करणी चमत्काराने लागली पैशाची चटक, ‘स्टिंग ऑपरेशन’ने झाली अलगद अटक…

आशा धनाले - 9860453599

उमर सुलतान मुजावर (वय 50 वर्षे, समडोळी, ता. मिरज, जि. सांगली) हा भोंदूबुवा गेली 37 वर्षे भोंदूगिरी करत भोळ्या-भाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढतो व मोठ्या रकमेची मागणी करतो, अशी तक्रार महा. अंनिसच्या सांगली शाखेकडे आली. त्यानुसार सांगली अंनिसचे कार्यकर्ते प्रवीण कोकरे, आशा धनाले, त्रिशला शहा, संजय गलगले यांनी समडोळी येथील मुजावरबाबाच्या दरबारात जाऊन तक्रारीची खातरजमा केली. मुजावर बाबाने समडोळीतील राहत्या घरातच दर्गा स्थापन करून त्याला ‘कादरीबाबा पीर ट्रस्ट’ असे नाव दिले होते. दर्ग्याच्या खोलीत पीरमौलाची कबर बांधून, वरील बाजूस साईबाबा, लक्ष्मी, काही बाबांचे फोटो लावले होते. मुजावरबाबाचा दरबार दर गुरुवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात भरत होता.

प्रवीण कोकरे व आशा धनाले यांनी बहीण-भाऊ बनून तक्रार सांगितली की, प्रवीणचा पी.व्ही.सी. पाईप्स बनविण्याचा कारखाना सध्या खूप मंदीत चालू आहे. त्यामुळे त्याचे मनोधैर्य ढळले आहे. सगळ्यांशी चिडून वागतो. व्यवसायातही लक्ष देत नाही. त्यावर बाबाने अंगात आल्याचे दाखवून एक पितळी रिकामा डबा घेऊन त्यावर हात फिरवून मंत्र म्हणायला सुरुवात केली. डबा जमिनीला चिकटल्याचे सांगितले. याचा अर्थ सांगितला की, प्रवीणच्या एका जिवलग मित्राने त्याच्यावर करणी केली आहे. ती सध्या त्याच्या पोटात भरली आहे. त्यामुळे त्याचा धंदा व मानसिक आरोग्य बिघडले आहे. ‘करणी जबर असून यावर वैद्यकीय उपचार घेऊ नका. फक्त माझाच उपाय चालेल,’ असे सांगत अंगार्‍याच्या चार पुड्या दिल्या. त्या घरातील सर्वांना खाण्यास व घरी, कारखान्यात फुंकण्यास सांगितले. कुलदैवताच्या दर्शनास जाऊन येण्यास बजावले.

त्यानंतर 23 जानेवारी 2020 रोजी धनश्रीने प्रवीणच्या बायकोचे सोंग घेतले. “लग्नाला तीन वर्षे झाली, तरी मूल होत नाही म्हणून तो मला त्रास देत देतो, मारझोड करतो, तो धंदाही नीट करत नाही म्हणून मला त्याच्याजवळ राहावेसे वाटत नाही,” असे सांगितले. तेव्हाही बाबाने करणीचेच कारण सांगितले. पितळी डबा जमिनीला चिकटला, तेव्हा ‘तुम्हाला इथे सात वार्‍या कराव्या लागतील. पैशाची गरज लागेल, मी म्हणेन तसे करावे लागेल,’ असे बजावले. अंगार्‍याच्या पुड्या देऊन तो प्रवीणच्या जेवणातून सतत घालण्यास सांगितले. “प्रवीणचा शर्ट आणून द्या. त्यावर मी मंत्र टाकून देतो. तो घरी नेऊन अंगार्‍याची धुरी जसजशी त्या टांगलेल्या शर्टाला द्याल, तसतशी त्याच्यात सुधारणा होऊन तुम्हा नवरा-बायकोत प्रेम वाढीस लागेल,” असे सांगितले. तिला कबरीजवळ जाऊन तसे बोलण्यास सांगितले. या सर्व प्रकाराचे व बोलण्याचे व्हिडीओ शूटिंग चंद्रकांत वंजाळे यांनी बाबाच्या नकळत केले. हा पुरावा सांगलीतील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बेंद्रेसाहेब व पोलीस उपनिरीक्षक माळीसाहेब यांना दाखविताच मुजावरबाबाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचे ठरले. पुढील गुरुवारी म्हणजे 30 जानेवारी 2020 या दिवशी म्हणजे भोंदूबाबांचे भोंदूपण उघड करून दाखविणार्‍या संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीदिवशी मुजावरबाबाचा पर्दाफाश करण्यासाठी वरील पोलीस फौज व सांगली अंनिसचे कार्यकर्ते सज्ज झाले. प्रथम मुजावरबुवाला देण्यात येणार्‍या 1551 रुपये रकमेची झेरॉक्स काढून नोंद झाली. तेथे दिल्या जाणार्‍या शर्टच्या फोटोचीही नोंद झाली. सूचनेप्रमाणे सकाळी 10.30 ला प. रा. आर्डे सर, प्रवीण कोकरे, आशा धनाले, त्रिशला शहा, धनश्री साळुंखे व चंद्रकांत वंजाळे हे कार्यकर्ते; तसेच साध्या वेषातील 6 कॉन्स्टेबल व पोलीस वर्दीतले बेंद्रेसाहेब व माळीसाहेब हे समडोळीस रवाना झाले. ठरल्याप्रमाणे सर्वजण बुवाच्या घरापासून ग्रामपंचायतीपर्यंत आपापली जागा घेऊन थांबले. धनश्री साळुंखे, आशा धनाले व एक लेडी कॉन्स्टेबल बुवाच्या दरबारात दाखल झाल्या व पुढील पाच मिनिटांत त्यांनी आपले गार्‍हाणे सांगत शर्ट मंत्रून देण्यास सांगितले व सोबत आणलेली रक्कम कबरीजवळ ठेवली; तसेच बाहेरून दरवाजा ठोठावण्यात आला. दार उघडताच पी. आय. बेंद्रेसाहेब, पी.एस.आय. माळीसाहेब इतर पोलिसांसह दरबारात प्रवेशले. इतर पोलिसांनी याची झडती घेऊन मोबाईल ताब्यात घेण्यात आला. तेथील सर्व वस्तूंची चौकशी करून त्यांचे फोटो बाबासह घेण्यात आले. काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. दरबाराचे व पुढील खोलीचे मोजमाप करण्यात आले. बाबाच्या घरच्या मंडळींच्या विरोधाला न जुमानता त्याला अटक करून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यानंतर सर्व वस्तू सील करून आर्डे सर व चंद्रकांत वंजाळे या पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला व एफ.आय.आर. नोंद करून त्याची प्रत अंनिसकडे देण्यात आली. यानंतर दुसर्‍या दिवशी बाबाच्या मुलालाही अटक होऊन बाबाची पत्नी व मुलाला सहआरोपी करण्यात आले. बाबाला दुसर्‍याच दिवशी कोर्टात हजर करण्यात आले. गुरुवारच्या या घटनेनंतर शनिवारपर्यंत बाबाला जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले.