मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आपण कशा प्रकारे विकसित करू शकू?

विवेक सावंत -

कोल्हापूर येथे झालेल्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मा. विवेक सावंत यांनी केलेल्या भाषणाचा पुढील भाग

मुलांमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो? एक गोष्ट सांगतो. चार्ल्स, द सेकंड हा इंग्लंडचा राजा होता. याने 1662 मध्ये रॉयल सोसायटीची स्थापना केली आणि विज्ञानाला, वैज्ञानिकांना राजाश्रय दिला. ज्या हार्वेने रक्ताभिसरणाचा शोध लावला होता, तो त्याचा शिक्षक होता. रॉबर्ट हूक आणि रॉबर्ट बॉईल हे दोन भौतिकशास्त्रज्ञ त्याचे शिक्षक होते. त्याच्या वडिलांनी त्याला युद्धावर नेले. तिकडून आल्यावर परत शिक्षण सुरू झालं. त्याला विज्ञानाची आवड होती. नंतर-नंतर त्याची प्रकृती बिघडली, तेव्हा तो राजा असला तरी प्रयोगशाळेत प्रयोगच करत बसलेला असायचा, वैज्ञानिकांशी संवाद साधायचा. एके दिवशी दरबारात आला, तेव्हा अस्वस्थ दिसत होता. दरबारातील लोकांनी विचारलं, ‘काय झालं?’ राजा म्हणाला, ‘काल एक प्रयोग केला. एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्यात मासा टाकला आणि वजन केलं. त्यानंतर मासा बाहेर काढला. तो फडफड करून मेला. पुन्हा त्या भांड्यात टाकला. पुन्हा वजन केलं. जे पहिल्यांदा वजन केलं, ते दुसर्‍यांदा केलेल्या वजनापेक्षा कमी होतं. असं का झालं असेल, हे मला कळत नाही,’ असं सांगितलं. राजाने हे सांगितलं आहे, त्याचे कारण शोधले पाहिजे म्हणून दरबारातील सर्व शास्त्रज्ञ विचार करू लागले. त्यातील प्रत्येक शास्त्रज्ञाने वेगवेगळी हायपोथेसिस सांगायला सुरुवात केली.

नाशिकला विज्ञानात गती असलेल्या लहान मुलांच्या कार्यक्रमात मी मुलांना ही गोष्ट सांगितली आणि मुलांनी निरनिराळी हायपोथेसिस देणं सुरू केलं. मी मुलांना ही गोष्ट सांगितली. मुलंसुद्धा वेगवेगळी हायपोथेसिस सांगत होती. खूप कल्पनाशक्ती मुलं लढवत होती. प्रत्येकाचं हायपोथेसिस आम्ही खोडून काढत होतो. आमची जुगलबंदी चालू होती. शेवटी चार्ल्स, द सेकंडने जे केलं, तेच मी केलं. सगळ्या शास्त्रज्ञांचा युक्तिवाद संपल्यावर चार्ल्स, द सेकंड असं म्हणाला, ‘दोन्ही वेळेस वजन सारखंच भरलं होतं.’ त्याच्यातून त्याने एक सूचक असा संदेश दिला. एखादी गोष्ट का घडते, याचा विचार करण्याची घाई करण्याआधी ती गोष्ट खरोखरच घडते का, हे प्रथम तपासलं पाहिजे. आपण जेव्हा मुलांमध्ये जाऊ, त्यावेळेला अशा प्रकारचे collaborative, co-operative learning असे प्रयोग केले की काय प्रत्यय येतो? त्या मुलांनी पुढचे दोन दिवस मला सोडलं नाही. आम्ही इतके प्रयोग केले की विचारू नका. एकदा मुलांना वैज्ञानिक प्रयोगाचा अनुभव आला की, आपण अनुभवांनी त्यांच्या जाणिवा बदलू शकतो.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मधील clever भाग जो आहे, तो तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. मात्र त्याने त्या प्रश्नांची उत्तरे तशीच का दिली, यावर चिंतन करू शकत नाही. याच्याकडे तो तटस्थपणे बघू शकत नाही, म्हणून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मानवी बुद्धी Human Intelligence आपल्या मनोव्यापाराकडे अनुभवाच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीने बघू शकते आणि आपल्या वर्तनामध्ये बदल करू शकते. वैज्ञानिक जाणिवांचे प्रबोधन करताना आपण किती अनुभव मुलांसमोर ठेवणार आहोत, यावर आपलं यश अवलंबून राहील. आपण त्यांना नुसतीच भाषणं, स्लाईड शोज, व्हिडिओज वगैरे दाखवत बसलो आणि त्यांना अनुभव दिला नाही तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

