रामभाऊ डोंगरे -
जादूटोणा करून मुलाला मारल्याच्या संशयातून सासर्याने कुर्हाडीचे घाव घालून सुनेचा निर्घृण खून केल्याची घटना नागपुर येथील यशोधरानगर परिसरात घडली. लक्ष्मी रविशंकर पाली (वय ४२) असे मृत सुनेचे, तर नत्थूमल भगवान पाली (वय ७२) असे आरोपी सासर्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीचे पती रविशंकर यांचे २०१९ मध्ये निधन झाले, तेव्हापासून त्या वेगळी खोली घेऊन रहात होत्या. त्यांना २१ वर्षांची मुलगी आणि १९ वर्षांचा मुलगा आहे. सुनेने जादूटोणा केल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याच्या संशयाने आरोपीला पछाडले होते. याच कारणावरून तो सतत सुनेसोबत भांडायचा. तुझा खून करेन, अशी धमकीही द्यायचा. घरी मुले किंवा शेजारी मदतीला धावून येत असल्याने वाद शमायचा. शुक्रवारी (ता. ११) रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. शेजार्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. शनिवारी (ता. १२) दुपारी १२ च्या सुमारास पुन्हा वाद झाल्यानंतर नत्थूमलने कुर्हाडीने लक्ष्मी यांच्या डोक्यात घाव घातला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खुनासाठी वापरलेली कुर्हाड जप्त केली. सुनेचा खून केल्यानंतर घाबरलेल्या नत्थूमलने घराजवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली. माजी नगरसेवक गणेश कानतोडे यांनी याबाबत यशोधरानगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी अग्निशमन दलाला सूचना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले. मात्र, फुप्फुसात पाणी शिरल्याने त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र अंनिसच्या पथकाची घटनास्थळी भेट
वरील बातमी मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पथक आधी यशोधरा पोलीस स्टेशनला गेले व पोलीस निरीक्षक यांचेशी चर्चा केली. त्यांचेकडून सर्व समजून घेतल्यानंतर घटनास्थळाला भेट दिली. अंनिसच्या पदाधिकार्यांनी मृत लक्ष्मी यांच्या कुटुंबीयांशी आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या वेळी अंनिसतर्फे नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. “जगात जादूटोणा, करणी किंवा भानामती असे काहीही अस्तित्वात नसते. जर कोणाला असा दावा करायचा असेल, तर अंनिसने त्याकरिता मोठे बक्षीस/पुरस्कार जाहीर केलेला आहे, जो आजपर्यंत कोणीही जिंकू शकलेला नाही. केवळ संशयावरून कोणाचा जीव घेणे, मारहाण करणे किंवा शारीरिक व मानसिक छळ करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे”, असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच परिसरात असा कोणताही गैरप्रकार आढळल्यास समितीशी संपर्क साधावा, माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहनही करण्यात आले.

या प्रबोधन प्रसंगी अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुनील भगत, जिल्हा सचिव गौतम पाटील, शाखा सचिव कमलेश सतदेवे, राज्य विभागीय सदस्य देवयानी भगत, शाखा उपाध्यक्ष शोभा पाटील, शाखा कार्याध्यक्ष वर्षा सहारे, शारदा मोटघरे आणि अरविंद तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
