धर्मचिकित्सेतून मानवतावादाकडे

डॉ. नरेंद्र दाभोलकर -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे मानते की, धर्मातील नैतिक आशयांच्या आचरणाबाबत धार्मिक व्यतीसमवेत संवादी व कृतिशील भूमिका घ्यावी. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेच्या चोख अंमलबजावणीचा आग्रह धरावा आणि विवेकवादी जीवनदृष्टीने जगत असताना कोणत्याही धर्माला एक समग्र पर्याय देण्याचा प्रयत्नही करावा. धर्माच्या नावाने कुठल्याही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषणाची चिकित्सा करावयास हवी व शक्यतो प्रतिकारही करावयास हवा, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानते.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे सतत चर्चेचा विषय ठरत आले आहे. याचे एक महत्त्वाचे कारण असे की, या विषयाचा संबंध श्रद्धेशी येतो आणि याचा जवळपास सर्वांच्या लेखी अर्थ ‘धर्मश्रद्धा’च असा असतो. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी म्हणूनच धर्म या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेबद्दल भूमिका घेण्याची गरज आहे. ‘धर्म’ या शब्दाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होतो. वाहणे हा वार्‍याचा आणि प्रकाशणे हा सूर्याचा धर्म आहे. येथे धर्म या शब्दाचा अर्थ गुणधर्म असा आहे. आई-वडिलांची आज्ञा पाळणे हा मुलांचा धर्म आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ ‘कर्तव्य’ असा आहे. तहानलेल्यांना पाणी देणे आणि शरण आलेल्यांना अभय देणे हा धर्म आहे. या ठिकाणी धर्म याचा अर्थ नैतिक कर्तव्य असा आहे. माझा हिंदू, मुसलमान, बौद्ध वगैरे वगैरे धर्म आहे. याचा अर्थ उपासना पद्धती व श्रद्धा असा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याला याच भूमिकेतून धर्मविषयक भूमिकेचा विचार करावा लागेल. याबरोबरच आणखी एक बाब निर्विवादपणे मनात पकी करावी लागेल. ती अशी की, धर्म ही मानवानेच निर्माण केलेली सामाजिक संस्था आहे.

मानवी जीवनात धर्माला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. सर्व जगातील मानवसमूहांत आदिम अवस्थेपासून या-ना-त्या स्वरूपात धर्माने माणसाची सोबत केली आहे. आधुनिक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही गेल्या अवघ्या ४०० वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला होता. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले होते. विज्ञानाचा उदय होण्याआधी त्यांना विशाल स्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले होते. सर्व बाजूंनी धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली. धर्म व्यतीला जन्मत:च मिळतो. त्याचा संस्कार लहानपणापासून होतो. त्या वेळी चिकित्सा करण्याचा प्रश्नही उपस्थित होत नाही. व्यती प्रौढ होते, चिकित्सक विचार करण्याची तिची क्षमता तयार होते. ही क्षमता वापरून इतर धर्मांबरोबर स्वत:च्या मायधर्माची तुलना ती करू लागते, तेव्हा धर्मविचाराला प्रारंभ होतो. वस्तुस्थिती अशी आहे की, बहुतेकांच्या जीवनात हे घडतच नाही. बदलत्या वयोपरत्वे काही कर्मकांडे, धार्मिक वाचन, तीर्थयात्रा एवढेच घडते. स्वाभाविकच लहानपणापासूनचा धर्मसंस्कार गडद होत जातो. मनाला समाधान देत जातो. त्या त्या व्यतींना ही बाब उचित व उपयुक्त वाटते व त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. परंतु, आजची परिस्थिती या संदर्भात बरीच बदललेली आहे. धर्माचा अभिमान, अस्मिता, आग्रह, अहंकार अधिकाधिक बलवान करण्याचा प्रयत्न सर्वच धर्मांत चालू आहे. त्याला परधर्मद्वेषाचे रूप देखील अनेकदा येते. धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे चालू झाले आहे. सध्या जे उधाण धर्मभावनेला आले आहे, तेही धर्मभावना धर्मांधतेकडे वळवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे लक्षण आहे. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी, असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात असल्याने आणि या विचाराचा संबंध हरघडी धर्माशी येत असल्याने धर्मचिकित्सा अपरिहार्य बनल्याचे मानावे लागते.