परवाच मी एका शाळेत गेलो. एक साधा प्रयोग केला. बिसलेरी बाटलीमधील पाणी ग्लासात ओतलं. तिचं झाकण काढलं आणि उलट होडीसारखं ग्लासात टाकलं आणि मुलांना म्हटलं, ‘ते झाकण कुठे चाललं आहे?’ मुलं म्हणाली, ‘ते काचेला चिकटून आहे.’ हा प्रयोग करून माझे गुरू अरविंद गुप्ता यांनी माझी परीक्षा घेतली होती. सुदैवाने मी पास झालो होतो. मी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक असलो तरी परीक्षा पंधरा-वीस मिनिटे चालली होती. मी मुलांना विचारलं, ‘हे झाकण आपल्याला मध्यभागी आणायचंय, तर काय काय कराल?’ या छोट्या गोष्टीवर मुलं एक-एक तास आयडियाज देत राहतात. मी याचं उत्तर तुम्हाला देणार नाही. तुम्ही घरी गेल्यावर हा प्रयोग करून बघा. हे सांगण्याचा उद्देश असा की, वैज्ञानिक जाणिवा विकसित करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. शाळेत चुकीच्या विज्ञानशिक्षणानं जी कुलपं बसवली आहेत, ती पटापटा आपण उघडू शकतो. काहीही अडचण येत नाही; आणि ते सांगत असताना आपण त्यांना, ‘तुम्ही आज कोणाच्या खांद्यावर उभे आहात? तुम्ही आज आई-वडिलांना डायरेक्टली प्रश्न कसा विचारू शकता? तुम्ही शिक्षकांना कसं चॅलेंज करू शकता? हे सगळ का शक्य होत आहे?’ हे सांगायला विसरता कामा नये. हे आपल्या अभियानात खूप महत्त्वाचे आहे.

सॉक्रेटिसला फक्त प्रश्न विचारण्यासाठी विष प्राशन करून मारण्याची शिक्षा झाली होती, हे आपण कधीही सांगायला विसरता कामा नये. केवढं भयंकर आहे बघा! प्रश्न का विचारायचे? सॉक्रेटिस काय म्हणायचा की, ‘मला माझ्याबद्दल एवढंच माहीत आहे की, मी अज्ञानी आहे. मला स्वतःबद्दल काही माहितीच नाही.’ केवढा मोठा विचार! आणि मग मी जे काही आहे, ते unconditioned intelligence आहे; म्हणजे प्रश्न विचारणार आणि सगळ्या युवांनी प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारण्याचे मूल्य त्या समाजात रुजवण्यासाठी एका माणसाला विष प्राशन करण्याची शिक्षा मिळाली, हे सांगायला आपण विसरता कामा नये. गॅलिलिओचं असंच उदाहरण आहे. तेसुद्धा व्यवस्थित सांगायला आपण विसरता कामा नये. गॅलिलिओबद्दल आपण विचार करतो, त्यावेळी गॅलिलिओच्या मनात काय बरं चालू असेल, असे विचार माझ्या मनात येतात. ज्या वेळेस त्याला सांगितलं गेलं की, ‘आता तू माफी मागितलीस आणि म्हणालास, ही पृथ्वी अचल आहे. ही पृथ्वी फिरतच नाही, तर मग तुला आम्ही माफ करू आणि आयुष्यभर बंदिवासात ठेवू.’ त्याने गुडघे टेकून तिथे माफी मागितली आणि असं सांगितलं की, ‘कोणी असा पाखंडी मताचा प्रचार करू लागला तर त्याचा तो न्यायसभेपुढे निषेध करेन.’ इथपर्यंत गॅलिलिओ म्हटला; म्हणजे मी विचार करतो की, जग बदलून टाकणार्‍या या माणसाने कोर्पनिकसचा प्रश्न सोडवला, अशा प्रतिभेचा हा मनुष्य हा मनात काय विचार करत असेल? मला असं वाटतं, तो मनात असं म्हणत असेल की पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही; सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी अचल आहे. मग तो मनातल्या मनात एक वाक्य म्हणत असेल की, ‘पण मी म्हटल्याने फरकच काही पडत नाही. ही वैज्ञानिक दृष्टी आहे. ठीक आहे, तुमच्या दबावासाठी मी मान्य करतो. पण मी असं म्हटल्यानं फरकच नाही. कारण जे विश्वामधलं सत्य आहे, ते मला काय वाटतं, याच्याशी निरपेक्ष आहे.’ ही गोष्ट विज्ञानामध्ये येते.

