लहू का रंग एक है (?)

डॉ. प्रसन्न दाभोलकर -

लहु का रंग एक है…

हे परिवर्तनाच्या चळवळीतील लोकप्रिय गीत आहे. आपण सारे एक आणि समान आहोत आणि माणसामाणसांमधील नाते समता, बंधुता, न्याय, करुणा आणि प्रेम यांच्यावर आधारलेले असावे, या आपल्या विचारांना आणि सद्भावनेला हे गाणे साद घालते.

परंतु आज वस्तुस्थिती वेगळीच आढळते. आज समतेच्या जागी पराकोटीची विषमता, न्यायाच्या जागी अन्याय, प्रेमाच्या जागी विद्वेष आणि करुणा म्हणजे कमकुवतपणा असे मानले जाते.

या संदर्भात सर्वांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात.

आपण एकसारखे तर नकीच नसतो, परंतु ‘सर्व समान’ असे आपण का मानतो?

दीनदुबळ्यांना झुकते माप देणे हे केवळ करुणेला नाही तर न्यायालादेखील धरून आहे,असा आपला विश्वास का असतो?

राष्ट्र, धर्म, वंश, रंग अशा भेदांमुळे समाजाच्या चिरफाळ्या उडून माथेफिरूपणाला प्रोत्साहन का मिळत आहे?

माणूस हा खरेच नैतिक जाणीव असणारा समंजस जीव आहे का ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने वागणारे हिंसक जनावर आहे?

हे प्रश्न ‘माणूस मुळात आहे कसा? त्याने कसे असावे? त्याचे परस्परांशी नाते अधिक आत्मीयतेचे कसे बनेल? समाजाची घडी कशी असावी?’ अशा अधिक मूलभूत प्रश्नांना जन्म देतात.

यांची उत्तरे शोधण्याआधी आपल्या विचारांमागील काही मूलभूत संकल्पना नीट समजावून घेणे आवश्यक असते. नाहीतर आपले आकलन चुकते, कालांतराने आपलीच मते बदलतात आणि वैचारिक गोंधळ निर्माण होतो. अशा आकलनाची सुरुवात आपण ‘रक्त’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यापासून करू या.

रक्ताच्या संदर्भात अनेक वाक्प्रचार आपल्या मनात खोलवर दडलेले असतात. ‘सगळ्यांचे रक्त लाल असते; माणसाचे रक्त एक; रक्त लिंग, वंश, धर्म असे भेद जाणत नाही’ यांपासून ‘खून का बदला खून से; आमच्या रक्तात हे नाही; आपापल्या वंशाचे रक्त शुद्ध ठेवले पाहिजे; काहींच्या रक्तातच विशेष गुण किंवा दुर्गुण असतात’ असे अनेक विचार आपल्या मनात कमीजास्त प्रमाणात दडलेले असतात.

या सर्व विचारांमध्ये रक्त हा शब्द समान असला तरी त्याचा अर्थ बदलता असतो. काही वेळा हा अर्थ सर्वांच्या शरीरात असलेला लाल रंगाचा द्रवपदार्थ एवढाच असतो. परंतु बहुसंख्य वेळा आपल्या मनात रक्त म्हणजे ‘आनुवंशिकता आणि आनुवंशिक गुण’ असाही सुप्त अर्थ असतो.

प्रथम आपण एका साध्या प्रश्नाचा विचार करू :

सर्वांच्या रक्ताचा रंग एक असतो म्हणजे नेमके काय?

रक्त ही शरीरातील एक ऊती (tissue) आहे. रक्तात लाल व पांढर्‍या रक्तपेशी, रक्तबिंबिका आणि प्लाझ्मा असे विविध घटक असतात. रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिन या प्रथिनामुळे असतो. फुप्फुसांतून प्राणवायू घेऊन बाहेर पडणारे रक्त अधिक तांबडे, तर शरीरातून परतणारे रक्त किंचित गडद लाल दिसते. परंतु दोन्ही रक्त लालच असते. याखेरीज निसर्गात निळे, हिरवे, पिवळे तसेच रंगहीन रक्त असलेले प्राणी आहेत.