एकंदरीत, मानवी जीवन पूर्वीपेक्षा जास्त अस्थिर व संघर्षमय झाले आहे. या संघर्षाला तोंड देण्यासाठी धर्मभावनेला केवळ साधन बनवण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. ही धर्मभावनादेखील पारंपरिक भावनेप्रमाणे दृढ व तीव्र असते. या भावनेचा परिपोषही कौटुंबिक व सामूहिक शिकवणीच्या परंपरेतून होतो. ही पारलौकिकाच्या अंगापासून मुक्त झालेली नसते; पण या धर्मभावनेचा सारा भर संघशतीवर आणि संघर्षासाठी लागणार्‍या भौतिक बळावर असतो. हिंदूंमध्ये धर्म वास्तवात जातीच्या रूपाने व्यत होतात. त्यामुळे जाती आणि उपजातीही आता याच पद्धतीने संघटित व संघर्षशील होऊन व्यत होऊ लागल्या आहेत. जगातील विवेकवादी अशी भूमिका घेतात की, धर्म या कल्पनेला पूर्णत: नकार द्यावयास हवा. इहवादी असलेले मार्क्सवादी असे मानतात की, स्वत:च्या शोषणातून मुत होण्यासाठी धर्म नावाच्या मिथ्या कल्पनेला लोक कवटाळतात. यासाठी त्यांना धर्मचिकित्सेत न अडकवता प्रत्यक्ष शोषणाच्या लढ्यात आणले पाहिजे. त्यामुळे वास्तव बदलेल. शोषण संपेल आणि त्या शोषणातून मुतीचा आधार शोधण्यासाठी धर्मभावनेला जवळ करणारे शोषितांचे मन धर्म या भ्रमातून मोकळे होईल. या ठिकाणी  असा एक प्रश्न सहजच विचारता येण्यासारखा आहे की,  महाराष्ट्रातील महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सर्वांनी कठोर धर्मचिकित्सा करूनही धर्मभावनेलाच नकार का दिला नाही? वरील नावांच्या बरोबरच लोकहितवादी, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, वा. म. जोशी यांच्याबद्दलही असेच प्रतिपादन करता येईल. वर उल्लेख केलेल्या सर्व थोरांचे कार्य आपापल्या क्षेत्रात मोठे आहेच; परंतु त्याबरोबरच त्यांनी ‘धर्माचा विचार’ केला, असे दिसून येते. त्यांचे विचार, निष्कर्ष व कृती वेगवेगळी होती. त्या कोणाला पटतील वा न पटतील; पण त्यांनी धर्माचा विचार आस्थेने व शोध घेण्याच्या बुद्धीने केला. त्यामधून त्यांनी समाजविन्मुख धर्म, समाजसन्मुख केला. परलोकवादी धर्म इहलोकवादी केला. ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. धर्माचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढते आहे. अशा वेळी तर या स्वरूपाची विधायक धर्मचिकित्सा हा महत्त्वाचा प्रश्न मानावयास हवा. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वा अशास्त्रीय वाटते, तर काहींना मतलबाची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणार्‍या कोणत्याही व्यतीस त्याच्या धर्माला नकार देऊन चळवळीत सामील होण्यासाठी समिती सांगत नाही. समिती तटस्थ आहे, याचा अर्थ समितीच्या व्यासपीठावर कोणत्याही धर्माचे कसलेही कर्मकांड केले जात नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही धर्मकार्यात संघटना म्हणून समिती सहभागी होत नाही. व्यतिगत पातळीवर कार्यकर्ते धर्माचरणाच्या संदर्भातील आपापले निर्णय घेत असतात; परंतु तरीही एक महत्त्वाची बाब समिती करू इच्छिते आणि करतेही. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेची तरतूद कलम २५, २६, २७, २८ मध्ये आहे. त्याप्रमाणे व्यतीला उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु हे स्वातंत्र्य सार्वजनिक नीतिमत्ता, कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक आरोग्य या बाबींनी नियंत्रित केले आहे. याबाबत समाजात जागृती करण्याचे व आग्रह धरण्याचे कार्य समिती करते. उदा. २००६ साली देवदासी प्रतिबंधक कायदा अधिक कडक स्वरूपात संमत झाला. कोणीही व्यती अथवा तिचे पालक असे म्हणू शकत नाहीत की, माझे वय १८ वर्षे पूर्ण आहे आणि पालकांच्या संमतीने मी माझ्या धर्मपालनासाठी देवाशी लग्न लावते. हे धर्मपालन प्रत्यक्षात सार्वजनिक नीतिमत्तेला बाधक ठरते. कारण देवाशी लग्न लागणे, असे काही अस्तित्वात नसल्याने प्रत्यक्षात अशी व्यती ही वेश्याव्यवसायात ढकलली जाण्याची शक्यता असते. याबरोबरच भारतीय घटनेत नागरिकांची कर्तव्ये दिली आहेत. त्यातील एक कर्तव्य सुधारणेच्या तत्त्वाचा परिपोष करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आहे. याचा अर्थ, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून समाजसुधारणेसाठी धर्मचिकित्सा करणे, हे भारतीय संविधानाने नागरिकांना घालून दिलेले कर्तव्य आहे. धर्मशास्त्राप्रमाणे श्रीगणेशाची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी लागते; परंतु विषारी रासायनिक रंगांनी रंगवलेल्या व पाण्यात न विरघळणार्‍या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’पासून बनलेल्या गणेशाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात पाण्यात विसर्जित झाल्यास पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी वैज्ञानिक दृष्टिकोन व सुधारणेचे तत्त्व यांचा विचार करून या धर्माचरणाची चिकित्सा करावी लागते व पर्याय सुचवावे लागतात. खरे तर ही सर्व मांडणी समाजाला हितकारक असते. सारासार बुद्धीला ती सहजपणे समजू शकते. परंतु याबाबत स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणारे कडवा विरोध करतात. त्या वेळी त्यांच्या मते, धर्माची व्याख्या काय असते? ‘समाजाचे धारण करतो तो धर्म.’ ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. जगात असा आदर्श धर्म कुठेही नाही, तरी प्रत्येक धर्म मात्र स्वत:ला आदर्श मानतो. समाजाची धारणा म्हणजे कल्याण कशामुळे होते? ते प्रत्यक्षात होते की नाही ते कुणी ठरवायचे? प्रत्येक धर्म हे स्वत: ठरवत असतो. धारणा होत नसेल तरच तो धर्म कुणी बदलायचा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आमचा धर्म धारणा करणाराच आहे, असा प्रत्येक धर्माचा ठाम सिद्धांत असल्याने धर्माने धारणा होते की नाही, ही शंका उपस्थित करणे धर्मद्रोहाचे लक्षण असते. व्याख्या आदर्श अशा धर्माची करायची. आपल्या धर्माची चिकित्सा वगैरे काहीही करायची नाही आणि त्यातून लोकांसमोर असा आभास निर्माण करायचा की, त्यांचा विशिष्ट धर्म हाच आदर्श आहे. ही बौद्धिक चलाखी भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. धर्मसंबंधातील वादाचा खरा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा हे सांगणे नाही, तर प्रत्यक्षातील धर्म असे आदर्श आहेत का? ते आदर्श आहेत की नाहीत हे कुणी ठरवावे? आदर्श नसतील तर कुणी बदलावेत? हे ते वादाचे प्रश्न आहेत. कोणताच धर्म असे अधार्मिक व धर्मद्रोही प्रश्न उपस्थित करू देणार नाही. आजची भारताची राज्यघटना व त्यानुसार निर्माण झालेले कायदे व प्रशासन समाजाच्या धारणेसाठीच आहेत. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यघटनेच्या परीघात विधायक धर्मचिकित्सा करू इच्छिते; पण  राज्यघटनेला धर्मग्रंथ मानण्यास व त्यातील आदेशांना धर्म मानण्यास कोणताही धार्मिक तयार होत नाही व धर्माचा पगडा असलेल्या एका फार मोठ्या जनसमूहाला ही धर्मचिकित्सा म्हणजे धर्मद्रोह वाटतो. याच ठिकाणी ‘अंनिस’च्या भूमिकेचे वेगळेपण व सामर्थ्य स्पष्ट होते.

