राजीव देशपांडे -
एका बाजूला संसदेच्या विशेष अधिवेशनात चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल सर्व खासदारांकडून भारतीय शास्त्रज्ञांचे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल गुणगान चालू होते तर दुसरीकडे मुंबईतील घाटकोपर येथील आमदार राम कदम आपल्या मतदारसंघात कंबल टाकून लोकांचे आजार बरे करणार्या कंबलवाल्या बाबाची शिबिरे घेत पोलिसांच्या साक्षीने लोकांच्या अंधश्रद्धाना खतपाणी घालत होते. सर्वजण टीव्हीवर, मोबाइलवर विक्रम लँडर चंद्रावर उतरताना पाहत होते तेव्हा भारतातील गोदी मीडिया चॅनेल्स ही घटना एका बाजूला दाखवत होते तर दुसर्या बाजूला या सर्व चॅनेल्सवर आमंत्रित केलेले अनेक बाबा, बुवा, ज्योतिषी अकलेचे तारे तोडत होते.
एकीकडे बुद्धिबळासारख्या क्रीडाक्षेत्रात भारतीय बुद्धिबळपटू आपल्या कौशल्याने, मेहनतीने पराक्रम गाजवत होते तर त्याचवेळेस भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खेळाडूंच्या कुंडल्या पाहून ज्योतिषाच्या सल्ल्याने संघाची निवड करत होते. संसदेत स्त्रियांचे राजकीय सक्षमीकरण करणारे “नारी शक्ति वंदना अधिनियम” मंजूर होत होते तेव्हाची संसदेतील भाषणे ऐकताना देशाला गौरव मिळवून देणार्या महिला पैलवानांची, मणिपूरच्या बलात्कारित स्त्रियांची, बिल्किस बानो प्रकरणाची दु:खद आठवण ताजी होत होती.
गेल्या काही आठवड्यांत अतिवृष्टीने हिमाचल प्रदेशामध्ये झालेला प्रचंड विध्वंस आपण पाहिला आहे. याचा संबंध पर्यावरणाच्या परिसंस्थांचा विध्वंस करणार्या तथाकथित ‘विकासा’शी न जोडता हिमाचल प्रदेशातील मंडी येथील आयआयटीचे डायरेक्टर प्रा. लक्ष्मीधर बेहेरा ह्यांनी विद्यार्थ्यांना मांस खाणार नाही, अशी शपथ घ्यायचा सल्ला दिला. कारण त्यांच्या मते हिमाचल प्रदेशात परत परत होणारी ढगफुटी, भूस्खलन ह्या घटना लोक मांस खातात त्यामुळे घडत आहेत.
तमिळनाडूचे एक मंत्री उदयनिधी स्टालिन ह्यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड गदारोळ माजविण्यात आला. पण सनातन धर्म म्हणजे नेमके काय हे स्पष्ट न करता पंतप्रधानांसकट सर्वांनी त्यावर टीका केली. मग गोमूत्र पिऊन कॅन्सरसारखे दुर्धर रोग बरे होतात, असे दावे करणारे, गोरक्षणाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुसलमानांचे जीव घेणारे, दलितांवर, स्त्रियांवर अत्याचार करणारे हे सर्व कोण? डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश, सर्वसामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चिकित्सकबुद्धी ही संविधानाने सांगितलेली मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात यावीत यासाठी आयुष्य झोकून काम करीत होते, त्यांचा खून करणे हे कोणत्या धर्मात बसते? याची उत्तरे काही मिळाली नाहीत.
२०१४ पासून अशा प्रकारची सत्ताधार्यांच्या अवैज्ञानिक वक्तव्यांची, विसंगत व्यवहारांची अनेक उदाहरणे देता येतील. घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि या मंडळींचा दुरान्वयानेही संबंध नाही. पण इस्त्रो, आयआयटी किंवा तत्सम संस्थामधील वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक हेही यांच्या सुरात सूर मिसळू लागले आहेत आणि हे सर्वात धोकादायक आहे. त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी विज्ञान संघटनापुढे एका बाजूला आहे. तर दुसर्या बाजूला या अवैज्ञानिक, खरा इतिहास नाकारून खोटा इतिहास बिंबविणार्या वक्तव्यातून आणि व्यवहारातून जो धर्मांधपणा आणि त्यातून परधर्माबद्दल द्वेष, घृणा निर्माण केली जात आहे. त्यातून होणार्या हिंसेला रोखत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संवैधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याचेही आव्हान आज या संघटनांपुढे आहे.