बर्तोल्त ब्रेख्त नावाचा अत्यंत प्रतिभाशाली जर्मन नाटककार होऊन गेला. विजयाताई (मेहता) त्यावर काम करत होत्या. ‘तीन पैशांचा तमाशा’ (थ्री पेनी ऑपरा) हे त्याच कामावर आधारित आहे. बर्तोल्त ब्रेख्त पुण्याला आलेले होते आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांनीच लिहिलेलं ‘गॅलिलिओ’ नाटक मराठीत प्रदर्शित झालं. त्या नाटकामध्ये एक अत्यंत मजेशीर प्रवेश आहे की, गॅलिलिओ दुर्बिणीतून बघतो आहे आणि एक्साईट झालेला आहे. रोमहर्षक अशी त्याची परिस्थिती आहे आणि ओरडून सांगतोय, ‘I see moons of Jupiter – गुरूभोवती चंद्र फिरतात.’ आणि ते काहीतरी पृथ्वीभोवती न फिरणारं हे मला सापडलेय, अशी त्यात मजा आहे. मोठ्या उत्साहाने हे तो सगळ्यांना सांगतोय. तितक्यात चार धर्मगुरू तिथे येतात आणि तो म्हणतो, ‘बघा, बघा याच्यातून गुरूचे चंद्र कसे दिसताहेत.’ आणि धर्मगुरू तिथे चर्चा काय करतात; पण या दुर्बिणीतून बघितले असता सत्यच दिसेल हे कशावरून? म्हणजे आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून विश्वाचे आकलन करून घेण्याच्या प्रमुख अशा ज्ञानमार्गाला ते छेद करतात. हा संघर्ष बर्तोल्त ब्रेख्त यांनी त्यांच्या ‘गॅलिलिओ’ या नाटकात उभा केला आहे. अशा प्रकारची नाटकं शाळेमध्ये आपल्याला बसवता येतील का; ज्याच्यातून एक खोल असा संदेश जाऊ शकतो की, ‘अरे किती चॅलेंजस, जे दिसतंय डोळ्याला ते स्वीकारायचं की नाही?’

आइनस्टाइननं खूप सुंदर सांगून ठेवलंय. विश्वाविषयी सर्वार्ंत अनाकलनीय गोष्ट जर कुठली असेल तर ते आकलनीय आहे : The most incomprehensible thing about the universe is that universe is comprehensible. आता विश्व आकलनीय आहे, ही गोष्ट आइनस्टाइन आपल्याला सांगतात, तेव्हा हा निसर्ग पिंजर्‍यात असलेल्या सिंहासारखा आहे. पहिल्यांदा असं शेपूट बाहेर आलेलं दिसतं; मात्र तुम्ही अभ्यास करू लागला, निरीक्षण लिहू लागला, निष्कर्ष काढू लागला त्या वेळेस हे कळून येईल. त्याविषयी एक सुंदर असं विधान केलेलं आहे. त्याच्या अनुभवावर आधारित केलं आहे. शब्दप्रयोग वेगळा असला तरी त्याचा भावार्थ लक्षात घ्या. Subtle is the Lord, but malicious is not. लॉर्ड म्हणजे परमेश्वराला उद्देशून म्हणतात, ‘तो सूक्ष्म आहे; मात्र दुष्ट मात्र नाही.’ तो निसर्ग आपली रहस्यं दुष्टपणाने झाकून ठेवत नाहीये. त्याच्या सूक्ष्मपणामुळे ती झाकली गेली आहेत. तुम्ही जितक्या सूक्ष्मपणे विज्ञानाचा अभ्यास कराल तेवढी त्याची रहस्यं सापडत जातील. पण विज्ञानाची परंपरा या सूक्ष्माचा अभ्यास करताना येणार्‍या प्रत्येक अभ्यासकाला आव्हान देणारी आहे. कारण पूर्वी जे सापडलेलं आहे, ते सहजासहजी वैज्ञानिक सोडत नाहीत. वैज्ञानिकांमध्ये जे सिद्धांत तयार होतात, त्या सिद्धांतांना छेद देणारी निरीक्षणे ज्या वेळेस समोर येतात, त्या वेळी वैज्ञानिकांचे समूह पूर्वीच्या सिद्धांताने स्पष्टीकरण करण्याचा निकराचा प्रयत्न करतात. हा निकराचा प्रयत्न असतो. ते सुद्धा वैज्ञानिक पद्धतीमधले एक मूल्य आहे. शेवटी त्यांची हार होते.