आणि रक्तगटांचे काय?

ए, बी, एबी आणि ओ असे वेगवेगळे रक्तगट असतात. तसेच आरएच धन किंवा ऋण (Rh + आणि Rh -) असे प्रकार असले, तरी त्यांचा रक्ताच्या रंगाशी काहीही संबंध नाही. रक्तगट हा लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावरील विशिष्ट रेणूंवर अवलंबून असतो. हे फरक रक्तदानासाठी महत्त्वाचे असतात. याखेरीज रक्ताचे इतरही गट असतात. कोणत्याही गटाचा श्रेष्ठ-कनिष्ठपणाशी काहीही संबंध नसतो.

शरीरशास्त्र सांगते की सर्व जाती, धर्म, वंश किंवा राष्ट्रातील माणसांच्या रक्ताचे मूलभूत कार्य एकच असते. ते प्राणवायू वाहून नेते, जखम भरून येण्यास मदत करते आणि जीवन टिकवते. सर्व जातींचे, धर्मांचे, देशांचे किंवा वंशांचे लोक आजारी पडतात, जखमी होतात आणि योग्य गटाचे रक्त मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. सर्व माणसांच्या रक्ताची मूलभूत रचना सारखी असल्यामुळे रक्ताचे होणारे प्रकार जगातील सर्व माणसांमध्ये आढळतात. माझ्या रक्ताशी जुळणारे कोणत्याही माणसाचे रक्त मला चालू शकते.

माणसे अनेक बाबतीत वेगळी असतात. प्रत्येकाची बुद्धिमत्ता, स्वभाव, कौशल्ये, संस्कार आणि जीवनानुभव वेगळे असतात. ही विविधता उत्क्रांती, पर्यावरण आणि आनुवंशिकता यांमधून निर्माण होते. परंतु या फरकांमुळे कोणाचेही ‘मानवी मूल्य’ कमी-जास्त होत नाही. “सर्वांच्या रक्ताचा रंग एक आहे”, हे विधान याच मूलभूत समानतेची जाणीव करून देते.

परंतु “माणसाचे रक्त एक आहे” या वैज्ञानिक सत्यापासून “सर्व माणसे समान आहेत” या नैतिक तत्त्वापर्यंतचा प्रवास नेमका कसा घडतो असा प्रश्न निर्माण होतो.

‘एक रक्त’ हा समानतेचा निकष कसा?

“लहू का रंग एक है” हे वैज्ञानिक सत्य आहे. परंतु “सर्व माणसे समान आहेत” हा निष्कर्ष नैतिक आहे. हा निष्कर्ष कसा निघतो? ही उडी नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

विज्ञान आपल्याला ‘काय आहे’ हे सांगते; तर नैतिकता ‘काय असावे’ हा प्रश्न विचारते. रक्ताचा रंग हा विज्ञानाचा विषय आहे. पण रक्त एक असल्यामुळे सर्व माणसांशी समानतेने वागले पाहिजे, हा नैतिक निर्णय आहे. हा निर्णय केवळ रक्ताच्या रंगावर आधारलेला नसून, माणसाच्या मानवी प्रतिष्ठेवर आधारलेला आहे.

एक उदाहरण बघू. ‘सर्व माणसे जन्मतात, वाढतात, आजारी पडतात आणि मृत्यू पावतात. त्यामुळे सर्वांना उपचाराचा समान हक असला पाहिजे’, असा निष्कर्ष आपोआप निघत नाही. तरीही समाज असा विचार स्वीकारतो. कारण प्रत्येक मानवी जीवनाला समान मूल्य आहे, असे आपण मानतो. (अर्थात, आज हे फक्त विचाराच्या पातळीवर आहे. प्रत्यक्षात सर्व माणसांना समान उपचार मिळत नाहीत.) म्हणजेच विज्ञान माहिती देते; मूल्ये दिशा देतात.

