-
लिहित आहेत अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुलं
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनाच्या निमित्त प्रसिद्ध होणार्या अभिवादन विशेषांक २०२४ मध्ये, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुले अंनिसचे कार्यकर्ते असलेल्या त्यांच्या आई- बाबांनी त्यांना कसे वाढवले- घडवले याकडे वळून पाहत आहेत.
या मुलांच्या आई- वडिलांनी स्वतः च्या तरुण वयात, ही मुले लहान असताना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सातत्याने अर्थपूर्ण सहभाग घेतला. रूढ विचारसरणीपेक्षा वेगळा विचार व त्यानुसार आचार करण्याच्या त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावर व त्यांच्या मुलांच्या जडण-घडणीवर खोल ठसा उमटला. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, कुटुंबातील स्त्री-पुरुष समानता, अधिक खर्च न करता लग्न, सामाजिक दायित्व किंवा घरचे खाऊन लष्करच्या भाकर्या भाजणे, व्यसनविरोध अशा चर्चा व कृतींना भरलेल्या वातावरणात ही मुले लहानाची मोठी झाली व घडली.
त्यांच्या विस्तारित कुटुंबात वा आजूबाजूला त्यांच्या घरापेक्षा वेगळे वातावरण होते. अशावेळी आपले आई-वडील ज्या चळवळीचा भाग आहेत त्या चळवळीकडे, आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांकडे ही मुले कशी पाहतात? चळवळीने दिलेल्या धारणा मनात ठेवून जगताना त्यांना कधी विचारांमुळे आपली ताकद वाढल्यासारखे वाटले? कधी एकटे पडल्यासारखे वाटले? त्यांचे स्वतःचे कुटुंब त्यांना कसे घडवायचे आहे? या बद्दल ही मुले बोलली आहेत.
आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करत असलेल्या या मुलांचे मनोगत सर्वांना नक्कीच आवडेल व हे वाचून इतर कार्यकर्त्यांची मुले देखील त्यांचे अनुभव लिहिण्यास प्रवृत्त होतील.
खालील कार्यकर्त्यांच्या मुलांनी मनोगते लिहिली आहेत…
प्रमोदिनी-सुकुमार मंडपे, उषा-प. रा. आर्डे, रेखा-राजीव देशपांडे, माधवी-श्रीपाल ललवाणी, अंजली -मिलिंद देशमुख, वंदना-अण्णा कडलास्कर, नीता-नागेश सामंत, संगीता-उदय चव्हाण, मथुरा-श्रीरंग मोहिते, इशरत-फारूक गवंडी.