मात्र जो दुसरा ‘थिसीस’ आहे तो जास्त स्ट्राँग होत जातो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला ‘थिसीस’ असतो, त्याचवेळेस नव्या निरीक्षणातून एक ‘अँटी-थिसीस’ मांडला जातो. या दोघांत जेव्हा प्रचंड वैचारिक घुसळण होते, त्याच्यातून एक ‘सिन्थेसिस’ बाहेर पडतो आणि विज्ञानाची परंपरा पुढे जाते. हे रोमहर्षक अनुभव विद्यार्थांसमोर प्रत्यक्ष करून दाखवता येतात. उदा. केपलरचा refraction of light बद्दलचा प्रयोग आम्ही करायचो. ‘फर्ग्युसन’मध्ये शिकवायचो. केपलरच्या प्रयोगातल्या अडचणी समोर आणल्या की, मी मुलांचा छळ करायचो; अक्षरशः की अरे आता काय-कसं करायचं, कसं सोडवायचं; आणि आता तुम्ही माझ्यावर काही काळासाठी विश्वास ठेवला पाहिजे, तो असा प्रत्येकी एक विद्यार्थी-विद्यार्थिनी तरी उसळून माझ्या अंगावर येऊन म्हणायची, ‘सर बट नो, लूक अ‍ॅट धिस वे!’ आणि मग मी म्हणायचो, ‘न्यूटनने अगदी असाच विचार केला.’ एका वर्षी एका मुलीला पुढे मुलांनी ‘मिस न्यूटन’ असंच नाव देऊन ठेवलं होतं. तिचं खरं नाव आजही मला आठवत नाही. मुलांपुढे त्या-त्या काळातील आव्हाने प्रयोगाच्या माध्यमातून उभी केली तर ही मुलं न्यूटनच्या प्रतिभेपर्यंत जातात. एका मुलीने मला वर्गात शिकवताना प्रश्न विचारला होता – अ‍ॅटमचे स्ट्रक्चर शिकवत होतो – निल्स बोअरची थेअरी. तर इलेक्ट्रॉन हायर एनर्जी स्टेटमधून लोअर एनर्जी स्टेटमध्ये ट्रांझिशन करतो आणि एक प्रोटॉन बाहेर पडतो. साधी गोष्ट. त्या मुलीने मला प्रश्न विचारला, ‘सर, तुम्ही इतके इलेक्ट्रॉन या अ‍ॅटममध्ये दाखवलेत की, याच्यातील नक्की कुठला इलेक्ट्रॉन खाली येतो?’

तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर होतो; पण अकरावी-बारावीचा वर्ग मागून घ्यायचो. त्रास झाला मला. ते मला म्हणाले, ‘तुम्ही अनुभवी नाही आहात. वय कमी आहे. तुम्ही अकरावी-बारावीला शिकवू शकत नाही वगैरे वगैरे.’ पण तीन वर्षे संघर्ष करून मिळवलं होतं. मला त्या वर्गातल्या मुलांना आइनस्टाइनची transition probability theory शिकवता आली की, कुठला इलेक्ट्रॉन नक्की खाली येतो. It is decided probablistically! ते संभाव्यतेच्या आधारे ठरवले जाते.

