दाभोलकरांच्या पोष्ट कार्डने आमच्या घरात क्रांती

महेंद्र श्रीरंग मोहिते - 9657072654

मला आठवतंय, माझे वडील पोस्टमनकडून पोस्टकार्ड घ्यायचे. दिवसभर डोंगरात दगड फोडून दमायचे तरीपण वेळ काढून पेनच्या रिफीलने त्यावर काहीतरी लिहायचे आणि मी ते पत्रपेटीत टाकायचो. त्या पत्रात काय होतं ते तेव्हा कळत नव्हतं, पण त्या पत्रांमुळेच आमचं आयुष्य घडलं हे आज कळतंय.

त्या पत्राला उत्तर म्हणून काही दिवसांनी एक पत्र यायचं. त्यावर शेवटी नरेंद्र दाभोलकर असं लिहिलेलं असायचं. वडील फक्त म्हणायचे, तो खूप मोठा माणूस आहे.

आम्ही चार भाऊ आणि आई-वडील असे आम्ही गवताच्या सपरात दुसर्‍याच्या जागेवर माळावर कुठेही राहायचो. माझ्या वडिलांची शरीरयष्टी तशी नाजूकच, पण भल्या मोठ्या दगडाच्या चिंधड्या उडवायचे, ते फक्त माझी मुलं शिकवायची तरच दिवस बदलतील या ध्येयाने. माझी आई गाढवावर दगड ठेवून डोंगरातून खाली आणायची.

त्यांनी अशा परिस्थितीही आम्हाला शाळा शिकवली. माझ्या वडिलांचं शिक्षण चौथीपर्यंतच, पण त्यांचे विचार खूप उच्च होते. घरात देव्हारा नव्हता ना कुठला देवाचा कार्यक्रम. आम्ही कुठं आई-वडिलांसोबत देवळात दर्शनासाठी गेल्याचं मला आठवत नाही. आमचे बरेचसे पाहुणे देवाला बकरे कापायचे, पण माझ्या वडिलांनी ते केलं नाही. कर्मकांडापासून आम्ही खूप दूर होतो. आमचं शिक्षण चालू होतं. कामासाठी गावोगावी फिरावं लागू नये म्हणून त्यांनी गाढवं विकून टाकली. माझ्या काकांसोबत बांधकाम शिकले. अशा परिस्थितीतही त्यांनी आमच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. हे सर्व फक्त डॉ. दाभोलकरांच्या त्यांच्यावर असलेल्या प्रभावी विचारांमुळेच.

आज आमचं आख्खं कुटुंब सुशिक्षित आहे. सर्व वेल सेटल्ड आहेत. जागा, घरं, गाड्या सर्व काही आहे ते फक्त डॉ.दाभोलकरांकडून वडिलांनी घेतलेल्या प्रेरणेमुळेच. एक विचार कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. वडिलांच्या विचारांवरच आम्ही घडलो. घरे, गाड्या घेतल्या, पण त्याला मिरची, लिंबू बांधावा असा विचारही कधी मनात डोकावला नाही.

माझे वडील त्यांचं कार्य अखंड करत आहेत. आमचे काही नातेवाईक त्यांना नावं ठेवतात. काही लोकं त्यांना ‘वेडा दाभोलकर’ म्हणतात. पण त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. नरेंद्र दाभोलकरांच्या कार्याच्या प्रेरणेने आज आमचं आख्खं कुटुंब समाजात ताठ मानेने वावरत आहे. समाजाच्या हिताचं पण समाजविरोधी वाटणारं हे काम तेवढं सोपं नाही. आज मी आणि माझी बायको आमच्या शिक्षकी पेशाच्या माध्यमातून लहान मुलांना, पालकांना लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत.

मागचे दिवस आठवल्यावर विश्वास बसत नाही की डोंगराचे दगड फोडून माळावरचं जीवन जगणारा एक भटक्या समाजातला माणूस एवढं मोठं विश्व निर्माण करू शकतो. हे फक्त असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या नरेंद्र दाभोलकर सरांच्या प्रेरणेने शक्य झाले. अशा या चौथी पास पण विचारांनी उच्चशिक्षित असणार्‍या वडिलांचा आणि अडाणी असूनही त्यांचे विचार स्वीकारणार्‍या आईचा मला खूप अभिमान आहे.

डॉ. दाभोलकरांच्या सहीच्या १० पैशांच्या पोस्ट कार्डाने एवढी मोठी क्रांती केली यावर विश्वास बसणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे अज्ञान आणि गरिबीचा अंधार दूर करणारी मशाल आहे, जिने आमच्या सपरात लख्ख प्रकाश पाडला. ती मशाल तेवत ठेवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.

महेंद्र श्रीरंग मोहिते

बोरावळे, ता. राजगड, जि. पुणे.

९६५७० ७२६५४


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]