आशा धनाले -

अंनिसमधील माझ्या प्रवेशाचे कारण योगायोगाणे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हेच होते. मिरजमध्ये मी १० वी पर्यंतच्या मुलांचे क्लासेस घेते. २००४ साली एका गल्लीत रस्त्यालगतच्या एका खोलीत मी दिवसभर क्लासेस घ्यायची. अगदी समोर १२ फुटांच्या अंतरावर एका घराचा दर्शनी भाग म्हणजे ४-५ म्हशींचा एक गोठा होता. त्या घरातली एक पोक्त बाई हा गोठा सांभाळायची, शेण वगैरेची विल्हेवाट लावणेही करायची. कोपर्यात एक मोठा खड्डा खणलेला. त्यात रोज शेणघाणीच्या बुट्ट्या रिकाम्या व्हायच्या. त्याच्या जवळची म्हणजे आमच्या समोरची भिंत वरील बाजूस उघडी होती. त्यावर बाहेर ती बाई शेणी लावायची. त्यामुळे क्लासमध्ये डास, माशा, दुर्गंध यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात व्हायचा. त्या बाईला मी समजावले, ‘मुलांना त्रास होतो. गजबजलेल्या भागात गोठा व शेणाचा साठा करता येत नाही, तर तो बंद करता का बघा’. तेव्हा तिनेच मला खडसावले की, ‘भाड्यानं राहातीस, काय बोलायचं नाय. न्हायतर दुसरीकडं जाऊन रहा.’ भरीत भर तिने आमच्यावर करणीचे उपाय करण्यास सुरुवात केली. दारात गुलाल टाकला. तो मी गोळा करून घरात आणून ठेवला. राख टाकली तेव्हा मीच गल्ली गोळा करून सगळ्यांना सांगितले, ‘बघा ही राख साधी नसून स्मशानातली आहे.’ यानंतर ती राख रॉकेल ओतून मी पेटवून दिली तेव्हा लोकांनी ‘आ’ वासला. आम्ही कशालाच बधत नाही हे पाहून ती बाई आणखीनच चेकाळली. आमच्या छतावर गुलाल लावलेले भाताचे मुटके व मध्यरात्री दगड पडू लागले. यात तिला मी रंगेहाथ पकडले. ‘तिच्या करणीने तुमच्या जिवाला धोका आहे म्हणून उतरवायची करणे तुम्ही करा’ असे आजूबाजूच्या बायांनी आम्हाला सुचविले. हा विषय वाढत चालल्याचे पाहून आम्ही सांगली मिरजेत कोणी अंनिसचा कार्यकर्ता आहे का याचा शोध घेतला. तेव्हा मिरजेत रामचंद्र तावरे हे कार्यकर्ते मिसेससह आहेत हे समजले. त्यांनी घरी येऊन पाहणी केली. न घाबरण्याचा सल्ला दिला. आता आम्हीच त्या बाईला अद्दल घडवण्यासाठी पोलीस कंप्लेंट केली, आरोग्य विभागालाही कळविले तेव्हा या दोघांकडून त्या बाईला समज देऊन सर्व त्रासदायक गोष्टी बंद करायला भाग पाडले व या प्रकरणावर पडदा पडला. नंतर तावरे सर, अॅड. के डी शिंदे सर, प. रा. आर्डे सर असा संपर्क करत मी त्रिशला शहासह अंनिसमध्ये दाखल झाले. पुढे २०१३ मध्ये पूर्णपणे सक्रिय झाले.
अंनिस, सांगली शाखेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात. साहजिकच ज्ञानात भर पडत राहिली. वेगवेगळे कार्यक्रम राबवताना, त्यांच्या नियोजनात भाग घेताना, ते पार पाडताना जबाबदार झाल्यासारखे वाटते. टीममध्ये काम करताना सहकार्याचे महत्त्व समजते. अनेक विषयांवरील वक्त्यांची भाषणे ऐकून स्वतःला प्रगत करता आले. सांगलीच्या टीममध्ये सर्वांनाच महत्त्व दिले जाते. अंनिसमुळे धाडस, जबाबदारीची जाणीव, लोकांशी बोलणे, थोडे लेखन यांच्याशी वारंवार संपर्क आल्यामुळे एकूणच व्यक्तिमत्त्व सुधारले.