आता कारण याच्यातील मजा अशी आहे की, विज्ञानामध्ये दोन तत्त्वं असतात, ती मुलांमध्ये आपण कशी रुजवू शकू? विज्ञान म्हणजे केवळ वैज्ञानिक पद्धती नाही, ती जीवनदृष्टी आहे. त्यादृष्टीने ते काम आपल्याला करायचंय, तरच मग आपण अशा जागतिक सत्ता तयार होताहेत, त्यांना आव्हान देऊ शकतो. ज्यावेळेस नील्स बोअरने uncertainty principle चे नवीन स्कूल आणले, तेव्हा ते म्हणायला लागले की, ‘आता समजा मी इथे एक लोखंडाचा गोळा ठेवला आणि तो असा चालला. तिकडून मी बघतोय, त्यावर जो लाईट पडतो रिफ्लेक्ट होऊन ‘फोटॉन’ येतो तो तुम्हाला दिसतो आणि तो पुढे-पुढे चाललाय. आता हा गोळा आहे. त्याची साईझ मी कमी-कमी-कमी करत गेलो आणि शेवटी तो इलेक्ट्रॉनच्या आकाराचा झाला तर काय होतं? हा जो फोटॉन येतो, तो त्याच्यावर आदळला की इलेक्ट्रॉनच स्वतःची जागा बदलतो; म्हणजे the very process of observation disturbs the observable ! म्हणजे जेव्हा मला निरीक्षण करायचंय, माझ्या निरीक्षणाची प्रक्रियाच मुळी निरीक्षण बदलून टाकते. त्यामुळे एक संभाव्यतेचा, अनिश्चिततेचा असा एक प्रांत फिजिक्समध्ये तयार होतो.’ आइनस्टाइनला वाटतं होतं की, पूर्वनिश्चिती हे विज्ञानाचे तत्त्व आहे. जर मला आताची पोझिशन (स्थळ) आणि मोमेंटम (गती) माहीत असेल तर मी ते पुढे ‘प्रेडीक्ट’ करू शकतो आणि याला मोठं आव्हान याच्यातच मिळालं. मग रोज सकाळी ‘सॉलव्हे कॉन्फरन्स’मध्ये बोअर आणि आइनस्टाइन बसायचे. आइनस्टाइन रोज एक अडचण त्यांच्यासमोर मांडायचा आणि बोअर रोज संध्याकाळी ती सोडवायचे. त्याचा एक रोमहर्षक इतिहास आहे. आइनस्टाइनचे एक वचन आहे की, God does not play dice! देव फासे खेळत नाही. देवाचं सर्व predetermined असतं. पूर्वनिश्चित आहे, असं आइनस्टाइन म्हणतो. आता मोठ्या गुरुजींना कसं आव्हान द्यायचं? पण विज्ञानामध्ये हा प्रश्न नाही. बोअर कितीही लहान असले तरी त्यांनी निर्भयपणे, नम्रपणे आइनस्टाइनला सांगीतलं की, ‘देवाने काय करायचं ते देवाला ठरवू द्या. देव फासे खेळतो की नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? देवाला त्याचे स्वातंत्र्य आहे, म्हणजे काय?’

आज आपलं जीवन uncertainty principle स्वीकारल्यामुळेच चालतं; पण विज्ञानाची दृष्टी मुलांना निर्भयता आणि नम्रता देते. एक जास्त आणि एक कमी होऊन चालत नाही. ही गोष्ट मुलांमध्ये रूजवणं. त्यामुळे कोणीही कितीही सर्वसत्ताधीश येऊ दे; महात्मा गांधींचा आत्मबळाचा सिद्धांत आहे, तो त्यांच्यासमोर येतो. असं ज्यावेळेस होते, अशा प्रकारचं एक मानसिक बळ ज्या वेळेस मुलांमध्ये मिळतं, त्या वेळेस आपल्या देशासमोर जे स्वप्न आहे, त्या स्वप्नाच्या दिशेने जायला आपण पूर्ती करतो, हे मला तुम्हाला सांगायचंय. हे स्वप्न आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. घटनेसंबंधी शेवटचं त्यांचं जे भाषण आहे, त्यात हे स्वप्न खरंतर ही समस्या मांडली, त्याचं स्वप्नात रूपांतर आपण केलं पाहिजे की, One Man-One Vote ! एक मनुष्य-एक मत. फार मोठी गोष्ट आहे, अनेक देशांमध्ये असा मताधिकार मिळाला नव्हता. स्त्रियांना मिळाला नव्हता; पण तो आपल्याकडे मिळाला. एका मताला एकच मूल्य आहे; म्हणजे जर मी दिलं किंवा माझ्यापेक्षा खूप श्रीमंत अशा माणसाने दिलं. त्यांच्या मताचे वेटेज 100 आणि यांच्या मताचे वेटेज 0.1 असं होत नाही. सर्वांना एकच मूल्य; मग एक व्यक्ती, एक मत, एक मत, एक मूल्य. त्यामुळे जन्माने येणार्‍या कुठच्याही गोष्टीवर उच्च-नीचता अवलंबून राहता कामा नये, ही वैज्ञानिक दृष्टी मुलांपर्यंत जायला हवी आणि त्याच्यातून समतेवर आधारलेला एक समाज आपण निर्माण करू शकतो.

