अनिल चव्हाण -
अक्काताई बागेत येऊन बसली. नेहमीची, तिच्या आवडीची जागा. बागेत भर उन्हात येऊन बसावं, तरी कसं थंडगार वाटत.
हा थंडगारपणा तिच्यासारख्यांनी लावलेल्या झाडांनी आलेला आहे. एवढी झाडे लावलीत, की दिवसासुद्धा सूर्य दिसत नाही.
पण “बागेत अशी झाडे असू नयेत, इथे फुलझाडे, छोटी छोटी झुडपे लावावी, त्याला रंगीत फुले यावी; फुलपाखरे बागडावी; आणि तरच त्याला बाग म्हणता येईल! हे जंगल म्हणजे बाग नव्हे!” असं अमर जाधव वारंवार सांगत असतात.
“ही उलट्या अशोकाची इतकी झाडे, तोडून टाकायला हवी;” असेही ते म्हणत.
उलटा अशोक म्हटल्यावर तिला अशोक वनात बसलेली सीतामाय आठवली. गरोदरपणात काळजी घेण्याऐवजी नवर्याने जंगलात नेऊन सोडलेली. आपलेही दुःख तसेच. किती प्रकारचे दुःख!! नवरा झाल्यावरती सून! जाता येता टोमणे मारणारी सून, तिला घरात बसू देत नव्हती! एकेकाचे नशीब असेच!
पहिल्यांदा बाप लाथा घालतो, नवरा लाथा घालतो आणि आता सून! सुनेने आता जीव नकोसा करून सोडला, आपल्या नशिबाला दोष देता देता तिला हुंदके आवरेनात.
तोपर्यंत एकेक ज्येष्ठ नागरिक आले, आणि तिची समजूत काढू लागले.
दुसर्याचं दुःख गोंजारतानासुद्धा माणसाला बरं वाटतं.
लोकांच्या चर्चा चालू झाल्या.
“तीन पोरं आणि दोन पोरी पदरात. नवर्याची वेगळी हालचाल दिसली, तेव्हा त्याच्या मदतीशिवाय पोरांना सांभाळण्याचा निर्णय घेतला;”
” एवढी संपत्ती असून काही उपयोग नाही! नशीब फिरल की, काही चालत नाही!”
“होय हो! भाजी विकून संसार चालवला. पोरांना मोठं केलं, शिकवलं; आता पोरं आईची वाटणी करायला निघाली.”
“पाच पोरांची आई, पण सांभाळायला कोणी नाही.” आनंदराव चौगुलेनी शांत करायचा प्रयत्न केला, आणि म्हणाले,” ताई काही काळजी करू नका! एवढे लोक आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुमच्या पोरांना भेटू.”
“ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती फार वाईट आहे दादा, काहीतरी करायला पाहिजे.” जयंत मिठारी म्हणाले.
एवढ्यात राजेंद्र खद्रे आले. “कोण? आक्काताई? अहो, या रणजितची आई! फोन करतो त्याला, थांबा!” खद्रेनी फोन केला आणि त्यांना हसू आलं!
“अक्काताई काय झालं सांगा बरं!”
“सून म्हणाली, ‘आता जातीस का नाही?’ मग मी पिशवीत पातळ घातलं आणि इकडे आले!”
“कधी झाले हे?”
“मगाशीच नव्हं!”
” अहो मगाशी कसं होईल? रणजित आणि त्याची बायको कामावरून परस्पर, मॉलमध्ये गेलेत, बाजार करायला! सून घरात नाही आणि ती तुम्हाला म्हटली कशी?” खद्रे इतरांच्या कडे वळून म्हणाले, “ताई एकट्याच घरात बसलेल्या असतात, त्यामुळे त्यांच्या मनात असे उलटे सुलटे विचार येतात, आपण समजून घ्यायला पाहिजे.”
“अहो अक्काताई भाग्यवान आहे, नशीबवान आहे, त्यांना चांगली पोरं भेटली. सटवाईनं त्यांच्या कपाळावर चांगलं भविष्य लिहिलंय. त्यांच्या कुंडलीतले नववे स्थान बळकट आहे.” जयंत मिठारी म्हणाले.
“कसलं नशीब आणि कसलं भविष्य घेऊन बसला? सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात! तुम्हाला सदा पाहुण्याची गोष्ट माहिती आहे का?” असे म्हणत चंद्रकांत यादवानी गोष्ट सांगायला सुरुवात केली, “आम्ही पाटलाच्या हिरीवर बसलो होतो. बायकोशी भांडण झाल्यावर सदा पावना तिथे आला, आणि म्हटला, “काही नाही बाबा! जगण्यात राम नाही! मला काही जगायचं नाही! मी फास लावून घेणार!”
“मग थांबलास का? ही घे दोरी!” रामूने त्याच्याकडे दोरी ढकलली.
सदा पाहुण्यांनं खरंच दोरी झाडाला अडकवली; फास गळ्यात घातला. आम्ही बघतोय तर त्यांना वरून धाड करून उडी मारली.