विविध ठिकाणच्या आदिमानवाच्या सामाजिक जीवनात प्राथमिक धर्मभावना यातुप्रधान होती. विश्वातील सर्वांत – माणसात, प्राणिमात्रात, निर्जीवांच्यात- एक यातु  तत्त्व आहे. त्याची उपासना विविध कर्मकांडांनी करायची.  या क्रिया म्हणजे ‘यातुक्रिया.’ खरे तर हे सर्व यातुकल्पनेवर आधारलेले धर्मजीवन विज्ञान व आधुनिकता यामुळे दुर्बल होऊन अस्त पावावयास हवे होते. आजच्या आव्हानांना सामोरे जावयाचे तर यातुनिर्भर धर्मश्रद्धेतून माणसाने मुक्त होणे गरजेचे होते. तसा प्रयत्न ज्या प्रमाणात झाला, त्याला यश आले नाही. कृष्ण यातूमध्ये वर्णन केलेले प्रकार हे उघडपणे शोषण करणारे आहेत. म्हणून त्याचा समावेश ‘जादूटोणा व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन २००५’ या कायद्याच्या विधेयकात केला गेला. तरीही हा कायदा हिंदू धर्माविरोधी आहे, असा चुकीचा डांगोरा स्वत: हिंदूरक्षक म्हणवणार्‍या राजकीय पक्षांनी पिटला. प्रच्छन्नपणे शोषण असणार्‍या बाबींच्या संदर्भात व्यवहारात ही स्थिती आहे. मग परंपरेने चालत आलेल्या असंख्य कालबाह्य बाबी खरे तर ‘यातू’ असताना त्याला धर्म मानले जाते, यात नवल नाही. महाराष्ट्र समाजसुधारकांचा वारसा सांगतो; परंतु धर्म या संज्ञेचा तात्त्विक आशय पाहण्यास तो उत्सुक नाही. धर्मश्रद्धा म्हणजेच पारंपरिक यातुनिर्भर श्रद्धा असेच मानले जाते. यातून संकट टळेल, पुण्य मिळेल अशी अपेक्षा भताच्या अंत:करणात असते. संतांची भती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. अंत:करणाच्या शुद्धीला त्यांनी महत्त्व दिले आहे. कर्तव्य कर्म करावेच; पण ते ईश्वरअर्पण बुद्धीने करावे, माणुसकीने वागावे हे संतांनी सांगितले आणि आचरलेही; परंतु नव्या धर्मश्रद्धेचा हा मार्ग पारंपरिक यातुक्रियांची जागा घेऊन मराठी मनाला व्यापून टाकू शकला नाही, असा अनुभव येतो.

यातुप्रधान धर्म असो अथवा धार्मिक दर्शनाचा विषय असलेले अतीत तत्त्व; त्यांना खरेखुरे अस्तित्व आहे का, हे प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साहाय्याने उपस्थित करता येतात व ते रास्त आहेत व करावयासही हवेत, असाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार आहे. मात्र, याबाबत प्रयत्न करतानाच धर्माला अगाध सामर्थ्य कशामुळे लाभले, याची समाजशास्त्रीय जाणही हवी. मानवी संस्कृतीत मानवी अनुभवाची व त्याच्याशी संलग्न असणार्‍या व्यवहाराची जी अनेक रूपे प्रकट झाली आहेत, त्यापैकी धार्मिक अनुभव व व्यवहार हे एक रूप आहे. मानवी बुद्धी ज्या वेळी पुरेशी तार्किक बनली नव्हती, तेव्हा धर्मासारखी गंभीर संस्था निर्माण झाली. ती हजारो वर्षे मानवी मनाचा ताबा घेऊन वावरली. आजही बालमनात व इतरत्रही धर्म हा बुद्धिवादाच्या अनुरोधाने वाढत नाही. धार्मिक विचार हे तर्कशुद्धतेवर आधारलेले नसतात. म्हणून समुदायाच्या लेखी त्याची मातब्बरी कमी होत नाही, असे मानसशास्त्र मानते. मानवी जीवनाचे एक अंग तर्काच्या कक्षेच्या बाहेर असते. यामुळे माणसाला विश्वात प्रतीत होणारा जो अनुभव असतो, तो स्वभावत:च दुहेरी असतो – एक म्हणजे सभोवतालच्या वस्तूची प्रचिती देणारा इंद्रियजन्य अनुभव आणि अतीत तत्त्वाची प्रचिती देणारा आध्यात्मिक धार्मिक अनुभव असे धर्मश्रद्धा मानणार्‍यांचे प्रतिपादन असते. व्यवहारात जी धार्मिकता येते, त्यामध्ये प्रथा, रूढी, चालीरीती असतात. उपासनापद्धती असते, पुरोहितशाही व कर्मकांडे असतात, समाजव्यवस्था व नियमन असते आणि अहिंसा, सत्यपरिग्रह, पावित्र्य अशी उच्च नैतिक मूल्येही असतात. या सर्वांच्या मिलाफातूनच धर्म साकार होतो आणि ‘धर्मपण’ व्यतिमानसात, समाजमानसात एकवट मुरलेले असते.