म्हणजे याच्यातून वैज्ञानिक दृष्टी कशी विकसित करायची, हा खरा प्रश्न आहे. शाळेच्या पहिल्या पानावर छापलेलं असतं की, ‘आपण सारे भारतीय आहोत आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ मग ती बंधुता कुठे गेली? ती कशी येते? त्याच्यामागचं विज्ञान काय, याची चर्चा मुलांबरोबर करणं भाग पडतं. सॉक्रेटिस, गॅलिलिओ, बोअर, आइनस्टाइन यांच्यासारखे लोक आहेत. यांनी आपलं जीवन समर्पित केलं, हे आपण मुलांना सांगायला विसरता कामा नये. महाराष्ट्रात असंच मन्वंतर झालं, ते म्हणजे डॉ. दाभोलकर. त्यांची जी हत्या झाली, ती देशातल्या प्रबोधनयुगाची सुरवात होती, हे सांगायला कधीच विसरू नये. बरेच जण म्हणतात, आपल्याकडे प्रबोधन झालेच नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये प्रबोधनाची कशी सुरवात होत होती, ते मुलांना सांगितलं पाहिजे; आणि त्या प्रबोधनाचे भय एवढं की, त्यामुळेच दाभोलकरांची हत्या झाली. कारण त्या प्रबोधनाचे ते एक प्रतीक होते. त्यांच्या हत्येनंतर आपण लक्षात घ्या, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांची हत्या एका साखळीमध्ये झाली. त्याच्यातून भारतामध्ये एका अंधःकार युगाची सुरुवात झाली आहे. जणूकाही अंधःकार युगाच्या पूर्वतयारीच्या कटाचा भाग म्हणून त्या हत्या झाल्या, असं म्हणण्यासाठी सबळ पुरावा आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपल्याला किती जागृत राहायचं आहे, किती मोठ्या शक्तींशी संघर्ष करायचा आहे आणि मुलांच्या मनामनांत बदल घडवून आणायचे आहे, हे आव्हान आपल्यासमोर असले पाहिजे. कुसुमाग्रजांच्या एका कवितेमध्ये त्यांनी म्हटल्यासारखं – ‘हिमलाट पाहा, पहाटे जगावर आली!’ जगामध्ये पहाट होत होती. एक renaissance महाराष्ट्रात येत होता. गावोगावी अंधश्रद्धेविषयी जागृती निर्माण झाली होती. मात्र त्यांना शब्दांत ते सांगता येत नव्हते. लोकांच्या जाणिवेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण दाभोलकरांनी केली होती. आज दाभोलकर असते तर त्यांनी कुठल्या गोष्टीवर प्रहार केला असता, हे आपल्या प्रतिभेने पाहणं हे आपल्यासमोरचे आव्हान आहे.

त्यामुळे ही जी नवीन एक प्रकारची तंत्रवैज्ञानिक अशा प्रकारची एकाधिकारशाही निर्माण होऊ शकते, तिच्याने जो अंधश्रद्धेचा प्रसार होऊ शकतो, त्याच्याने समाजातली विषमता वाढू शकते. त्याच्याने आता तुम्ही फक्त वंचित, पीडित, शोषित, दुर्लक्षित, बेरोजगार, बेघर असंच फक्त राहणार नाहीये, तर आता जी नवीन गोष्ट घडते आहे, त्यामुळे हे मोठे मानवी समाज जे आतापर्यंत गरिबी, अज्ञान, विषमतेमध्ये खितपत पडले आहेत, ते नुसते शोषित राहणार नाहीत, तर हे बेदखल होणार आहेत.