“पण वजनाने दोरी. तुटली ढुंगण चेचलं! एवढ्यात कोणतरी ओरडलं, “पोलीस, पोलीस!” फास लावून घेतलाय म्हटल्यावर गुन्हा होणार! सदा घाबरला! आणि तसाच पळत सुटला.
“बघा केवढे भाग्य त्याचा जीव वाचला.” बने म्हणाले.
“पुढे काही जण पतंग उडवत होते. पळणार्या सदाच्या गळ्यात मांजा अडकला.”
“नशीबच फुटके.” बनेनी पुन्हा शेरा मारला.
“पण मांजाने कान कापला, मान नाही.”
“असा सदा भाग्यवान आहे. नशीबवान आहे.” बने म्हणाले.
“काय लावलंय नशीब नशीब सारखं. नशीब म्हणजे काय?” संभाजीराव इंगवलेनी प्रश्न केला.
“अहो नशीब म्हणजे भाग्य. नशीब म्हणजे तकदीर, आशीर्वाद, दैव, किस्मत! नशीब म्हणजे आपल्या नियंत्रणा बाहेर घडणारी घटना!” जयंत मिठार्यांचे उत्तर आले.
पण नुसत्या नशिबाने काय होते. त्याला कष्टाची जोड पाहिजे. महाभारतात श्रीकृष्णाने म्हटलं आहे, “नशीब आणि मानवी प्रयत्न एकमेकांवर अवलंबून असतात. उच्च मनाचे लोक चांगले आणि महान कार्य करतात. नशिबाची पूजा करणारे फक्त नपुंसक आहेत.”
“अहो एकदा तुम्ही नशीब मानलं की कर्तृत्वाचा प्रश्न येत नाही, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी!” अमर जाधव यांचा कर्तुत्वावरच भर जादा.
“हे पाहा अमर, काही गोष्टी आपल्या हातात असत नाहीत. उदाहरणार्थ जन्म कुठे घ्यायचा? श्रीमंत की गरिबांच्या घरात हे कोण ठरवणार? ही नशिबाची गोष्ट आहे.” बने.
“मागच्या जन्मात जर सत्कार्य केले असेल, पुण्य केले असेल तर हा जन्म चांगला मिळतो.”
“नाहीतर आहेच की आमच्यासारखे, आयुष्यभर कष्ट करायचे!” राजू आसबेनी शेरा मारला.
“तुला काय झाले? चांगला खातो की बापाच्या जिवावर! नशीबवान आहेस बेटा” बने म्हणाले.
“कोणी बाप श्रीमंत असल्यामुळे आरामशीर जगतो; कोण वरच्या जातीचा समजला जात असल्यामुळे समाजात मान मिळवतो; यामागे नशिबाचा काही संबंध नाही, हा समाजव्यवस्थेचा प्रश्न आहे! समाजात समता असेल तर कुठेही जन्म घेतला तरी विकासाच्या संधी समान मिळतील. म्हणजे एखाद्या जातीत किंवा वर्गात जन्माला आल्यास, शिक्षण मिळणार की नाही, हे नशिबावर नव्हे समाज व्यवस्थेवर ठरते.” अमर जाधव.
“नशीब जर जन्मण्यापूर्वी ठरत असेल, किंवा सटवाई येऊन नशीब लिहीत असेल; तर सावित्रीबाई जन्माला येण्यापूर्वी सगळ्या पोरींच्या कपाळावर निरक्षरतेचा शिक्का का मारला जात होता? महात्मा फुलेंच्या जन्मापूर्वी शूद्रांच्या कपाळावर सटवाई धन, मान आणि ज्ञान लिहायचे विसरून, ‘आयुष्यभर राबत बसा’ एवढेच का लिहत होती?” आनंदराव चौगुले.
“राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राखीव जागा ठेवल्यावरच बहुजनांच्या कपाळावर सटवाई नोकर्या लिहू लागली, हा चमत्कार कसा झाला?” अमर जाधव.
“आणि नेमके जागतिकीकरणानंतरच भारतातल्या शेतकर्यांच्या नशिबात आत्महत्या कशा आल्या?” आनंदराव चौगुले.
“म्हणजे माणसाच्या आयुष्यात येणार्या बहुसंख्य अडचणी, संकटे ही नशिबावर अवलंबून नसून इथल्या समाज व्यवस्थेवर अवलंबून आहेत.”
“त्सुनामी, महापूर, दुष्काळ, अपघात, अशा नैसर्गिक आपत्तीवर सुद्धा माणूस प्रयत्नाने मात करू शकतो.” चंद्रकांत यादवांचे मत.
“पण नशिबाची कल्पना जगात सर्वत्र आहे बरं.