धर्माचा आविष्कार हा कर्मकांडाद्वारे होतो. अरिष्टाचे भय नाहीसे व्हावे व इष्टाची तीव्र कामना यामधून ही कर्मकांडे पार पाडली जातात. ही सर्व जाणीव हजारो वर्षांच्या संस्कारातून माणसाच्या मनाच्या अबोध पातळीवर स्वीकारली गेली आहे. माणसाचे हे अव्यत मन फार प्रभावी असते. त्याला चिकित्सेची कदर नसते. त्यामुळे प्रत्यक्ष जागृतीमधील विश्वापेक्षा धर्माचे हे अव्यत मनातील आभासयुत विश्व त्याला खरे वाटले. या विश्वाचे दार यातुक्रियासदृश कर्मकांडांनी उघडता येते, ही बाब माणसांनी सहजपणे स्वीकारली. बिनतोड युतिवादाचा सगळा प्रभाव हा व्यत मनावरच होतो. अव्यत मनाचा भाग बनलेल्या कर्मकांडांना व त्याला अनुषंगून असलेल्या श्रद्धा या अव्यत मनाच्या अंगभूत सामर्थ्याने चिकित्सेपासून दूरच राहिल्या. याबरोबरच एक महत्त्वाचे सामाजिक सत्यही आहे; ते असे की, अदृष्टाची भीती व अतृप्त कामनांची पूर्ती या पोटी माणसांनी अतीताबरोबर कर्मकांडाद्वारे जोडलेला धर्म स्वीकारला. त्या दोन्ही बाबी वेगळ्या स्वरूपात; परंतु पूर्ण ताकदीने आजही अस्तित्वात आहेतच. जीवनाचे सर्व आयाम हे आज एका अदृश्य भीतीने व्यापलेले आहे. जगात कुठल्या क्षणी काय घटना घडेल आणि त्याचे थेट परिणाम माझ्या जीवनापर्यंत कसे घडतील, याची अनिश्चितता इतकी वाढली आहे की, अदृष्टाच्या भीतीचे क्षेत्र कमी न होता विस्तारले आहे की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे. शिवाय मृत्यूची भीती हे सनातन सत्य तर सार्वत्रिक आहे. अतृप्त कामनांच्या पूर्तीबाबतही हेच म्हणता येईल. उपभोगाचे एक अमर्याद विश्व आज खुले झाले आहे. यामुळे अतृप्त कामना क्षणाक्षणाला खुणावत असतात. अशावेळी त्यांच्या पूर्तीसाठी धर्म जवळचा न वाटला तर नवल.

धर्माचा विषय खरे तर ईश्वर आणि मनुष्य यांचा संबंध हा आहे. परंतु संपूर्ण मानवी जीवनाला गवसणी घालण्याच्या धर्माच्या प्रवृत्तीमुळे धर्म आणि नीती ही एकमेकांशी कायमची जोडली गेली आहे; किंबहुना धर्माशिवाय नीती असू शकते, अशी कल्पना करणेसुद्धा माणसाला जड जाते. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांत सुसंवाद असावा, सहकार्याची भावना नांदावी, सर्व माणसांच्या मूलभूत गरजांची परिपूर्ती आणि व्यतित्वाचा विकास सामूहिक प्रयत्नातून व्हावा, यासाठी नीतिमूल्ये व नीतिनियम यांची आवश्यकता असते. नीतीच्या या कार्याचा तसा धर्माशी काही साक्षात संबंध नाही. तेव्हा धर्माशिवाय नीती संभवतच नाही, ही कल्पना चुकीची आहे. वेगवेगळ्या धर्मांच्या नावाखाली आजतगायत जवळपास सर्व धर्मांत अनीतीची व क्रूरपणाची कृत्ये घडली आहेत. जगाच्या इतिहासात धर्माच्या प्रेरणेनुसार अटीतटीचे झगडे झाले आहेत. रतपात व कत्तली झाल्या आहेत. सर्वांत भयावह म्हणजे या अमानुष नरसंहाराचा अभिमानच बाळगला गेला आहे. कारण, ही सर्व कृत्ये धर्मासाठी केलेली असल्यामुळे धर्मकृत्ये होती. त्यामुळे ती नैतिकच आहेत, असे मानले गेले. सत्य, अहिंसा, समता, दया, क्षमा, सहिष्णुता इत्यादी सर्वमान्य मूर्त नीतितत्त्वे आणि सामाजिक जीवनातील त्याचा व्यवहार यात फरक असतो, रीती म्हणून उच्च तत्त्वाचा उद्घोष करणे सोपे असते; परंतु माणसाचा नैतिक व्यवहारही समाजव्यवस्थेच्या एका चौकटीतच होत असतो. त्या व्यवस्थेचे स्वरूपच व्यावहारिक नीतीला जन्म देते. त्या व्यवस्थांमध्ये परिवर्तनाचा विचारही केला जात नाही. अमूर्त नीतितत्त्वाचा जयजयकार आणि व्यवहारात संस्थाअंतर्गत अनीतीला धर्ममान्यता असा अंतर्विरोध धर्मात आणि हिंदू धर्मात तर फारच ठळकपणे दिसून येतो. हिंदू धर्मातील तत्त्वचिंतकांना, साधु-संतांना अस्पृश्यता, स्त्रीदास्य, शूद्रांचे सर्व प्रकारचे शोषण या गोष्टी गंभीरपणे अनीतीमूलक आहेत, अशी शंकासुद्धा आली नाही. जमीनदार, सावकार, पुरोहित, राजा, शासनसंस्था यांच्याद्वारे कित्येक शतके कष्टकरी लोकांचे जे राजरोस शोषण चालू होते, त्यात पुरेपूर अनीतीच आहे, असे त्या-त्या काळातील जाणत्या, जबाबदार व अत्यंत धार्मिक लोकांनाही कधी वाटले नाही. समग्र समाजजीवनच अंतर्विरोधाने भरलेले होते. अजूनही ते तसेच आहे. त्यामुळे धर्माच्या आधारे नीतिमान समाजाची निर्मिती करण्याचा पुकारा करणार्‍या शतींची चिकित्सा करण्याची गरज आहे. 

