध्ये 19 वर्षेव विधानसभेमध्ये 5 वर्षेसदस्य होते. आपल्या प्रभावी मांडणीने प्रा. एन. डी. पाटील यांनी सरकारला अनेक जनहिताचे निर्णय घ्यावयास भाग पाडले. रयत शिक्षण संस्थेचे 1960 पासून मॅनेजिंग कौन्सिल मेंबर व 18 वर्षेचेअरमन होते; परंतु संस्थेकडून एक रुपयासुद्धा त्यांनी मानधन घेतले नाही, स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन घेतली नाही, सार्वजनिक जीवनात जनतेच्या एका पैलाही हात लावला नाही, आमदार म्हणून मिळणारी सदनिका घेतली नाही. संपूर्ण आयुष्यच संघर्ष करण्यात घालविले. सत्यशोधक विचार त्यांच्या रोमारोमांत भिनलेला होता. त्यांच्या मृत्युपत्रात मेल्यानंतर काय करावे, हे लिहून ठेवले होते. जीवनामध्ये सत्यनिष्ठ राहून ब्राह्मणी धर्माला पूर्णपणे ठोकरून दिले आणि समाजाला कसे जगावे, याचा निरंतर असा आदर्श घालून दिला. त्यांच्या पत्नी सरोज पाटील याही सत्यशोधक विचारांच्या आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य प्रा. एन. डी. पाटील यांच्या विचारांचे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेवटपर्यंत निर्धाराने काम केले. महात्मा फुलेंचे नाव घेऊन राजकारण आणि समाजकारणात वावरणार्‍यांची संख्या अमाप आहे; परंतु यातील कितीजणांनी महात्मा फुलेंचे विचार आचरणात आणले आहेत? काही सन्माननीय अपवाद वगळता, महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंच्या विचारांचा सच्चा वारसदार म्हणून फक्त एन. डी. पाटील यांचेच नाव घ्यावे लागेल, अशा या क्रांतिकारकास लाल सलाम!

संपर्क : 9890687182


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]