अंनिसमध्ये काम करताना आर्डे सरांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रेरणा मिळत गेली. त्यांनी सुरू ठेवलेल्या ‘हसत खेळत विज्ञान’ या शालेय कार्यक्रमात भाग घेऊन अनेक ठिकाणी ते प्रयोग केले. त्याच्या पहिल्या प्रयोगावेळी त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. माझा महत्त्वाचा पार्ट असल्याने आर्डे सर आधीच प्रचंड चिडले होते. त्यात घरी तयार करून न्यायच्या कागदातून भूत काढायचा कागद मी नेला नव्हता. आर्डे सरांनी माझ्यावर आपला सगळा राग रिकामा केला; पण चूकच असल्याने शांत राहून मी तो प्रयोग यशस्वी करून दाखवला. पुन्हा अशा चुका कधीच केल्या नाहीत.
पुढे बुवाबाजी संघर्ष विभागात काम करताना बुवा पकडणे आलेच. त्यात डमी भक्त म्हणून बुवाची भेट घेणे, त्याला पकडेपर्यंत हे नाटक तंतोतंत वठवणे हे आर्डे सरांमुळे जमू लागले. यश मिळू लागले. पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन, पंचनामा हे सर्व होऊन कोर्टात एक बुवाची भांडाफोड केस उभी राहिली. प्रमुख फिर्यादी म्हणून साक्ष देताना माझी एक किरकोळ चूक झाली. तर प्रचंड अपराधी वाटले. अशा वेळी कसे बोलायचे हे राहुल थोरात सरांनी फोनवरून तासभर समजावून सांगितले व भीती घालवली आणि पुढील साक्षीसाठी तयार केले. डॉ. संजय निटवे यांनी स्वतः व ओळखीच्या वकिलांचे मार्गदर्शन देऊ केले. त्यामुळे महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर झाल्या.
माझ्या बाबतीत अंनिस मधला चांगला अनुभव असा की ‘हसत खेळत विज्ञान’ च्या तयारीमध्ये अभिनय करताना आर्डे सरांनी दिलेली दाद व मनापासूनचे अभिनंदन. तसेच सांगली टीमच्या वतीने मी, त्रिशला शहा व डॉ. सविता अक्कोळे अशा तिघी आष्ट्याजवळच्या कारंदवाडीच्या भोंदूबुवाची दखल घेऊन त्याची केस थेट कोर्टात लढवत आहोत. हा प्रवास आम्ही जबाबदारीने केला. ही एकूणच कार्यप्रणाली स्वतः राबविताना खूप छान वाटले. आता वाईट अनुभव म्हणजे मिरज मध्ये एकदा एका दुकानात मी गेले असताना चार ते पाच जबाबदार ब्राह्मण व्यक्तींनी मला अक्षरशः घेराव घातल्यासारखे करून ‘तुम्ही अंनिसचे लोक देवांविरुद्ध का बोलता? वाहनांना लिंबू मिरची बांधले तर तुमचे काय जाते? नारळ फोडण्याला, सत्यनारायण वगैरे देवकार्याला तुमचा विरोध का?’ असे प्रश्न मला विचारले, तेव्हा मी अंनिसमध्ये नवीन असल्याने थोडे गोंधळायला झाले. हे पण जमेल तशी उत्तरे दिली. या वाईट अनुभवामुळे स्वतःवर व अंनिसवर ठपका न येऊ देता लोकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे कशी द्यायची हे समजले.
– आशा धनाले (मिरज)
संपर्क : ९८६०४ ५३५९९