 याबरोबरच हे लक्षात घ्यावयास हवे की, व्यतींनी स्वीकारलेल्या धर्मश्रद्धेला एक सामाजिक रूप आपोआप प्राप्त होते. समुदायप्रियता ही माणसाची एक सहज प्रवृत्ती आहे. समुदायाच्या संगतीत माणूस सहजच समुदायाप्रमाणे वर्तन करतो. सत्य काय, असत्य काय याची तपासणी करणारी तार्किक बुद्धी समुदायात मंदावते. न तपासलेल्या कल्पना सहजपणे स्वीकारल्या जातात. याला collective thinking of group mind अशी संज्ञा आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस समुदायात वावरतो. मनाच्या कणाकणात संघाच्या सामर्थ्याची छाप पडते. जन्म, लग्न, पूजा, अंत्यविधी या जीवनातील प्रमुख घटनांमध्ये सामुदायिक कर्मकांडांवरच भर असतो. व्यतिगत, कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्यास आवश्यक ते आचारनियम तयार करणारी, मानवी उत्सवप्रिय प्रवृत्तीस वाव देणारी धार्मिक कर्मकांडे माणसाच्या मनाला पटतात. उदा. संक्रांत, भाऊबीज, रक्षाबंधन ही या स्वरूपाची धार्मिक कर्मकांडे असतात. दुसर्‍या बाजूला, जी कर्मकांडे अनावश्यक, अर्थहीन अंधश्रद्धा वाढविणारी वाटतात, ती दूर करण्याची हिंमत या कर्मकांडांना पाठिंबा असणार्‍या सामुदायिक विचाराच्या प्रभावामुळे होत नाही. धर्माचे स्वरूप ‘दैवी व्यतीची आज्ञा’ असे मानत असले, तरी खरोखर मनुष्याच्या मनावर समाजाच्या शतीचे दडपण असते. धर्मातील विधिनिषेध, कर्मकांडे यामागे सामाजिक शती असते आणि त्याविरुद्ध बंड करून उठण्याचे सामर्थ्य समुदायप्रिय असलेल्या व अपरिहार्यपणे समाजातच जगणार्‍या व्यतीला कमी असते. धर्म अशा रितीने समग्र जीवनाला वेढून टाकतो. त्याची अंगोपांगे ही मनुष्याच्या मूलभूत प्रेरणांशी सहजपणे जोडली गेली आहेत. म्हणून इतर कोणत्याही सामाजिक संस्थेपेक्षा धर्माचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र आढळून येतो.

धर्माचा आणखी एक भाग पुरोहितशाहीचा आहे. परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेली ही दलाल व्यवस्था आहे. परमेश्वराला जे-जे काही द्यावयाचे, ते-ते पुरोहितामार्फत देण्यात येते आणि व्यवहारात पुरोहित त्याचा उपभोग घेतो. बहुतेक धर्मांत ही व्यवस्था दिसते. परमेश्वराकडे पोचण्याचे एक शास्त्र आहे आणि प्रत्येक कार्य जसे त्याला कार्याशी प्रशिक्षित तज्ज्ञाला दिले जाते, त्याच पद्धतीने देवाच्या पूजेचे कार्य हे प्रशिक्षित पुरोहित करतो, असा युतिवाद केला जातो. यात तथ्य नाही, असेच मानावयास हवे. देव आहे की नाही, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू; पण तो आहे, असे मानले तरी त्याची जी गुणवैशिष्ट्ये आणि थोरवी वर्णिली आहे त्याच्याशी कोणत्याही स्वरूपातील मध्यस्थाची कल्पना ही अनावश्यक व विसंगत ठरते. प्रत्यक्षात एका बाजूला ती बहुसंख्य ठिकाणी एका जातीतच बंदिस्त झाली आहे.

धर्म या विषयाबाबत मांडणी करताना जे-जे आक्षेप घेतले जातात, त्या-त्या बाबतीत एक युतिवाद नेहमी केला जातो. तो असा की, हे आक्षेप खर्‍या धर्माविषयी नाहीतच. खरा धर्म माणसामाणसांत भेदभाव करत नाही. पण ज्याला खरा धर्म मानले जाते, त्यामध्ये अपरिहार्यपणे अस्तित्वात असलेल्या पावित्र्याच्या संकल्पनेमुळे वस्तूंच्या बाबतीत अंधश्रद्धेवर आधारलेली एक विषमता तयार होते. येथे हे समजून घ्यावयास हवे की, सर्व वस्तू लौकिक पातळीवरीलच मानल्या, तरी त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार होणारा भेद शिल्लक राहीलच; परंतु पावित्र्याच्या संकल्पनेमुळे निर्माण होणारी विषमता आणि या प्रकारची विषमता या दोन्ही एक नव्हेत. पहिल्या प्रकारची विषमता लहरीपणा, परंपरा, रूढी, धर्मग्रंथांची मान्यता यावर आधारलेली आहे. तिच्या मुळाशी कोणताही वस्तुनिष्ठ निकष नाही. दुसर्‍या प्रकारची विषमता मात्र वस्तुनिष्ठ अशा निकषावर आधारलेली असते. उदा. जगातील वस्तूंचे विभाजन करणे, यात चूक नाही; मात्र ते वर्गीकरण उपयोगी-निरुपयोगी, हितकारक-अहितकारक, स्वच्छ-अस्वच्छ अशा प्रकारे असेल. स्वच्छ व आरोग्याला हितकारक पाणी प्यावे. अस्वच्छ व अपायकारक पाणी पिऊ नये, अशा वस्तुनिष्ठ मुद्यांवर हे विभाजन करावे लागेल.