मुलांशी संवाद साधताना पहिली गोष्ट म्हणजे मनापासून दिलेलं स्मित. त्याच्याने तुम्ही भावनिक मेंदूचे कुलूप उघडता; मग तुम्ही वैचारिक मेंदूत काम करू शकता. मी ते केलं आणि मग मुलांना म्हटलं, ‘तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर चालेल का?’ गोष्ट म्हटल्यावर प्रॉब्लेमच नाही; मग कोण आहे, कुठला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मी त्यांना म्हटलं -“एक तालुक्याचं गाव होतं. त्या गावात संध्याकाळ झालेली होती. एसटीच्या शेवटच्या बसेस खेडेगावाकडे जाण्यासाठी लगबगीने निघत होत्या. अर्थातच, त्यामुळे त्या खचाखच भरलेल्या होत्या. अशातच एक म्हातारी हातात कुत्र्याचे पिल्लू घेऊन गाडीत चढली. कुत्र्याचे पिल्लू लागलं भुंकायला. तेव्हा कंडक्टर म्हणाला, ‘आजी तुम्ही आणि ते पिल्लू खाली उतरा.’ ती म्हणाली, ‘का रे बाबा?’ कंडक्टर म्हणाला, ‘हा नियम वाचा – बसमध्ये पाळीव प्राण्यांना प्रवेश नाही.’ आजी म्हणाल्या, ‘असं काय करता? अर्ध्या तासावर माझं गाव आहे, जाऊ दे ना आजच्या दिवस; परत असं होणार नाही.’ कंडक्टर म्हणाला, ‘नाही.’ आजी शेजारच्या प्रवाशांना म्हणाल्या, ‘अरे, तुम्हाला तरी माझी दया येते की नाही? तुम्ही तरी सांगा ना त्याला.‘ प्रवासी म्हणाले, ‘काय ते एवढसं कुत्र्याचं पिल्लू, कशाला त्रास देताय आजींना?’ तरी कंडक्टर म्हणाला, ‘नाही. नियम वाचा.” मी गोष्ट इथेच थांबवली. कारण पाच मिनिटं सांगितल्यावर काही कृती केल्याशिवाय माहितीचे ज्ञानात रूपांतर होत नाही, हा रचनावादातला सिद्धांत आहे.

मी ताईंना म्हणालो, ‘मी जे काही बोललो त्यावर प्रश्न विचारा.’ ताईंनी काय प्रश्न विचारला असेल? ‘म्हातारी हातामध्ये काय घेऊन चढली?’ मी ताईंना म्हणालो, ‘ताई, हा विसाव्या शतकातला प्रश्न झाला. तुम्ही माहितीकडून माहितीकडे जाताय?’ कारण सगळी पोरं ओरडली, ‘कुत्र्याचे पिल्लू!’ ‘ताई, आपल्याला माहितीकडून ज्ञानाकडे जायचंय.’ आमची थेअरी आम्ही सांगितली. त्या म्हणाल्या, ‘भाऊ, तुम्ही काय सांगताय ते मला समजत नाही. तुम्हीच विचारा ना प्रश्न!’ आता आमच्यावर पाळी! बाप रे…! आता काय प्रश्न विचारू? मग मी थोडासा विचार करून प्रश्न विचारला की, ‘तो कंडक्टर सारखा-सारखा नियम दाखवत होता, तो असं का करत होता, असं तुम्हाला वाटतं.’ सगळी मुलं चिडीचूप! कारण त्यांना, ‘तुम्हाला काय वाटतं,’ असं आयुष्यात कधीही कुणीही विचारलं नव्हतं. सगळ्यांच्या तोंडावर कुलूप. मला ब्रुसलीच्या पिक्चरमधली आठवण झाली. ‘एन्टर द ड्रॅगन’मध्ये तो कराटे शिकवतो आणि सरावानंतर त्या मुलाला विचारतो, ‘What do you feel young man ?’ पोरगा म्हणतो, ‘मी जरा विचार करून तुम्हाला सांगतो.’ तो त्या मुलाच्या डोक्यात टपली मारून म्हणतो, ‘I am asking you, what do you feel, not what do you think?’

