डॉ.नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालाबाबत अंनिस संघटना आणि दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

-

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी ७:१५ च्या सुमारास, मॉर्निंग वॉकला गेलेले असताना डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला. त्यांच्या खुनाला जवळपास ११ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या खुनाच्या खटल्याचा न्यायालयीन निकाल आज लागला आहे.सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्ष मारेकरी म्हणून न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास प्रत्यक्षात उतरला आहे. वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची जी निर्दोष मुक्तता झाली ह्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देवू अशी प्रतिक्रिया डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, श्रीपाल ललवाणी, राजीव देशपांडे यांनी दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या सोबत कॉ. पानसरे, श्री,कलबुर्गी गौरी लंकेश यांच्या खून खटल्यांच्या सूनावणी मध्ये ह्या मागची व्यापक कट आणि सूत्रधार समोर येतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे .

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामुळे आमचे कुटुंबीय म्हणून झालेले नुकसान कशानेही भरून येऊ शकत नाही, तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील त्यांच्यासारख्या कार्यकर्त्या- नेत्याच्या खुनाने झालेली समाज परिवर्तनाच्या चळवळीची हानी देखील भरून येऊ शकत नाही असे आमचे मत आहे. तरीही काळ पुढे सरकतो आणि उपलब्ध पर्यायांमधूनच आपल्याला स्वतःचे सांत्वन करून घ्यावे लागते याची आम्हाला जाणीव आहे.असे देखील या मध्ये नमूद केले आहे

त्यांच्या खुनानंतर मनात कितीही उद्वेग असला तरी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एकाही कार्यकर्त्याने हातात दगड उचलला नाही कारण आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असलेले आयुष्य जगायचे आहे हा विवेकी निर्णय आम्ही अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते व भारतीय नागरिक म्हणून घेतलेला होता व आज भारतीय न्याय व्यवस्थेवरील आमचा विश्वास सार्थ ठरला आहे.

न्याय मिळण्यासाठी दुःखाचा आणि उद्वेगचा सकारात्मक पद्धतीने पाठपुरावा करावा लागतो हे जाणून आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केले. खुनानंतरची पहिली पाच वर्षे दर महिन्याच्या २० तारखेला त्यांचा खून झाला त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एकत्र जमून आम्ही खुनाचा तपास, सूत्रधारांना पकडणे या मागण्या सातत्याने लोकांसमोर आणि सरकार समोर ठेवल्या. याच वेळी अ‍ॅडव्होकेट अभय नेवगी यांच्या मदतीने हा तपास निष्पक्षपाती व्हावा यासाठीच्या उच्च न्यायालयातील याचिकेचा पाठपुरावा देखील केला. अ‍ॅडव्होकेट अभय नेवगी यांच्या मदतीशिवाय हा रस्ता चालण्याचा विचार देखील आम्ही करू शकत नाही.या खटल्याच्या कामकाजाच्या वेळी उपस्थित राहणे व स्वतःच्या दुःखावरील खपली सतत काढून घेणे आम्हाला भावनिक दृष्ट्या शक्य झाले नसते. आमचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील सहकारी मिलिंद देशमुख हे या संपूर्ण खटल्याच्या प्रत्येक तारखेला उपस्थित राहिले. नंदिनी जाधव व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुण्यातील कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत वेळोवेळी सुनावणीसाठी हजर राहिले. या कुणालाही आम्ही आभार मानणे आवडणार नाही परंतु त्यांच्या या कृतीशील साथीमुळे आम्ही ही वाटचाल करू शकलो हे मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांनी नमूद केले आहे. या खटल्यातील सीबीआयचे वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी अत्यंत समर्थपणे व निर्धाराने ह्या खटल्याचे संपूर्ण कामकाज सांभाळले याबद्दल आम्ही त्यांच्या प्रति अत्यंत कृतज्ञ आहोत. सीबीआयच्या तपास अधिकार्‍यांच्या प्रती देखील आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करतो.

डॉ. दाभोलकरांचा हा खून एका दहशतवादी कटाचा भाग आहे असे सीबीआयने आरोप पत्रात म्हटलेले आहे. या व्यापक कटामागील सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाहीत. सीबीआय तसेच देशातली इतर तपास यंत्रणा या दिशेने भविष्यात काम करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून हा ‘विचाराला विचाराने उत्तर न देता, आम्ही माणूस मारून विचार संपवू, तेव्हा खबरदार!’ असे सांगण्याचा प्रयत्न होता. आमचा माणूस गमावण्याच्या दुःखाइतकेच लोकशाहीवर घाला घालणार्‍या या विरोधाबद्दलदेखील आमचे दुःख तीव्र होते. या संपूर्ण प्रवासात आमच्या व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोबत असलेले आमचे सर्व कुटुंबीय, समविचारी, पत्रकार व संवेदनशील नागरिकांचे आम्ही ऋणी आहोत. महाराष्ट्रातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने या खुनाच्या तपासाचा आणि खटल्याचा अतिशय सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी हा मुद्दा लावून धरल्याने या दीर्घकाळाच्या लढाईत आमचे बळ वाढले. त्यांच्याप्रति आम्ही कृतज्ञ आहोत.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे जीवनध्येय असलेले काम पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली असे आम्ही कायमच मानत आलो आहोत, ते आम्ही निर्धाराने करीत राहू असे देखील या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]