यावरही असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की, नीतीची निर्मिती पावित्र्याच्या कल्पनेतून झालेली असते आणि ती कल्पनाच नाकारली तर नीती म्हणजेच खरा धर्म, म्हणजेच सुरळीत समाजजीवन कोसळून पडेल. याबाबतही स्पष्ट कल्पना बाळगावयास हवी. ती अशी की, पावित्र्याची संकल्पना व नीतिमूल्ये यांच्यामध्ये अंतर असते. समाजधारणेसाठी पावित्र्याच्या संकल्पनेची आवश्यकता नाही. नीतिमूल्ये मात्र समाजधारणेला आवश्यक असतात. अर्थात, त्याचे स्वरूप देश, कालसापेक्ष, परिवर्तनशील व न्याय आणि विवेकावर आधारलेले असे असते. समाजातील नीतिमूल्ये जर कोणाचे अन्यायी हितसंबंध जपत असतील, कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवत असतील, तर ती नीतिमूल्ये ही त्याज्यच मानावी लागतील. थोडक्यात, कोणताही खरा धर्म पावित्र्याच्या संकल्पनेच्या नावाने विषमतेचे समर्थन करणारी मूल्ये स्वीकारावयास सांगू शकत नाही.

वरील सर्व बाबी काहीशा विस्ताराने सांगण्याचे कारण असे की, ज्याला खरा धर्म मानला जातो, जो नैतिकतेवर आधारित आहे असा ठाम दावा केला जातो तो धर्म मानवीच नव्हे, तर संपूर्ण अस्तित्वाचीच दोन कोटीमध्ये विभागणी करतो. एकीकडे जे पवित्र आहे, नित्य आहे, ते असते आणि दुसरीकडे सामान्य माणसे ज्या प्रकारे जगत असतात, तो संसार अथवा माया असते. सामान्य वस्तूंचा व्यवहार हा पवित्र गोष्टींकडून म्हणजेच खर्‍या धर्माकडून नियंत्रित केला जात असतो. या मांडणीबाबत पर्यायी विचार करण्याची एक वेगळी पद्धती अंधश्रद्धा निर्मूलन समिती देऊ इच्छिते. ती थोडक्यात अशी-

इतिहासात असे घडलेले आहे की, धार्मिक पद्धतीने विचार करण्याची रीत सर्वप्रभावी बनली. इतिहासात सामान्य माणसे पोट भरण्यासाठी कष्ट करीत होती, कलावंत कला निर्मिती करत होते, सत्ताधारी राज्यशकट हाकत होते. हे सर्व घडत असतानाच या सर्वांच्या पलीकडे एक सर्वोच्च मूल्य होते. ते म्हणजे, धर्म. प्रश्न असा आहे की, इतर सर्व मूल्ये ज्यापुढे गौण आहेत व ज्याकडे जाण्याची केवळ साधने आहेत, अशा सर्वांत प्रथम असलेल्या (खर्‍या) धार्मिक मूल्याला आपण मानायचे की नाही? याबाबत ‘अंनिस’चे मत असे आहे की, सामाजिक मूल्ये, नैतिक मूल्ये, सौंदर्यविषयक मूल्ये, न्याय, कर्तव्य, बंधुभाव या संकल्पना धर्मकल्पनेवर आधारण्याची आवश्यकता नाही व त्या मूल्यांवर धर्माचे प्रभुत्व चालावे, अशीही गरज नाही. ही मूल्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकतात. याचाच अर्थ असा, सर्व माणसे (धार्मिक माणसे देखील) जी मानवी मूल्ये मनोमनी मानतात, त्यांच्याकडे केवळ मानवी मूल्य म्हणून बघता येणार नाही का? एका सर्वोच्च अशा धार्मिक मूल्याची मांडलिक मूल्ये म्हणून ती अस्तित्वात असणे आवश्यक नाही. प्रत्यक्ष अनुभव व्यतीला असे सांगतो की, मानवी जीवनात प्रत्येक क्षणी अधिकाधिक सुधारणा करता येतात. स्वत:च्या मर्यादा ओलांडून माणूस म्हणून अधिक चांगल्या तर्‍हेने जगणे या प्रयत्नात गूढ असे काहीही नाही. स्वत:ची मर्यादा जाणणे आणि ती उल्लंघण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हे धर्म न मानताही कोणीही करू शकतो.

समिती असे मानते की, व्यतीने आपला आळशीपणा, आपली सान्तता आणि त्याचबरोबर मानवी मूल्यांसाठी झगडण्याची स्वत:मधील क्षमता नीट ओळखली पाहिजे. माणूस म्हणून माणसात अफाट क्षमता आहेत. त्याबरोबरच त्याच्या त्रुटीदेखील ओळखून मान्य करावयास हव्यात. त्यातील पहिली बाब म्हणजे त्याचा आळशीपणा. माणूस स्वत:च्या मर्यादा ओलांडून अधिक उन्नत बनण्याचा प्रयत्न करतो, तसाच स्वत:च्या मर्यादित कक्षामध्ये आळशीपणाने समाधानाने पडूनही राहतो. मानवी बुद्धी, मन, जाणीव, कर्तृत्व यांच्या मर्यादांची समज म्हणजेच मानवाचे सान्तत्व. विश्वाची नियमबद्धता काही मर्यादित प्रमाणात आपल्याला समजते आणि त्याचा विस्मयकारी अफाटपणा लक्षात घेतला तर ती गूढही वाटते. मानवाला अशा प्रकारे स्वसामर्थ्य आणि मर्यादा यांचा प्रत्यय येतो. त्यासाठी धर्माची गरज नाही. ज्या मानवी मूल्यांसाठी झगडावयाचे, त्यासाठी धर्माची गूढ गहन जाणीव असण्याची गरज नाही.

