पूर्व विदर्भात पसरलाय ‘मोह’ वृक्ष अलिंगनाचा चमत्कार

प्रा. नरेश आंबीलकर - 9423112181

पूर्व विदर्भात मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष संबोधले जाते. मात्र या झाडाच्या बुंध्याला अलिंगन दिलं की, सर्व रोगातून, भूतबाधेतून मुक्ती मिळते, असे कुणी सांगितलं, तर विश्वास ठेवाल काय?

पण मोहवृक्षाच्या आलिंगनाचा चमत्कार आता मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात शिरला. या चमत्काराचा आँखो देखा हाल भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी या गावात पाहायला मिळाला.

टी.व्ही.वरील आधी हकिकत आधा फसाना! : राष्ट्रीय न्यूज चॅनलपैकी काही टी.व्ही. चॅनल आपला टी.आर.पी. वाढविण्यासाठी रात्री अंधश्रद्धा वाढविणारे कार्यक्रम सादर करतात. यातील ‘आधी हकिकत आधा फसाना’ या कार्यक्रमात सध्या गाजत आहे. मोह वृक्ष आलिंगन चमत्कार… मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील जंगलव्याप्त गावात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. गावातील एखाद्या व्यक्तीला साक्षात्कार होतो आणि तो व्यक्ती गावाजवळ असलेल्या मोहाच्या वृक्षाला आलिंगन देतो. त्यानंतर गावातील व परिसरातील लोकांच्या रांगा या मोहाला आलिंगन द्यायला लागतात. मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांत धुडगूस घातल्या नंतर हा मोहवृक्षाचा चमत्कार महाराष्ट्रात शिरला.

मोहवृक्षासोबत सापाचाही चमत्कार : या चमत्कारासंदर्भात भंडारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे एका निनावी फोनद्वारे माहिती आली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील लेंडेझरी या गावाला मोहाच्या झाडाने व सापाच्या अंधश्रद्धेने झपाटल्याचे सांगण्यात आले. या घटनेची तक्रार पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी या घटनेबाबत गोवरवाही पोलीस स्टेशनला कळवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सहकार्य करण्यासाठी पत्र दिले.

अंनिसची गावभेट : महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे व राज्य पदाधिकारी प्रा. नरेश आंबिलकर यांनी लेंडेझरीला भेट देण्याचे ठरविले. गोवरवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय म्हसकर यांनी पोलीस कॉन्स्टेबल मुंडले सोबतीला पाठविले. सोबत एक पोलीस मित्रही दिला. लेंडेझरी या गावातील शेतातच मोहाच्या झाडाखाली चमत्कारासाठीची गर्दी दिसून आली. झाडाच्या सभोवताल मंडप घालण्यात आला होता. लाऊडस्पीकरवर देणगी देणार्‍यांची नावे सांगितली जात होती. मंडपाजवळच पूजेच्या साहित्य विक्रीचे दुकान लागले होते. झाडासमोर नारळाचा ढिग, पेटविलेल्या अगरबत्त्या, कुंकू, शेंदूर झाडाच्या मुळावर घालण्यात आले होते. झाडासमोर तीन महिला घुमत होत्या.

या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर माहिती समोर आली की, 16 फेबु्रवारी 2020 च्या रात्री 12 वाजता लेंडेझरी या गावातील गजानन संगरू अवथरे या 50 वर्षीय व्यक्तीने अचानक घुमण्यास सुरुवात केली. त्याच्या पत्नीने गावातील व्यक्तीला फोन केला. गावातील प्रेमलाल अरबाट, आनंदराव अवाल व अन्य गावकरी गजानन अवथरे याच्या घरी आले. अंगात महादेव आल्याचे सांगून मी तुमच्या गावी आलो आहे. या गावातील माझे ठिकाण सांगतो म्हणून बाहेर घुमत आला. रात्री 2 वाजता हे सगळे गावातील दुर्योधन सिरसात याच्या शेतात पोचले. शेजारीच मोहाच्या झाडाला गजाननने आलिंगन दिले व आता माझा मुक्काम इथेच राहील, असे सांगितले. सकाळपर्यंत लेंडेझरी गावात ही वार्ता पसरली. झाडाच्या मुळाला स्पर्श केल्यानंतर आपोआप झाडाच्या बुंध्याकडे हात जातात. नंतर झाडाला आलिंगन दिल्यावर असलेले रोग, बाधा दूर होतात. म्हणून गावातील महिला-पुरुषांच्या रांगा लागल्या. महिला घुमू लागल्या. सकाली 9 वाजता लेंडेझरी येथील हर्षल धुर्वेहा मुलगा आला. त्याने झाडाच्या बुंध्याला हात लावल्यावर कवडी (वाश्या) हा साप त्याच्या टी शर्टमध्ये शिरला. गावकर्‍यांना आश्चर्य वाटले. या सापाला शंकराची जटा म्हणून संबोधले जाते. मुलगा अर्धा तास झाला धरून उभा होता. त्यानंतर साप निघून गेला. याबाबत प्रत्यक्षात त्या मुलाला भेटलो. तेव्हा तो तळ्याच्या बाजूला गायी राखण्यासाठी गेला होता. कवडी (वाश्या) साप बिनविषारी असतो, हे त्याला माहीत होते. मात्र साप मोहाच्या झाडातूनच आल्याचे त्याने सांगितले.

लेंडेझरी चमत्काराचे बावन्नावे गाव : मोहाच्या झाडाला आलिंगन दिल्याने रोग बरे होतात. कुणी केलेली करणी निघून जाते. अशी समजूत या परिसरात पसरली आहे. जवळ लागून असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात मोहाच्या झाडाचा चमत्कार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लेंडेझरी हे गाव मध्यप्रदेश या राज्याच्या अगदी जवळ लागून आहे. टी.व्ही.वर अंधश्रद्धा पसरवली जात असल्याने गावागावांत मोहाच्या झाडाचा चमत्कार पसरविला जात आहे.

कायदेशीर कारवाईसाठी अंनिसची मागणी – लेंडेझरी या गावला भेट देऊन अंनिस भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे व राज्य पदाधिकारी प्रा. नरेश आंबिलकर यांनी गावकर्‍यांचे बयाण नोंदविले. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आले. या बद्दलची माहिती गोवरवाहीचे ठाणेदार विजय म्हसकर यांना देण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2012 अनुसूची कलम 2 (1) (ख) मधील 5 क्रमांकाच्या तरतुदीनुसार अतिंद्रिय शक्ती संचाराचा दावा करून गावात भीतीचे वातावरण निर्माण करून फसवणूक करणार्‍या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, यासाठी ही तक्रार देण्यात आली आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]