समानतेची कल्पना येथे थांबत नाही. ती आणखी एक नैतिक उडी घेते. ‘निसर्गत: कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे जन्मास आले नाही, त्यामुळे समाजानेही जन्माच्या आधारावर भेदभाव करू नये. प्रत्येक व्यक्तीला समान मान, समान संधी आणि समान न्याय मिळाला पाहिजे.’ हीच सामाजिक समानतेची कल्पना आहे.

सर्व माणसे क्षमता, बुद्धिमत्ता, कर्तृत्व किंवा स्वभावाने सारखी नसतात. त्यांच्यात असंख्य फरक असतात आणि ते नैसर्गिक आहेत. समानता म्हणजे सारखेपणा नव्हे, तर मानव म्हणून समान मूल्य. दोन व्यक्ती वेगवेगळ्या असणारच पण सर्वांची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि हक्क समान असले पाहिजेत.

अशा प्रकारे रक्ताच्या लाल रंगापासून समानतेपर्यंतचा प्रवास विज्ञानातून नव्हे, तर विज्ञानाच्या आधारावर उभ्या राहिलेल्या मानवी मूल्यांतून पूर्ण होतो. रक्त आपल्याला आपण एकाच प्रजातीचे सदस्य आहोत असे सांगते तर समानतेची कल्पना आपण एकमेकांशी कसे वागावे ते शिकवते.

परंतु ही नैतिक विचारांची फक्त सुरुवात आहे. रक्ताचेच उदाहरण घेऊ: सर्व माणसांचे रक्त समान असते परंतु सर्व प्राण्यांचे रक्त एकसारखे नसते, किंबहुना असंख्य प्राण्यांना रक्तच नसते. जर आपण अहिंसेचे पुरस्कर्ते असू आणि सजीवांना वेदना देणे आपल्याला अयोग्य वाटत असेल तर आपल्याला रक्ताचा वैज्ञानिक पुरावा उपयोगी ठरणार नाही. ‘संवेदनशील प्राण्यांना माणसाने त्रास देता कामा नये’ असे नवीन नैतिक तत्त्व आपल्याला मांडावे लागेल.

आजच्या सामाजिक परिस्थितीत न्याय ही एक महत्त्वाची नैतिक संकल्पना आहे. परंतु करुणा आणि क्षमा अशा कल्पना न्यायाच्याही पुढे जातात. ‘समान कामाला समान दाम’ ही मागणी आज न्याय्य आहे, परंतु उद्याच्या अधिक विकसित समाजात मार्क्सने म्हटल्याप्रमाणे ‘क्षमतेप्रमाणे काम आणि गरजेनुसार दाम’ अशी रचना अधिक योग्य ठरेल का? याचा विचार आणि निर्णय कोण आणि कसा करणार?

रक्ताचे वैज्ञानिक स्वरूप समजावून घेण्यापासून माणसाचे नैतिक रूप आणि आचरण या विचारांपर्यंत आपण आलो. वेगवेगळ्या परिस्थितीत विज्ञान आणि नीती यांची सुयोग्य सांगड कशी घालावी याचे सर्वमान्य उत्तर आज नाही. आपापले उत्तर शोधून आपली वागणूक आपल्याला ठरवायची असते. ही वागणूक ठरवत असताना आजचे विज्ञान आणि आजची नैतिक तत्त्वे यांचा आधार हवाच, परंतु आजची आपली मांडणी हे सर्वकालीन अंतिम सत्य असेल असे नव्हे, याची नम्र जाणीवही ठेवावी लागते. महात्मा गांधींनी सांगितल्यानुसार सत्याच्या आपल्या आजच्या आकलनानुसार आपण वागायचे असते आणि सत्याचे आपले आकलन जसे विकसित होते तसे आपले आचरण अधिक सुयोग्य बनवायचे असते.

थोडक्यात, ‘लहू का रंग एक है’ हे वाक्य केवळ वैज्ञानिक सत्य नसून ते विज्ञानाने प्रेरित असे नैतिक तत्त्व आहे. ते आपल्याला आठवण करून देते की, रक्ताची समानता आपल्याला जोडते; पण न्याय, करुणा, बंधुता आणि परस्पर आदर ही मूल्येच या जोडणीला अर्थ देतात.

-डॉ. प्रसन्न दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]