मी मुलांना ‘काय वाटतं,’ हे विचारलं होतं आणि मुलं त्यावर विचार करत बसली होती. मग एक शिक्षणतज्ज्ञ आहे, त्याचा आसरा मी घेतला आणि मुलांना ‘स्कॅफल्ड’ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या भोवती प्रश्नांचे वलय तयार करायला सुरुवात केली. मग त्याचा परिणाम चांगला झाला. एका मुलीचा हात वरती गेला. ती मुलगी ‘कडेकपारीतील.’ मला असं वाटतं, रचनावादाचा परिपोष तिथे होत होता. ती म्हणाली, ‘आपल्या देशातील लोक बेशिस्त आहेत आणि कंडक्टर खूप शिस्तप्रिय होता, म्हणून तो नियम सारखा-सारखा दाखवत होता.’ माझ्या अंगावर काटा आला. भारताला भवितव्य नाही, असं कोण म्हणतं. एका कोपर्‍याच्या शाळेतील मुलगी इतका स्वतंत्र विचार मांडू शकत होती. तिच्यामुळे मुलांना स्फूर्ती मिळाली. मी एका मुलाला विचारलं, ‘काय तुला वाटतं?’ तो म्हणाला, ‘सर खरं सांगू, त्या कंडक्टरला दहा रुपये लाच हवी होती, म्हणून तो सारखा नियम दाखवत होता.’ तिसर्‍याला स्फूर्ती झाली. आता तो बोलू लागला. तिसरा म्हणाला, ‘मी पण रोज बसनेच शाळेला येतो; पण एके दिवशी एक माणूस बसमध्ये चढला. त्याच्या हातात एक कोकरू होतं. त्या कोकराने बसमध्ये लेंड्या टाकल्या आणि पुढच्या स्टॉपला कंडक्टरचे साहेबच गाडीमध्ये शिरले आणि त्या कंडक्टरला झाप झापला. बहुतेक हा माणूस आणि तो कंडक्टर मित्र असावेत. कुठलीही रिस्क नको, म्हणून तो नियम दाखवतोय.’ मग चौथा म्हणाला, ‘सर, मला काय वाटतं माहीतेय का, या कंडक्टरला लहानपणी कुत्रा चावला असावा, म्हणून तो घाबरतोय आणि नियम दाखवतोय.’ अशी खूप उत्तरे होती. माझ्या लक्षात आलं की, प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करू शकत होता.

माझ्या लक्षात आलं की, ते सर्वजण स्वतंत्र अभिव्यक्ती करत होते. त्यांना जे काही अनुभव येत होते, त्याआधारे त्यांनी काही ज्ञानरचना केली होती आणि सर्वार्ंत महत्त्वाची गोष्ट अशी होती, याचं कारण असं होतं की, त्यांनी एक मुक्त प्रश्न विचारलेला होता. याचं एकच एक उत्तर नव्हतं. त्यामुळे आपल्या अभियानामध्ये एकच एक उत्तर येणारे प्रश्न विचारता कामा नयेत. ज्याची अनेक उत्तरे संभवतात, असे प्रश्न विचारायला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण विज्ञानामध्ये समस्या निर्माण होते, ती काही एकच उत्तर घेऊन येत नसते. अनेक उत्तरं संभवतात. याच्यामुळे वर्गामध्ये लोकशाही निर्माण झाली होती. प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपल्याला काही मिळू शकते. आपण त्यांच्या विचारांविषयी सहिष्णु राहिलं पाहिजे. याचा एक वस्तुपाठ तिथे मिळत होता. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही की, वर्गातले सगळे मेंदू कार्यरत होते. शेवटी समाजातले सर्व मेंदू कार्यरत केल्याशिवाय अंधश्रद्धेचे निराकरण करता येणार नाही. लोकशाही प्रत्येक वर्गखोलीतच निर्माण करावी लागेल.

(क्रमश🙂

शब्दांकन ः सौरभ बागडे, दापोली

वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान उद्घाटन परिषद विवेक सावंत यांचे भाषण -भाग 1


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]