समिती असे मानते की, एक अरिष्ट आज जगभर मानवी समाजाला ग्रासते आहे. या स्फोटक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वशतिमान ईश्वराबद्दल वा लौकिक विश्वाच्या पलीकडच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करणे जरा थांबवले तरी चालेल. अंतिम सत्य शोधण्यासाठी बाहेर पडण्याची काही गरज नाही. एक साधा प्रश्न प्रत्येकजण स्वत:ला विचारू शकतो. तो म्हणजे, आजच्या संकटाच्या काळात माझे मानवतावादी कर्तव्य कोणते आहे? मानवी जीवन अर्थपूर्ण व सुखकारक करणारी मूल्ये कोणती आहेत? उदा. न्याय हे मानवी मूल्य आहे ना? पदोपदी त्याची पायमल्ली होताना मी पाहतो ना, मग त्यासाठी मी लढले पाहिजे. या ठिकाणी एक बाब फार महत्त्वाची आहे. ती अशी की, आपण माणसे असल्याने मानवी मूल्ये आपल्या दृष्टीने रहस्यमय असूच शकत नाहीत. आपल्याला ती मनोमनी जाणवतात आणि सगळ्यांनाच स्पष्टपणे ठाऊक असतात. ज्यांना मानवी मूल्यांसाठी झगडायचे नाही, तीच मंडळी मानवी मूल्ये म्हणजे काहीतरी गहन गंभीर कूट प्रश्न आहे, अशी बकवास करत असतात आणि या मूल्यांचे घाऊक ठेकेदार असलेले धर्म, धार्मिक संस्था व धार्मिक नेते मानवी मूल्यांकरिता करावयाच्या निकडीच्या लढाईकडे पाठ फिरवत असतात. मानवी मूल्ये ही काहीतरी गूढ बनवण्याची गरज नाही. साध्या खेड्यातल्या मुलांनाही शाळेत जाऊ लागल्यावर स्वच्छता म्हणजे काय, चांगले अन्न म्हणजे काय आणि समूहात माणुसकीने कसे वागावे, हे कळायला लागते. म्हणूनच स्वत:च्या विवेकाच्या आधारे मानवी मूल्यांसाठी करावयाच्या संघर्षामध्ये आपण स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, ती अशी की, या मानवी मूल्यांना दुसरीकडे कोठेही आधार नाही. धर्म, परमतत्त्व, निसर्ग, विज्ञान यांच्यात त्यांना अधिष्ठान नाही. मानवी मूल्यांना फक्त एकच एक परिमाण असते. ते म्हणजे, मानव आणि या अर्थाने धर्माला असेलच तर एकच अर्थ असतो; तो म्हणजे, साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ‘खरा तो एकचि धर्म| जगाला प्रेम अर्पावे॥’

याचा अर्थ असा की, समाज योग्य दिशेने बदलण्याचा जो प्रयत्न करावयाचा, त्यासाठी कुठल्या तरी अतिमानवी शक्तीकडून मदत मिळण्याची शक्यता नाही. परंतु तरीही परिवर्तनासाठी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत उभे राहण्याची हिंमत देव आणि धर्मभावनेशिवाय कुठून येते? माणसाला असाध्य असलेल्या; पण श्रेयस्कर वाटणार्‍या एखाद्या गोष्टीच्या मागे तो लागतो (आणि जे श्रेयस्कर आहे त्यालाच आपण मूल्य म्हणतो) स्वत:च्या शतीपलीकडे असणार्‍या एखाद्या मूल्यांसाठी धडपडतो. तेव्हा इतर माणसे त्याच्या बरोबर सहकार्य करतील किंवा त्याला मदत करतील व त्याद्वारे त्याला इष्ट वाटणार्‍या मूल्यांच्या समीप कोणत्याही देवाचा वा धर्माचा आधार न घेता जाऊ शकेल, यावर त्यांचा आशावाद आधारलेला असतो. कोणत्याही अति नैसर्गिक शतीवर; मग त्या शतीला धार्मिकतेचे नाव असो वा पावित्र्याचे, अवलंबून राहणे ही कल्पनाच मुळात माणसाचा तेजोभंग करून त्यांना खच्ची करते. मानवी मूल्यांच्या साधनेसाठी कोणत्याही खोट्या वा खर्‍या धर्मावर अवलंबून राहण्याच्या कल्पनेची तरफदारी आवश्यक नाही. धर्माच्या काही हजार वर्षांच्या प्रदीर्घ काळात मूल्यनिर्मितीसाठी माणूस त्यावर अवलंबून होता. मात्र, ही मूल्ये प्रत्यक्षात अवतरू शकली नाहीत. तशी वाटचाल थोडीफार झाली असे कोणाला वाटत असेल, तरी माणसाने स्वत:च्या पायावरच उभे राहून ही वाटचाल करावी, हेच सर्वार्थाने श्रेयस्कर आहे, असे समिती मानते. सर्वांनी मनापासून हे केले तरच मानवजातीला भवितव्य आहे. ही बाब इतकी महत्त्वाची आहे की, स्वत: धार्मिक अंगाने न जाणार्‍यांनी देखील धर्माच्या आधारे मूल्ये प्रस्थापित करणार्‍यांचा हात हातात घ्यावयास हवा. माणसाला मदत फत माणसाकडूनच मिळू शकते, हे लक्षात घ्यावयास हवे.