भगवद्गीतेप्रमाणे मनुष्याला आत्मा आहे, तो अमर आहे, तो पुनःपुन्हा जन्म घेतो, गेल्या जन्मातील पाप आणि पुण्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो. त्यानुसार त्याचे नशीब ठरते. म्हणजे या जन्मात मिळणारे सुख आणि दुःख गेल्या जन्मातील कर्मानुसार मिळते.” जयंत मिठारी म्हणाले,
विकिपिडीयाच्या मते “ख्रिश्चन आणि इस्लाम भविष्यातील घटनांमध्ये प्राथमिक प्रभाव म्हणून नशीब ऐवजी सर्वोच्च अस्तित्वाच्या इच्छेवर विश्वास ठेवतात. या दैवी प्रॉव्हिडन्सचे प्रमाण एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीपर्यंत मोठ्या प्रमाणात बदलते.”
“अहो तुमच्या गप्पा सुरू आहेत पण त्या अक्काताईच काय?” राजू असबेनी सर्वांना जमिनीवर आणले.
“त्यांचा मुलगा यायला लागलाय. दोन मिनिटात पोहोचेल,” राजेंद्र खद्रेनी दिलासा दिला. फोनप्रमाणे रणजित आणि त्याची बायको येऊन पोहोचले.
“तुला आई जड झाली का रे? नऊ महिने तिने पोटात सांभाळलं, लहानाचं मोठं केलं; आणि असे उपकार फेडतोस?”
प्रत्येक जण त्याच्यावर तोंडसुख घेऊ लागला.
“थोडं थांबा त्याला काहीतरी बोलू द्या” राजेंद्र खद्रेनी सबुरीचा सल्ला दिला.
“दादा काय झालं? आमचं काही चुकलं असेल तर माफ करा! पण काय झालं ते तरी सांगा.” रणजित म्हणाला.
“तुझी बायको सासूला काय म्हणते? ऐकलंस तू?” बने.
“दादा आम्ही सकाळी नोकरीवर गेलोय ते आत्ताच तुमच्यासमोर आलोय.”
“आई एकट्याच घरी असतात. त्यांना असं कुणी काही म्हटल्यासारखे वाटते, भास होतो, त्यावर औषध सुरू आहे! या आशाताई आहेत विचारा त्यांना फार तर!”
“होय अक्काताईंना औषध सुरू आहे! “मघापासून शांतपणे ऐकत असलेल्या आशाताईंनी आता आपले तोंड उघडले.
“एकटेच राहणार्या ज्येष्ठ नागरिकांना अशा समस्या भेडसावत आहेत. त्यांनी समाजात मिसळायला हवे. आपण सर्वांनी मिळून काही उपक्रम घेतले पाहिजे, घरच्या लोकांनी त्यांना काही कामे दिली पाहिजेत. सणसमारंभ त्यासाठीच असतात.”
“चला! म्हणजे त्यांच्या नशिबात सुनेचा त्रास नाही, ती एकटेपणाची समस्या आहे! सॉरी रणजितभाऊ आम्ही उगीच तुम्हाला दोष दिला आणि सूनबाई तुम्हीही चांगल्या आहात. सॉरी!” सर्वांनीच एका सुरात दिलगिरी व्यक्त केली.
पण बनेंचा मोबाईल वाजू लागला, “दैवजात दुःखे सारी दोष ना कुणाचा! पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!”
“बने आता ते बंद करा, दुःख दैवजात नाहीत, मानवनिर्मित आहेत.” आनंदराव चौगुलेनी आठवण करून दिली.
“फायदा झाला तरी नशीब म्हणता, तोटा झाला तरी नशीबच म्हणतात. काय गंमत आहे पहा.” जयंत मिठारी म्हणाले.
“गेल्या जन्माची पापं आहेत ही. त्यावर तोडगा काढता येतो. भटाला विचारू या.” बने म्हणाले.
“बने, प्राण्याला पुन्हा जन्म नाही; संत तुकाराम महाराज म्हणतात,
” साखरेचा नव्हे ऊस| आम्हा कैसा गर्भवास|
बीज भाजुनी केली लाही| जन्म मरण आम्हासी नाही|”
“साखरेपासून पुन्हा ऊस तयार करता येईल का? बिया भाजून लाही तयार होते. ती पेरली तर पुन्हा रोप येईल का? म्हणजे असा उलटा प्रवास होत नाही. तर आम्हाला जन्म मरण या गोष्टी नाहीत. माणूस मेला की सगळे संपले.” आनंदराव चौगुले म्हणाले.
“अक्काताईला असे भास होत असेल तर तो मानसिक आजार आहे. त्यांच्यावर उपचार झाला पाहिजे. सध्या आपल्या देशात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे, आणि त्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय यंत्रणा सक्षम नाही.” आशाताई म्हणाल्या.
“अक्काताईंची समस्या नशिबावर सोडण्यापेक्षा आपण प्रयत्नाने सोडवू या!”
“अक्काताईंना औषध देऊ या.” चंद्रकांत यादव यांनी समारोप केला.
अनिल चव्हाण
लेखक संपर्क : ९७६४१४७४८३