ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. नरेश दधीच यांचे निधन

प्रभाकर नानावटी -

इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA-आयुका), पुणेचे माजी संचालक आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. नरेश दधीच यांचे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी बीजिंग (चीन) येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विज्ञान, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राने एक सखोल विचारवंत गमावला आहे.

राजस्थानातील चुरु जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात त्यांचा १९४४ मध्ये जन्म झाला. त्या गावात शाळाही नव्हती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. पुढे त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड सायन्स आणि नंतर पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक, नंतर विभागप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले.

प्रा. दधीच हे गुरुत्वाकर्षणाचा अभिजात सिद्धांत आणि क्वांटम सिद्धांत या विषयावर संशोधन करत असत. डॉ. दधीच यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबत आयुकाची उभारणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी आयुका संस्थेच्या संकल्पनेत आणि स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. चार्ल्स कोरिया यांच्या वास्तुशिल्प नेतृत्वाखाली आयुका संकुल उभारणीवेळी दधीच यांचा सक्रिय सहभाग होता. आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांच्यासोबत बसून संस्थेची रचना ठरवण्यापासून ते जागेवर पहिला खड्डा खणण्यापर्यंत आणि संपूर्ण संस्था उभी राहताना पाहण्यापर्यंत, ‘आयुका’ हे त्यांचे जीवनकार्य बनले होते. डॉ. जयंत नारळीकर यांना आयुकाचे संचालकपद स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणारे तेच होते.

आईन्स्टाइनचा सर्वसाधारण सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि खगोलशास्त्र या विषयावर डॉ. दधीच यांचे मुख्य संशोधन आधारित आहे. विशेषतः ब्लॅक होल आणि त्याच्याशी संबंधित उर्जा स्रोतांचा संबंध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या संदर्भातील २०० हून अधिक शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केले. ‘अ रँडम वॉक इन रिलेटिव्हिटी अँड कॉस्मॉलॉजी’ (१९८५), तसेच गुरुत्वाकर्षण आणि सापेक्षता (१९९८) यांसारखी त्यांची काही पुस्तके गाजली.

प्रा. दधीच हे २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथील क्वाझुलु-नताल विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक होते. पोर्ट्समाउथ, यूके आणि बिलबाओ, स्पेन येथील गुरुत्वाकर्षण संशोधन गटांसोबत देखील त्यांनी काम केले होते. दक्षिण आफ्रिकेत वैज्ञानिक म्हणून त्यांनी काही काळ कार्य केले आणि नेल्सन मंडेला यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीला ते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंडेलांचे अनेक सहकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच प्रा. नरेश दधीच यांचा कल सामाजिक आणि साहित्यिक चिंतनाकडेही होता. युवक क्रांती दलाच्या स्थापनेच्या काळात ते सक्रिय सहभागी झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतासारख्या गुंतागुंतीच्या संकल्पना ते सोप्या, ग्रामीण दृष्टिकोनातून समजावून सांगण्याची अद्भुत हातोटी त्यांच्याकडे होती. विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधत त्यांनी भारतीय विचारविश्व समृद्ध केलं.

आयुकाचे माजी संचालक आणि अशोका विद्यापीठाचे कुलगुरू सोमक रायचौधुरी यांनी त्यांना ओळखणे हा एक बहुमान असल्याचे सांगितले. दधीच यांचा विज्ञानावरील दृष्टिकोन आणि मानवतावादी विचारशैली यामुळे आशिष नंदी, जयंत नारळीकर, वसंत पळशीकर यांच्यासारख्या विचारवंतांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या पत्नी साधना दधीच समाजवादी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

‘अंनिस’तर्फे डॉ. नरेश दधीच यांना भावपूर्ण आदरांजली.

-प्रभाकर नानावटी


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]