कुमार मंडपे -
महाराष्ट्रात दोन हजारांपेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. १८ हजारांहून अधिक माध्यमिक विद्यालये आहेत, ७२ हजारांहून अधिक प्राथमिक शाळा आहेत. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि प्राध्यापक यांची संख्या काही लाखांत आहे. ते विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करतात. प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये किमान एक शिक्षक, प्राध्यापक तयार झाला, तर ही समस्या बर्याच प्रमाणात सुटू शकेल आणि वैज्ञानिक जाणिवांची पहाट प्रभावीपणे प्रकट होईल.
आपल्याकडे अडाणी, अल्पशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित सर्वजण वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यात आणि बाळगण्यात सारखेच मागे आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतो. ज्यांना माहीत असतो; ती जीवनातील घटनांना कार्यकारणभावाचे सूत्र सहसा लावत नाहीत. विचार करण्याची पद्धत म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला, तरच ही कोंडी फुटू शकते. यासाठी शिक्षणक्षेत्रात डायरेक्ट प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या अवघा अठरा वर्षांचा तरुण मतदान करतो. आपल्या देशाचे भवितव्य ठरवतो. आपले एक मत म्हणजे स्वत:चे मूल्य असते; परंतु आजच्या शिक्षण व्यवस्थेत म्हणजेच शालेय व कॉलेज पातळीवर काहीही प्रशिक्षण मिळत नाही. या पातळीवर शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढ्या प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात सध्याची स्थिती बदलू शकेल.
आपल्या घरी-दारी होणारे आचरण या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली करण्याची सवय प्रत्येकाला लागली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त शिकण्याची नाही, तर आपल्या आचरणात आणण्याची बाब आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकात रुजायचा असेल, तर सत्य फक्त माहीत असून चालत नाही, तर ते निर्भयपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यात आले पाहिजे. जुन्या मतांना बुजून न जाण्याचे धैर्य हे विज्ञानाने दिलेले अपूर्व मूल्य आहे. म्हणजेच विज्ञान हे अंतिम सत्यावर नव्हे, तर सत्याच्या सातत्यावर उभे असते, हे अनुभवास आले.
थोडक्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणे कठीण; पण अशक्य नाही. तो शुभाशीर्वादाने प्राप्त होत नाही. कारण कोणत्याही शुभाशीर्वादात सुष्ट किंवा दुष्ट शक्ती नसते. वैज्ञानिक दृष्टिकोन उपदेशाने, अध्ययनाने, अध्यापनाने किंवा शारीरिक, बौद्धिक श्रमाने प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्या मनावरील अनेक निरुपयोगी संस्कार, अनेक निरुपयोगी रीतिरिवाज, परंपरा, अहंकार व श्रेष्ठत्वाची भावना इत्यादी जळमटे झटकून टाकली पाहिजेत. थोर शास्त्रज्ञ यशपाल म्हणाले होते, भारतातील, विविध पातळ्यांवरील प्रश्न हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे निर्माण झाले आहेत. म्हणून शालेय व कॉलेज पातळीवर शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढा प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात आजची स्थिती बदलू शकेल.
– कुमार मंडपे
