अंनिवा -
यल्लाप्पा चिनाप्पा चव्हाण (रा. काळे प्लॉट, कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांच्यासह चार कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं होतं. या कुटुंबाशी कोणी संबंध ठेवल्यास 5000 रुपये दंड ठोठावला जाईल, असा फतवा पंचांनी बैठक घेऊन काढला होता. पीडितांच्या मुला-मुलींची लग्ने पंच मोडतात, मयत झाले तरीही कोणी मदतीला येत नाही, रोजगाराला सुध्दा बोलवत नाहीत, समाजातील कोणत्याही कार्यक्रमास बोलवत नाहीत, पंच पीडितांना दमदाटी करतात, अशा प्रकारचा बहिष्कार अनेक दिवस सुरू होता.
याबाबत पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला होता. तसेच कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता.
त्यानंतर ‘अंनिस’च्या वतीने राहुल थोरात यांनी पोलीस व प्रशासनाला आवाहन केले होते की, सध्या महाराष्ट्रात नव्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कोणत्याही कारणाने एखाद्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे पीडितांच्या तक्रारीची लवकरात लवकर सखोल चौकशी करून पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि पीडितांना न्याय दयावा, असे आवाहन ‘अंनिस’च्या वतीने वर्तमानपत्रात व टीव्ही चॅनलवर करण्यात आले. वर्तमानपत्रांनी ही बातमी लावली. त्यामुळे कवठेमहांकाळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी लगेच दुसर्या दिवशी पीडित आणि जातपंचांना बोलावून घेतले. दोघांना समजावून सांगितले. येथून पुढे कोणावरही सामाजिक बहिष्कार घालणार नाही, असे लेखी जबाब लिहून घेतले.
नंदीवाले समाज जातपंचायत केसमध्ये यशस्वी समझोता घडवून आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचा ग्रंथ देऊन सत्कार ‘अंनिस’चे सक्रिय कार्यकर्तेफारूक गवंडी, बाळासाहेब रास्ते, प्रा. दादासाहेब ढेरे यांनी केला.
‘अंनिस’ने या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला,’ अशी भावना पीडित कुटुंबांनी व्यक्त केली आणि ‘अंनिस’चे त्यांनी आभार मानले.