धर्माबाबतच्या आणखी एका आयामाची दखल आवर्जून घ्यावयास हवी. धर्माच्या उदयाच्या काळात त्याचे काम समाजाला नीतिनियम आणि कायदे देण्याचे होते. माणसाच्या समाजाच्या बाह्यांगाला, भौतिक जीवनाला आकार देण्याचे होते; परंतु कालौघात ‘माणूस’ बनल्यानंतर माणसाच्या म्हणून काही गरजा निर्माण झाल्या. भौतिक ठरणार्‍या परिपूर्तीसाठी बाह्यविश्वात प्रवास करणार्‍या माणसाला एक माणूस म्हणून अंत:प्रवासाचीही गरज वाटू लागली. माणूस दारिद्य्र आणि विषमतेमुळे असहाय्य बनतोच; त्याबरोबरच मृत्यूच्या निश्चिततेची अंतर्यामी झालेली जाणीवही त्याला एकाकी, असहाय्य बनवते. स्वत:च्या वासनांचे मनातील तांडव त्याला भयचकित करते आणि दया, क्षमा, प्रेम, करुणा या सद्गुणांनी मन मोहरून निघावे ही कल्पना त्याला भुरळ घालते. अलौकिक शतीचे अस्तित्व कल्पिणे, दु:खमुतीसाठी, वासना, विकारावर मात करण्यासाठी सद्गुणांच्या विकासासाठी त्या कल्पित अलौकिक शक्तीला श्रद्धेने अनन्यभावे शरण जाणे हा एक मार्ग मानवाने निवडला; परंतु ईश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध बंडाचा मानवी इतिहासही कमी नाही. अशा वेळी स्वत:ला घडविण्याच्या प्रक्रियेत माणूस आतून एक शती अर्जित करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वत:च स्वत:चा आधार बनतो. दु:खमुतीसाठी त्याला बाहेरच्या कोणत्याही व्यतीस शरण जाण्याची गरज उरत नाही. हा त्याचा अर्जित करण्याचा प्रयत्न त्याला एकट्याला एकाकीपणे करावा लागतो. याला अनेकांनी ‘अंतर्प्रवास’ असे नाव दिले आहे. ही शती प्राप्त होणे म्हणजेच जगाकडे, निसर्ग, समाज व स्वत:कडे बघण्याची एक स्वतंत्र सम्यक दृष्टी प्राप्त करणे. या दृष्टीमुळे माणसाचे अस्तित्व समाज, निसर्ग आणि स्वत:शी नवे उच्च दर्जाचे नाते जोडतो. मानवी वाटचालीची ही शोकांतिका आहे की, मानवी दु:खमुतीसाठी, वासनाविकारावरील विजयासाठी, नैतिक उन्नयनासाठी जे मार्ग माणसांनी आपापल्या प्रकृतीप्रमाणे शोधले, विकसित केले त्या सर्वांना विशिष्ट धर्मसंप्रदायांनी आपलाच एक भाग मानले. त्याच्यात कर्मकांड घुसवून शोषणाची व्यवस्था अबाधित ठेवली. आपापल्या धर्मसंस्था श्रीमंत अन् दिमाखी बनविल्या. माणसांना मुत, शतिशाली बनवण्याऐवजी त्यांना अंधश्रद्ध व शरणागत बनविले. माणसांनी कधी आव्हानापोटी, तर कधी स्वार्थी हेतूने धर्ममार्तंडांना प्रतिसाद दिला.

‘सत्याचा शोध’ हा परिवर्तनासाठी परवलीचा शब्द असतो. या सत्याच्या भावासाठी बाह्यविश्वात धर्माने सांगितलेला सत्याचा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाने माणसाने घेतला. धर्माला त्या क्षेत्रातून माघार घ्यावी लागली. गॅलिलिओला शिक्षा सुनावणार्‍या पोपला चारशे वर्षांनी का होईना; पण स्वत:ची चूक जाहीरपणे मान्य करावी लागली. मात्र बाह्यविश्वाच्या या चिकित्सेबरोबरच अंतर्विश्वासंबंधी सांगितल्या गेलेल्या अज्ञानमूलक व अंधश्रद्धेवर आधारित बाबींचा त्यागही करावा लागेल. हाच माणसासंबंधी नव्या चिंतनाचा पाया ठरेल. तो कोणत्याही प्रस्थापित धर्माचा भाग असणार नाही किंवा तो स्वत:ला प्रस्थापित धर्मात परिवर्तित करून घेणाराही नसेल. हे नवे चिंतन संपूर्ण मानवजातीला कवेत घेणारे असेल. त्याला जात, वंश, राष्ट्र, धर्म याच्या मर्यादा नसतील, या नव्या चिंतनाला जुन्या धर्माची चिकित्सा आणि विविध ज्ञानशाखांनी मिळवलेली माहिती पोषक ठरेल. मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, जीवशास्त्र व समाजशास्त्र यांच्या आधारे हा अंतर्प्रवास पुढे जाईल. माणूस म्हणून माणसाच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत याचे भान आले की, त्याच्या पूर्ततेसाठी होणारे प्रयत्न ओझे न वाटता आनंददायी कृती वाटेल. हे नवे चिंतन प्रस्थापित धर्मांना एका पातळीवर पर्याय देईल. त्याच्या अभावी माणसे अधिकाधिक अंधश्रद्ध बनतील वा टोकाची भोगवादी बनतील. या दोन्ही गोष्टी मानवी जीवन सार्थ बनवणार्‍या नाहीत. या नव्या चिंतनाला कोणते नाव द्यावयाचे हा एक प्रश्न आहे. त्याच्यासाठी अद्याप तरी कोणत्याही भाषेत नवा शब्द निर्माण झालेला दिसत नाही. जो शब्द शोधला जाईल तो निश्चितपणे धर्म असा नसेल. धार्मिक भावनांचा, धर्माचा पूर्ण आदर करूनही वरील सर्व मांडणी धर्मभावनेच्या पलीकडे जाणारी, कृतिशील मानवतावादी व नैतिकदृष्ट्या उत्क्रांतीवादी आहे. तोच समितीच्या विचारांचा रस्ता आहे.

हे सर्व लक्षात घेता अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे मानते की, धर्मातील नैतिक आशयांच्या आचरणाबाबत धार्मिक व्यतीसमवेत संवादी व कृतिशील भूमिका घ्यावी. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेच्या चोख अंमलबजावणीचा आग्रह धरावा आणि विवेकवादी जीवनदृष्टीने जगत असताना कोणत्याही धर्माला एक समग्र पर्याय देण्याचा प्रयत्नही करावा. धर्माच्या नावाने कुठल्याही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषणाची चिकित्सा करावयास हवी व शक्यतो प्रतिकारही करावयास हवा, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानते. घटनेचीही या दृष्टिकोनास संमती आहे. कोणत्याही धर्माच्या आचाराशिवाय स्वत:च्या विवेकाच्या साहाय्याने नैतिकदृष्ट्या संपन्न जीवन जगता येते.

(‘धर्मचिकित्सेतून मानवतावादाकडे’ या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रदीर्घ लेखातील संपादित भाग.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]